कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 1

 कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान

               आजचे जग सुखाकरिता आसुसलेले आहे. कोणीकडून तरी सुख प्राप्त व्हावे या कल्पनेने प्रत्येकजण सारखा धडपड करत असतो. सुखाची साधने शोधली जात आहेत आणि त्याकरिता विज्ञानाचा भरपूर उपयोग केला जात आहे. नवे नवे शोध लागत असून त्याद्वारे मानवी जीवन अधिक सुखसंपन्न व आरामात ठेवण्याचा अखंड प्रयत्न चालू आहे. त्याबरोबरच युद्धतंत्राची अकाट्य वाढ होऊन मानवी जीवन एका क्षणात संपुष्टात आणण्याची शस्त्रेही प्राप्त झाली आहेत. जगातील राजकारण्यांची वृत्ती संतुलित न राहिल्यास जगाचा नाश कोणत्याही क्षणी होऊ शकतो अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली असून त्यावर काय तोडगा काढावा याचाही विचार समाजाच्या स्वास्थ्याची चिंता असणारे चिंतक करीत आहेत. सद्बुध्दी व सद्विचार मनावरच अवलंबून असल्यामुळे मन:स्वास्थ्य कसे लाभेल याचा विचार व आचार प्रामुख्याने समोर येत आहे.

               पूर्वकालात धर्माच्या नावावर जेवढी युद्धे आणि त्यात जेवढा नरसंहार झाला, तसला अन्य कोणत्याही कारणाने झाला नसेल. वास्तविक परमेश्वराची प्राप्ती, त्यासाठी लागणारा मनाचा संयम आणि सामाजिक प्रेम या करिताच सर्व धर्मांचे अवतरण झाले आहे; पण त्याच धर्माला मानवाने नरकाचे द्वार करून सोडले आहे. सुशिक्षित मानव आता धर्माकडे फारसा आकृष्ट होत नाही, याचे कारण त्या त्या धर्मवचनातील फोलपणा व धर्माधिकाऱ्यांचा द्वेषमूलक धर्मप्रचार होय.

               मन:स्वास्थ्याबरोबर शरीरस्वास्थही प्राप्त व्हावे असा प्रयत्न या शतकात होत आहे. याचा शोध घेता घेता जगातील विद्वानांना असे आढळून आले आहे की, भारतीय योगशास्त्रात शरीर स्वास्थ्यासह मन:स्वास्थ्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य असून ते शास्त्र कथित धर्मसंप्रदायांच्या विषारी वातावरणापासून संपूर्णपणे अलिप्त आहे. केवळ सुखाची साधने वाढवून शरीर व मनाचे स्वास्थ्य व संतुलन न वाढता उलट शरीर व मन दुर्बळ आणि विकारी होत चालले आहे , असे आढळून आले आहे. कोणत्याही संप्रदायी धर्माची छाप नसलेल्या योगशास्त्राकडे आखिल विचारी मानव जगतात विलक्षण आकर्षण वाढत चालले आहे जगातील सर्व स्थानी योग मार्गाची केंद्रे स्थापन होऊन त्याचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती वाढत आहेत.

               योगसाधनेतील आसने व प्राणायाम पध्दतीमुळे शरीर व मन:स्वास्थ्य तर लाभतेच; पण साधकाचे शरीर अधिक निरोगी व स्वस्थ होऊन साधकाचे शरीर त्याच्या असलेल्या वयापेक्षा कितीतरी कमी भासते याचाही अनुभव योग साधकांना येत आहे. आसन, ध्यान, प्राणायामादी योगसाधना केल्याने कमी वय भासणारी व आकर्षक शरीर असणारी अवस्था प्राप्त होऊ शकते असे आढळून आल्यामुळे स्त्री जातीत योगमार्गाचा प्रचार सर्वत्र वाढत आहे. बेडौल, लठ्ठ शरीरे, सुडौल व प्रमाणबद्ध होऊन प्राणायामामुळे मुखावरील कांती वाढते असे आढळून आले आहे. या योगसाधनांची पलीकडील उच्च पायरी म्हणजे कुंडलिनी जागृती असून त्याद्वारे विलक्षण सामर्थ्य आणि सौंदर्य प्राप्त होत असते असे आढळून आल्यामुळे सध्याच्या काळात कुंडलिनी जागृतीबद्दल विलक्षण कुतूहल उत्पन्न झाले आहे. याचा लाभ उठविण्यासाठी अनुभव नसताना सुद्धा कुंडलिनी जागृत करण्याचे आमिष दाखवणारे बरेच तथाकथित महाराज, भगवान, माताजी समोर येऊन आपापल्या शाळा स्थापन करीत आहेत. सुख समृध्दी व अध्यात्म मार्गातील आतुरतेमुळे बरीच माणसे या कुंडलिनी विषयाकडे आकर्षित होत आहेत. या विषयावर बरीच पुस्तके लिहीली जात असून त्यांचा प्रचारही सारखा वाढत आहे.

सुखाचा शोध

              आजचे जीवन योग कल्पनांनी भारलेले दिसते; मग भारलेली व्यक्ती कोणत्याही देशाची अथवा धर्मसमाजाची असो. प्रत्येक जीवाची आणि विशेष करून मानवाची धडपड अशा सततच्या सुखाकरिता असल्यामुळे योगाबद्दल उत्पन्न झालेले आकर्षण हा सुखाच्या शोधातीलच एक भाग आहे. अनेक गुणाढय संशोधनांती आणि त्यांना धरून निर्माण केलेल्या सुखसाधनांनी आजचे जीवन भारीत झालेले असून या युगाला वैज्ञानिक युग असे म्हणतात. मानवाच्या हृदयात प्रज्वलित झालेल्या सुखाच्या आशेकरीता आजच्या वैज्ञानिक युगाद्वारे प्राप्त झालेली अनेक सुखसाधने त्या इच्छित सुखाला आधार होऊ शकतील असे वाटते. असल्या सुखसाधनांनी मनाची आणि चित्ताची शांती प्राप्त होईल, असे प्रत्येकाला वाटते. सुखसाधनांच्या अमाप वृध्दीमुळे उपभोग घेणाऱ्या प्रत्येकास क्षणभर विरंगुळा वाटला खरा, परंतु केवळ सुख-साधनांच्या उपभोगातून ते खरे आंतरिक सुख प्राप्त होईल, असा समज चुकीचा ठरला आणि त्याऐवजी या सुखसाधनांचीच सवय लोकांना लागल्यामुळे ती सुखे उपभोगणारा समाज अधिक दुर्बल आणि स्वस्थ जीवनाला घातक असा झाला आहे, असे दिसते.एखाद्या मासळीने पाण्याच्या प्राप्तीकरिता पाण्यात राहूनही बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करावा अथवा एखाद्या पक्ष्याने आकाशाचा शोध घेण्याकरिता आकाशात अनंत भराऱ्या माराव्यात, तद्वत लक्षावधी लोक सुखाच्या शोधाकरिता स्वत:च्या बाहेर कोठे तरी सुखाच्या आशेने पाहत आहेत. 

               अनेक शतकांपूर्वी होऊन गेलेल्या भगवान पतंजलींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या चित्तातच खरे  सुख अथवा समाधान आहे असे विचारांती दिसून येईल. सर्व आगंतुक संस्कारांचे साम्य अथवा समभाव आणि संस्कारांचे आधान म्हणजे आरोपण नष्ट झाल्यानंतरच खरे समाधान प्राप्त होत असते, असे भगवान पतंजली सांगतात. सुखाच्या शोधाकरिता आपण बाह्य सुखसमाधानाची भरमार करून त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या काल्पनिक सुख संस्कारांना आपल्यावर अधिपत्य गाजवू देतो. परंतु करमणुकीची साधने म्हणजे खरे चित्ताचे समाधान नव्हे, हे आपल्या लक्षातच येत नाही. असल्या कथित सुखसाधनांच्या वापरामुळे आपण आपल्या चित्तावर नवे नवे अनावश्यक संस्कार ग्रहण करून हृदयाच्या मूळ शांत अवस्थेपासून अधिक दूर जात असतो. असल्या अनावश्यक संस्कारांनी भारीत झालेल्या अंत:करणाला पुन्हा त्याचे शुद्ध स्वरूप प्राप्त करून देण्याचे कार्य अधिकच कठीण होऊन बसते. सुखाचा प्रत्येक नवीन शोध एखाद्या व्यसनाप्रमाणे मनाची जबरदस्त पकड घेतो आणि पूर्वीपेक्षा ते मन अधिक व्यसनी होऊन बसते. सुखाच्या शोधाकरता चाललेली ही शर्यत बाहेर कल्पिलेल्या सुखाकरिता आसुसलेली असते, त्यामुळे सुख अधिक दूर राहते.

               बुध्दिमान आणि शहाणी माणसे या निर्णयाप्रत आली आहेत की, सुख बाहेर नसून आतच आहे. आपल्या व्यवहारातून प्रत्येक क्षणी प्राप्त होणाऱ्या अनेक संस्कारातून आपल्या मूळ अस्तित्वाला धरून असलेले जे संस्कार असतील त्यांच्या गुणाढ्य अवस्थेला सुख असे म्हणतात. सुख प्राप्त करण्याकरिता आपल्या मूळ प्राकृतिक अवस्थेला धरून होणाऱ्या स्वधर्म संस्काराद्वारेच सुख प्राप्त होऊ शकेल आणि तसला प्रयत्न म्हणजेच सुखाचा शोध होऊ शकेल.

लेखक - योगिराज मनोहर हरकरे  

शब्दांकन – राजेश कोल्हापुरे –९७०२९३७३५७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी