कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 12
प्राणायाम आणि प्रत्याहार बुध्दीला शक्ती प्रदान करू शकतात. म्हणून आसनानंतर प्राणायामाचे महत्व योग शास्त्रात फार आहे.
प्राणायाम
आपल्या ऋषिमुनींनी आपल्या शरीराचा बारीकसारीक अभ्यास केला. त्यांनी असे पाहिले की आपल्या शरीरात कणाकणात प्राणशक्ती संचरून आहे. हीच प्राणशक्ती सर्व विश्वात संचारलेली आहे. ‘पिंडी ते ब्रम्हांडी’ या न्यायाने आपल्या पिंडातील या प्राणशक्तीवर नियंत्रण आणून त्याची शक्ती वाढविल्यास योगी आपल्या शरीरासह सर्व विश्वावर नियंत्रण आणू शकतो. त्यांना असे आढळून आले की आपल्या शरीरात दोन प्रकारच्या मज्जासंस्था आणि त्याबरहुकूम वागणाऱ्या स्नायूसंस्था आहेत. त्यांना इच्छानुवर्ती आणि अनिच्छानुवर्ती असे म्हणतात. हाता-पायांच्या हालचाली इच्छेनुसार आपण करू शकतो. तर हृदय आणि तत्सम अवयवांचे संचालन आपण करू शकत नाही. फुप्फुस हा असा अवयव आहे की तो अनिच्छानुवर्ती तर आहेच पण अधिक ताण दिल्यास तो इच्छानुवर्ती सुध्दा होऊ शकतो. अधिक ताणून धरल्यास श्वास आपोआप सूरू होतो. या फुप्फुसावर अभ्यासाने नियंत्रण आणता आल्यास आपण आपल्यातील सर्व प्राणशक्तींवर नियंत्रण आणू शकतो असे ऋषिमुनींनी पाहिले, त्यामुळे या फुप्फुसाच्या व्यवहारावरच कुशलतेने नियंत्रण आणण्याचे शास्त्र त्यांनी शोधून काढले. या श्वासांवर नियंत्रण ठेवण्याच्या शास्त्राला त्यांनी प्राणायाम असे नाव दिले. ‘प्राण’ म्हणजे प्राणशक्ती आणि ‘आयाम’ म्हणजे त्यावर नियंत्रण ठेवून त्याची शक्ती अधिक वाढविणे होय. इंजिनमधील इतस्ततः वाहून जाणारी वाफ नियंत्रित ठेवून तिला एकाच मार्गाने सोडले तर तिची पूर्वीची शक्ती वाढून ती प्रचंड ओझे वाहून नेऊ शकते असे त्यांनी पाहिले. म्हणून प्राणायामाच्या सर्व प्रक्रिया श्वासावर नियंत्रण आणणाऱ्या आहेत .
प्राणायाम उत्तम साधल्यास ध्यान आपोआप लागते तर ध्यान साधल्यास प्राणायाम आपोआप होऊ लागतो. प्राणायामाचे बारा तेरा प्रमुख प्रकार आहेत. सर्वच प्राणायाम शरीरस्वास्थ्य आणि मनस्वास्थ्याच्या दृष्टीने उत्तम आहत. परंतु कुंडलिनी जागृतीच्या दृष्टीने शेवटचे दोन प्राणायाम महत्वाचे आहेत. एकूण प्राणायाम असे आहेत - दीर्घश्वसन, उज्जायी, भ्रामरी, कर्ण भ्रामरी,लघु भस्त्रिका.दीर्घ भस्त्रिका , जिव्हा शीतली, दंतशीतली, षण्मुखी, लोम अनुलोम आणि लोमविलोम किवा कुंभक प्राणायाम होय. कुंभक प्राणायामाचे पुन्हा दोन प्रकार असतात. एक अंत:कुंभक म्हणजे हवा आत कोंडून ठेवणे, तर दुसरा बहि:कुंभक म्हणजे पूरक व रेचक केल्यानंतर श्वासच आत न घेणे होय. दोन्हीपैकी कोणतातरी एकच प्राणायाम करावा. कोणताही प्राणायाम आणि त्यातल्या त्यात कुंभक प्राणायाम योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये, अन्यथा त्यापासून लाभ होण्याऐवजी हानीही होऊ शकते.
लोमविलोम अथवा नाडीशुद्धी प्राणायाम
डावी नाकपुडी बंद ठेवून उजवी चालू ठेवावी. नंतर उजव्या नाकपुडीने श्वास आत हळूहळू घ्यावा. पूर्ण श्वास आत घेतल्यावर त्याच उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडावा. श्वास आत कोंडू नये. सुरवातीला श्वास उच्छवासाची गती मंद असावी. असे पाच सहा वेळा झाल्यास श्वास उच्छ्वासाची गती पूर्वीपेक्षा थोडी वाढवावी. असे पाच सहा वेळा झाल्यावर पुन्हा श्वास-प्रश्वासाची गती पुन्हा अधिक वाढवावी. अशा रीतीने प्रत्येक गती पाच सहा वेळा झाल्यावर श्वासोच्छ्वासाची गती अधिक तीव्र करावी. नंतर डावी नाकपुडी उघडी करून उजवी बंद ठेवावी. डावीने पूर्वीसारखा मंद, शीघ्र, अतिशीघ्र श्वासोच्छ्वास घ्यावा. नंतर उजवीने श्वास घ्यावा व डावीने श्वास सोडावा. त्यानंतर डावीने श्वास घेऊन उजवीने सोडावा, हवा आत कोंडू नये. असे पाच सहा वेळा झाल्यावर उजवी डावी व डावी उजवीने प्राणायाम केल्यावर प्राणायामाची गती पूर्वीसारखी शीघ्र अतीशीघ्र करावी. या प्राणायामामुळे नाडीशुद्ध होऊन छातीत विलक्षण शक्ती येते आणि इंद्रियातील संयम शक्ती वाढते. सर्व प्रकारच्या खेळाडूंनी हा प्राणायाम रोज केल्यास ते खेळ खेळताना अथवा धावताना लवकर थकणार नाहीत. नाडीशुध्दी झाल्याने योगमार्गात लवकर प्रगती होऊ शकते.
लोम अनुलोम अथवा कुंभक प्राणायाम
उजव्या हाताची पहिली दोन बोटे उजव्या नाकपुडीवर, मधले बोट नाकाचे धारेवर तथा शेवटची दोन बोटे डावे नाकपुडीवर ठेवावी. प्रथम उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन आत कोंडावा. डाव्या नाकपुडीने तो श्वास बाहेर सोडावा. नंतर डावीनेच श्वास घेऊन श्वास आत कोंडावा व उजवीने श्वास बाहेर सोडावा. श्वास घेण्यास पूरक, श्वास आत कोंडण्यास कुंभक व श्वास बाहेर सोडण्यास रेचक असे म्हणतात. पूरक, कुंभक व रेचक यांचे कालमात्रेत १:४:२ असे अंतर असावे. ५ सेकंद पूरक केल्यास २० सेकंद कुंभक तर १० सेकंद रेचक करावा. एका बैठकीत ५ वेळा असा अभ्यास रोज करावा. कालमात्रा मोजण्यास घड्याळ अथवा टाळी वाजवू नये. त्याकरिता ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा मनात जप करावा. एकदा ‘ॐ नमः शिवाय’ म्हणण्यास ५ सेकंद कालावधी लागतो. असे चार वेळ ‘ॐ नमः शिवाय’ मनात जपल्यास वीस सेकंद कुंभक तर तर दोन वेळ मनात जपल्यास १० सेकंद रेचक होऊ शकतो. असा प्राणायाम रोज एका बैठकीत ५ वेळा काही महिने चालू ठेवावा. प्राणायाम करताना पद्मासनावर बसून पोटात काहीच नसावे. मेरूदण्ड सरळ असावा.
कुंडलिनी जागृतीकरिता प्राणायामाच्या एवढ्याच मात्रा पुरेशा नाहीत. पलीकडील काळात पुरक व रेचकाच्या मात्रा १ : २ ठेवून मधील कुंभक हळूहळू वाढवावा. प्रथम अवस्थेतील अंत:कुंभक ४, काही महिन्यांनंतर अंत:कुंभक ५ करावा. काही महिन्यांनंतर अंत:कुंभक ६,७,८,९,१०,११ व १२ करावा. अशी कुंभक मात्रा काही महिने चालू ठेवावी. मधील कुंभक कितीही वाढविला तरी पूरक व रेचकाची मात्रा तीच १:२ अशीच असावी. पुनः सततच्या प्रदीर्घ अभ्यासाने कुंभकाची मात्रा क्रमागत १६,२०,२४,२८ व ३६ करावी.परंतु सुयोग्य गुरूंशिवाय प्राणायामाचा हा टप्पा गोठू नये. अन्यथा शरीरात दोष उत्पन्न होऊ शकतो. असा १:३६:२ प्राणायाम साधल्यास केवल कुंभक साधून योगी श्वासा शिवाय बराच काळ राहू शकतो. अशा श्वासरहित केवल अवस्थेत प्राणशक्ती निर्बुजुन कुंडलिनी जागृती आपोआप होते.
कुंडलिनी जागृत होताना अनेक जीवघेणे अनुभव येतात. ते अनुभव पचवावे लागतात. अध्यात्म क्षेत्रातील पलीकडील दिव्य अनुभव त्यानंतर येत असतात. कुंडलिनी जागृती म्हणजे गम्मत नव्हे. पेशीपेशीतील गुणाणुरचना बदलून सर्वांगसाधनेला उपयुक्त अशी नवीन उत्तम गुणरचना पेशीपेशीत होत असते. त्या अनुभवांचा तपशील पुढे येईलच पण आवश्यक ते सध्या पाहू.
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
अधिक माहितीसाठी संपर्क –९७०२९३७३५७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा