कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 10

मानवी शरीर             

            मागील सर्व मूढ अवस्थांचा त्याग करून मानव आता मर्यादित म्हणजे क्षिप्त झाला आहे. या पलिकडील विक्षिप्त आणि पूर्ण अवस्था त्याला प्राप्त करायच्या आहेत. निम्न योनीत पोटच मुख्य असते. त्या पोटाला भरण्याकरिता प्रकृतीने पाय दिले आहेत. पण त्या अवस्था योनींना मेंदू अतिशय लहान असतो. एवढा मोठा हत्ती, पण त्या हत्तीचा मेंदू मानवाच्या मेंदूपेक्षा कितीतरी पटीने लहान असतो. मोठा आणि विलक्षण सामर्थ्याचा मेंदू हे मानवाचे वैशिष्ठ्य आहे. मानवाचे उदर मात्र त्याच्या शरीराच्या मानाने लहान असते. या द्वारे नियती असे सांगू इच्छिते की मानवाने प्रकृतीकडून अतिशय अल्प घ्यावे पण आपल्या बुध्दी सामर्थ्याने प्रकृतीला खूप द्यावे. मानव जन्म या उच्च, उपकारक कार्याकरिता आहे हे ओळखणे आवश्यक आहे. इतर प्राण्यांपेक्षा मानवाची तंतूसंस्था अतिशय उत्क्रांत आणि गुंतागुंतीची असते. मानवाचा मेंदू एक ब्रम्हांडच आहे. मानवाने नियतीचा हा इशारा ओळखून आपल्या शरीराचा उपयोग करावा आणि तसे करण्याकरिताच नियतीने त्याला इतके उच्च धारणांचे स्वयंपूर्ण शरीर दिले आहे. मानवाचे पोट केवळ मूठभर धान्य मागते. समाधी अवस्थेतील योगी तर चक्क अन्नपाण्याशिवाय राहू शकतो. इतक्यात एक प्रयोग करून पाहण्यात आला आहे. अतींद्रिय विद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या चेकोस्लोवाकियामधील काफका या पराविद्या शास्त्रज्ञाने त्याच्या एका रूग्णाला सतत तीन आठवडे संमोहित अवस्थेत ठेवले.या कालावधित हा रूग्ण काल्पनिक जेवण जेवत होता. त्याला नैसर्गिक विधी करण्याची आवश्यकता वाटली नाही. त्याच्या सर्व शरीर-क्रिया मंदावल्या होत्या. एवढे सगळे होऊनही आश्चर्य म्हणजे त्याचे वजन वाढले होते.

शरीर आणि सूक्ष्म मन :

               उत्क्रांती केवळ शरीराची होत नसून त्यासह मन आणि जीवात्म्याचीही होत असते. आपले अस्तित्व केवळ जडापुरतेच मर्यादित नसून त्या पलीकडील मन, बुध्दी आणि जीवात्म्यापर्यंत असते. निर्यातीद्वारे प्राप्त शरीर, जीवात्मा आपल्या संपूर्ण होण्याच्या जीवन यात्रेकरिता वापरत असतो. उत्क्रांती जडाची होत नसून त्याद्वारे स्वत:च्या उन्नतीकरिता जीवात्मा प्राप्त शरीराची पुनर्रचना करीत असतो. जडाची मागील अवस्था नष्ट होऊन त्याद्वारे नवीन अवस्था प्राप्त झाल्यास जडाची ती मूळ अवस्था अथवा गुण कायम नसतात. प्राणवायू आणि उदजनाद्वारे पाणी तयार झाल्यानंतर त्या वायुंचे मूळ स्वरूप अथवा घटना कायम नसते. परंतु समाधी अवस्थेत मस्त झालेला साधक पुन्हा शरीरभावावर आल्यास त्याला पूर्वीपेक्षा अधिक ज्ञान होत असते. हे ज्ञान त्याच्या उत्क्रांत शरीररचनेद्वारे प्राप्त होत असते आणि ज्ञान प्राप्त करणारा जीवात्माच असतो. जडाला प्रबोधन काय होणार? ज्ञान प्राप्तिकरिता शरीरापेक्षा जीवात्म्याचीच आवश्यकता असते आणि प्रत्येक उत्क्रांत अवस्थेच्या वेळेस जीवात्मा आपल्या शरीरासकट अधिक उन्नत अवस्था प्राप्त करीत असतो. शरीराद्वारे होणाऱ्या कर्माचा परिणाम जीवात्म्यावर होत असतो आणि उत्क्रांत जीवात्मा त्याच शरीराचा उपयोग अधिक उत्क्रांत अवस्थेकरिता करीत असतो. असे उत्क्रांतीचे चक्र सतत चालू असते. शरीराद्वारे झालेली नंतरच्या उत्क्रांत अवस्थेची कर्मे पूर्वीपेक्षा अधिक उन्नत व उत्क्रांत असतात. म्हणून उत्क्रांतीची वाटचाल दोन समांतर रेषांप्रमाणे होत असते. एक शरीराद्वारे जीवात्म्याची उत्क्रांती आणि दुसरी उत्क्रांत जीवात्म्याद्वारे शरीराची उन्नती ! उत्क्रांतीचा लाभ जीवात्म्यालाच होत असतो, जो जन्मजन्मांतराच्या अनेक संस्काराचे गाठोडे घेऊन नवीन जन्म घेत असतो. दाढ़ी वाढू नये म्हणून आपण दाढी करतो. आपली मनापासून इच्छा असते की दाढीचे केस वाढू नयेत; पण शरीराचा धर्म सुटत नाही. दाढी वाढतच असते ज्यामुळे आपल्याला दाढी करावीच लागते. परंतु समाधी अवस्थेत सर्व शरीर प्रकृती नियमांच्या वर असल्यामुळे नखवर्धन अथवा केशवर्धन होत नसते या अवस्थेत सर्व शरीर जीवात्म्याचे उच्च अवस्थेशी समरस झालेले असते.

               आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मन आपल्या अवस्थेत गुंग असले म्हणजे शरीराच्या क्रिया त्या मनाच्या अवस्थांना धरून आपणहून होत असतात. असल्या क्रियांना मुद्रा असे म्हणतात. मुद्रा आपणहून होत असतात. प्रसन्नता, क्रोध, दया, समाधान इत्यादी मनाच्या अवस्था असल्यास शरीर त्या अवस्थांना धरून मद्रा करीत असते. तसल्या मुद्रा आपण बळेच करीत नसतो. त्या आपोआप होत असतात. बुध्दी स्तरावर चिंतन चालू असल्यास डोळे अर्धोन्मिलीत होऊन शून्य भावात जात असतात आणि जीवात्मा अती खोल ध्यानावस्थेत अथवा त्यापलीकडील समाधी अवस्थेत गेला असल्यास सर्व शरीर स्थिर बनून मुद्रासुध्दा होत नसतात. म्हणून गतीच्याही पलीकडे जाणाऱ्या अगस्त्यरूप महान योग्याची पत्नी लोपामुद्रा दाखविली आहे. शरीराशिवाय जीवात्मा कार्य करू शकत नाही हे खरे आहे, म्हणून जीवात्म्याचे उच्च उत्क्रांत अवस्थेला धरून वागण्याकरिता शरीरही तितकेच उच्च उत्क्रांत असणे आवश्यक असते. जगातील सर्व दूरश्रवण केंद्रांवरून गाणी अथवा माहिती प्राप्त होण्याकरिता रेडिओ उपकरणही तेवढेच उच्च हवे. स्थानीय रेडिओच्याद्वारे जगातील सर्व केंद्रांचे कार्यक्रम ऐकू येणार नाहीत. उच्च अथवा नीच कर्माचा मूळ स्त्रोत जीवात्मा असला तरी शरीरही त्याला कारणीभूत असते. म्हणून योगशास्त्रात शरिरोन्नतीला सर्वप्रथम स्थान असते. शरीररूप उपकरण उत्क्रांत झाल्याविना योगमार्गात प्रगती असंभव असते. म्हणूनच शास्त्रे स्पष्ट सांगतात,

‘शरीरम्  आद्यं खलु धर्मसाधनम्’

उन्नत शरीर आणि उन्नत सवयी :

               निरोगी आणि शक्तिशाली शरीर योगसाधनेकरिता आवश्यक आहे. असले शरीर सुयोग्य आसने आणि प्राणायामाद्वारे प्राप्त होऊ शकते. शरीराला त्याहीपलीकडील अधिक उन्नत आणि शुध्द अवस्थेत न्यायचे असल्यास ध्यान प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. म्हणून सर्व योगसाधनेत आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि ध्यानसाधनेला फार महत्व आहे. ध्यान आणि समाधी अवस्थेत विश्वातील अनंत शक्तींचे दिव्य कर्षण योग्याच्या शरीरात होत असते. असल्या प्रकांड शक्तिकर्षण अवस्थेला धरून योग्याचे शरीर उन्नत नसल्यास ते शरीर नष्टभ्रष्ट होऊन योग्याला अतीशय वेदना सहन कराव्या लागतात. त्या दिव्य शक्ती योग्याच्या शरीराद्वारे संचालित झाल्यास योगी परम अवस्थेला जाऊन परम शक्तिशाली होत असतो. त्याच्या शरीराचा तसल्या उच्च धारणेस अडथळा होत असल्यास शरीरासकट योगी अधोगतीला जात असतो. म्हणून योग मार्गात प्रथम शरीराकरिता साधना करायच्या असतात. त्याकरिता खाण्यापिण्याच्या सवयी, मनाच्या सवयी, बुध्दीच्या सवयी आणि स्वैराचारावर नियंत्रण आणावे लागते. अथवा प्राप्त झालेल्या प्रचंड विश्वशक्तींचे संकलन न झाल्यास साधकाला वेडेपणसुध्दा येऊ शकते अथवा तो अत्याचारसुध्दा करायला सिध्द होत असतो. 

लेखक - योगिराज मनोहर हरकरे   

अधिक माहितीसाठी संपर्क- ९७०२९३७३५७ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी