कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 18
सूर्यचंद्राच्या दर्शनाद्वारे त्यांचा नादही ऐकू येऊ शकतो. त्यामुळे साधक एका दिव्य नादानुसंधान अवस्थेत धुंद असतो. योगमार्गातील अनुभव दोन प्रकारचे असतात. एक शब्दानुविद्ध व दुसरा दृश्यानुविद्ध. सूर्याचा नाद, सागरांच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात तसा जवळपास असतो.चंद्राच्या नादाची बरोबरी करणारा दुसरा नाद व्यवहारात नाही. तरीपण रातकिड्यांच्या नादासारखा तो असतो असे म्हणता येईल. ताऱ्यांच्या प्रकाशासह ताऱ्यांचे मंजूळ नाद ऐकू येतात. विविध रंग, विविध नाद असल्या नादांना अनाहत नाद असे म्हणतात. जे नाद कधीच नष्ट होत नाहीत. त्यांना अनाहत नाद असे म्हणतात. मुंगीचा चालण्याचा जो नाद तयार होत असतो तोही योगी ऐकू शकतो. म्हणूनच योगीसंत कबीरजी म्हणतात, ‘चींटीके पाँवमे घुंगरू बाधें, वो भी साहेब सुनता है’ झुरळासारख्या किड्यांचे लयबद्ध वृंद संगीत ऐकायला मिळते. फुलातील पराग पृथ्वीवर पडताना जो दिव्य मंद नाद येतो, तोही योगी ऐकू शकतो. असल्या नादब्रह्मात सदा तल्लीन झाल्यामुळे योगी आपल्याच दिव्य विश्वात मग्न असतो. त्यांना पोषाख, व्यवहार व खाण्यापिण्याचीही शुद्ध नसते.
दृश्यानुविद्ध आणि शब्दानुविध्द अवस्थांचा अनुभव व्यवहारात दोन प्रकारे येऊ शकतो. समजा आपण महाभारतातील कथा ऐकत आहोत. ऐकत असताना तंद्री लागून डोळे आपोआप बंद पडतात व साधक त्या कथांना चित्र दृष्याने बघत असतो. या अवस्थेत त्यांना ऐकू येत नाही. ऐकण्याऐवजी तो दृश्य बघत असतो. याला दृश्यानुविद्ध अवस्था म्हणतात. काही साधक दृष्यस्वरूप बघत असता चित्ताची एकतानता होऊन त्या दृश्याऐवजी कथांचे प्रसंग नादरूपानेच ऐकत असतो. या अवस्थेला शब्दानुविद्ध अवस्था म्हणतात. एकाच वेळी दोन्हीही अनुभव येणे कठीण असले तरी शक्य असते. याला उभयविद्ध अवस्था असे म्हणतात. आपण व्यवहारात एकाच वेळी पाहू शकतो आणि ऐकूही शकतो परंतु असल्या व्यावहारीक अनुभवापेक्षा उभयविद्ध अवस्था बरीच उच्च असते. त्याचा अनुभव सांगणे शब्दापलिकडील काम आहे.
याचा आशय असा की योग्याचे चित्त दृश्याचे वितरण शब्दात तर शब्दाचे वितरण दृश्यात करू शकते. आजच्या बोलपटात याच तत्त्वाचा उपयोग केला आहे. चित्रपटातील घटनांचे चित्रण एका फिल्मवर केले जाते. त्याच्या एका बाजूला घटनातील नाद अथवा संवादाचे रूपांतर प्रकाशलहरीत करून त्याची छायाचित्रणे त्या फिल्मच्या एका अंगाला रेषा -रुपात केली जाते. त्या रेषा-रूपातून प्रकाश पाडून पलिकडच्या विद्युत बल्बवर त्याचा स्वीकार केला जातो. तो विद्युत बल्ब मग त्या किरण प्रकाशाचे रूपांतर पुन्हा नादात करतो. त्यामुळे घटनेद्वारे प्रकाशात रूपांतर होणाऱ्या प्रकाश लहरींचे पुन: नादात रूपांतर होऊन प्रेक्षक दृश्यासह बोलणेही ऐकू शकतात. योगी असलाच व्यवहार बाह्य उपकरणाशिवाय करू शकतो. परमाणू न फोडतासुध्दा योगी त्या परमाणूतील भयानक प्रकाश व भयानक उष्णतेचा अनुभव घेऊ शकतो. असे अणु-परमाणूत प्रकाश व नादाचे दिव्य सूक्ष्म व्यवहार चालू असतात. ते दिव्य नाद आणि प्रकाश योगी सतत ऐकू शकतो. पाहू शकतो. असल्या प्रकाश व नादाचे ब्रह्मात योगी सदा मग्न राहू शकतो. पंरतु असल्या दिव्य नाद ब्रह्मात सदा तल्लीन असण्यापेक्षा समाजातील सुखदुःखात समरस होऊन त्यांची सुखदुःखे दूर करणारा योगीच खरा योगी होय. सिद्धार्थ गौतमबद्ध असेच सांगत असत. ते म्हणायचे, ‘तुला स्वर्ग, नरक व दिव्यानुभूतींशी काय करायचे आहे ? तू आपली दुःखे दूर करण्याचा प्रयत्न कर’.
दूर श्रवण :
योग्याने आपले चित्त दूरच्या घटनेवर एकाग्र केल्यास दूरचे ऐकू येऊ शकते. काही योग्यांना दूरश्रवणाचे दिव्य अनुभव येतात. येऊ शकतात. सहस्त्रावधी अंतरावरील घटना त्याला तत्काल ऐकू येऊ शकतात, असा अनुभव स्वामी विवेकानंदांना सुद्धा आला होता. ते न्यूयॉर्कला असताना त्यांच्या कलकत्ता स्थित मित्रांनी त्यांच्याबद्दल अयोग्य चर्चा केली. ती विवेकानंदांना न्यूयॉर्कमध्ये आपोआप ऐकू आली. योग्यांना हे अनुभव नित्याचे असतात. आयुर्वेदाचार्य सुश्रुतांचा असा दिव्य श्रवणाचा अनुभव तर त्यांच्या नावातच ग्रंथित केला आहे. त्यांचे नावच ‘सु’ म्हणजे उत्तम आणि ‘श्रुत’ म्हणजे ऐकलेला असेच ठेवण्यात आले होते. दूरस्थ आवश्यक वल्लींशी आपले चित्त एकाग्र केल्यास त्या त्या वल्लीतील गुण सुश्रुतांना आपणहून ऐकू येत असत. त्या गुणांचा उपयोग ते औषधात करून घेत असत. वल्लींचा प्रत्यक्ष प्रयोगशाळेत प्रयोग न करता त्यांना त्या वल्लीचे गुण आपोआप कानात सांगितल्याप्रमाणे कळत असत. दूरश्रवण शक्तीचा सुंदर उपयोग क्वचितच इतरत्र झाला असेल. वैदिक परंपरा, समाजोन्मुख व बुद्धिप्रधान आहे. आपल्या कानाच्या पडद्यातील क्षमता दर क्षणाला २० ते २०,००० कंपनापर्यंत नाद ऐकण्याची आहे. ती अधिक वाढवून दूरश्रवणाची किमया सिद्ध होते. २० च्या खालील कंपने नाशकारक तर २०,००० वरील कंपने उत्पादक असतात.
गंधारग्राम:
भारतीय संगीतात ‘गंधारग्राम’ नावाची एक स्वररचना आहे. तिचा कुशलतेने उपयोग केल्यास गानयोगी आपल्या स्वराद्वारे वस्तुसंधारण अथवा वस्तुपरिवर्तन करू शकतो. असे संगीत शास्त्रात वर्णन केले आहे. प्रत्येक अणू परमाणुतील ओतप्रोत स्वतःभोवती भ्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या घटनेला धरून त्यांचा एक नियत नाद येत असतो. तसला वृंदनाद बाह्य उपायांनी उत्पन्न करता आल्यास गानयोगी त्या वस्तु उत्पन्न करू शकतो आणि उलट प्रक्रिया केल्यास त्यांचे अन्य वस्तूत रूपांतर सुद्धा करू शकतो. गांधर्व गायन असेच होते व आज प्रयत्न केल्यास असू शकते. गंधार ग्रामाची रचना सध्या चालू असलेल्या षडजग्रामापेक्षा एकदम विभिन्न आहे. षडजग्रामाची सवय असणाऱ्यांना गंधार ग्रामाचे स्वर बेसूर वाटतील. गंधारग्रामाच्या श्रुतीही विभिन्न आहेत. गंधारग्रामाचा सतत अभ्यास करून तसल्याच बेसूर वाटणाऱ्या स्वरांना सिद्ध करून गायन केल्यास ते गंधर्व संगीत निश्चितच उत्पादक राहील यात शंका नाही. असले दिव्य गंधर्व गायन आज अस्तित्वात नाही. प्रयत्न केल्यास तसला प्रकार अंमलात आणता येईल.
गायनात स्पर्शगुण :
गायक योग्यतऱ्हेने गायल्यास त्याच्या गायनातून स्पर्श गुण सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. भगवान गोपालकृष्णांच्या रासक्रीडेचे असेच वर्णन आहे. टिपऱ्या वाजवून गाणे म्हणणाऱ्या प्रत्येक वृत्तीरूप गोपीला कृष्णाचा प्रत्यक्ष स्पर्श जाणवत असे. गायनाद्वारे प्रकट प्रस्फुट होणारा तो दिव्य स्पर्श म्हणजे सर्व रसांची रासक्रीडा होय. स्वत:त रममाण होऊन दिव्य गायनात गुंग होणाऱ्या गायक व श्रोत्यांना असल्या दिव्य स्पर्शाने पुलकित झाल्याचा दिव्य आनंद येतो.
लेखक - योगिराज मनोहर हरकरे ९७०२९३७३५७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा