सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र- 2
सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र- 2
*राधाबाईंचे दिवस भरले होते. त्यांची दाईसुध्दा सोबत होतीच. पौष महिना होता. मोकळे रान असल्याने कडाक्याची थंडी होती. सर्व वातावरण प्रसन्न होते. मक्याची व ज्वारीची कणसे शेतात डोलू लागली होती. पक्ष्यांची गोड चिवचिव सकाळ- संध्याकाळ राधाबाईंच्या कानी पडत होती. जवळच पाण्याचा खळखळाट वातावरणात अजूनच गोडवा निर्माण करत होता. संपूर्ण वातावरण एका प्रसन्नतेने भारले होते. जणू संपूर्ण निसर्गच एका श्रेष्ठ योग्याच्या परमेश्वरी अंशाच्या आगमनासाठी सजून-धजून सज्ज झाला होता. पौष शुध्द तृतीया आली आणि सकाळी राधाबाईंना थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. सोबत दाई व तीन मुली होत्याच. सगळ्यांना लक्षात आले की आता नवीन बाळ जन्माला येणार. राधाबाईंच्या प्रसूतिकळा हळूहळू वाढून माध्यान्हाच्या सूर्यापर्यंत अंतिम अवस्थेला जाऊन, बरोबर दुपारी बारा
वाजता, सूर्य त्याच्या पूर्ण तेजावस्थेत तळपत असताना राधाबाईंनी एका तेजस्वी पुत्ररत्नास जन्म दिला. पौष शुध्द तृतीया शके १८३६ अर्थात, २२ डिसेंबर १९१४ रोजी दुपारी १२ वाजता विश्वाच्या एका महान श्रेष्ठतम योग्याने राधाबाईंच्या कुशीतून जन्म घेतला आणि या जडजगतात अवतरण केले. राधाबाईंच्या पोटी जन्मलेले हे तेजस्वी बाळ म्हणजेच विसाव्या शतकातील श्रेष्ठतम योगीपुरुष 'योगी मनोहर' अर्थात, परमपूज्य योगिराज मनोहर हरकरे! धन्य तो क्षण, धन्य ती माता !
राधाबाईंच्या पोटी हे आठवे तेजस्वी बाळ जन्माला आले त्या वेळचे प्रत्यक्षदर्शी वर्णन आमच्या मोठ्या आत्या, ज्यांना बाईआत्या म्हणत असत, त्या अतिशय सुंदर शब्दांत करत असत. त्यांच्या या तेजस्वी भावाचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे शेतातील ज्वारीची कणसे अचानक डोलू लागली होती. ही कणसे डोलता - डोलता एकमेकांना स्पर्श करू लागली आणि एक सुंदर कमानीसारखा आकार घेऊ लागली. जणूकाही या तेजस्वी बाळाचे स्वागत या कमानीने ती कणसे करत असावीत. शीतल वारा वाहू लागला. वातावरण सर्वत्र प्रफुल्लित व आनंदी झाल्यासारखे वाटू लागले. अचानक सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळू लागला. एका महान योग्याच्या जन्माचा आनंदोत्सव निसर्गही आपल्या वेगळ्या पध्दतीने साजरा करत असावा.
राधाबाईंच्या या तेजस्वी बाळाचे तात्पुरते नाव 'बाळ' असे पडले. या तेजस्वी बालकाला सर्व 'बाळ' या नावानेच संबोधू लागले. श्रीकृष्णरावांनाही अतिशय आनंद झाला. श्रीकृष्णराव यांनी या बाळाचे तेज बघितल्यावर हे बाळ निश्चितपणे दैवी प्रसाद असल्याचे ओळखले. सर्वत्र आनंदीआनंद झाला आणि काही दिवसांनी प्लेगची साथ ओसरल्यावर श्रीकृष्णराव हे राधाबाई व आठ अपत्यांसह आपल्या घरी परतले. श्रीकृष्णरावांनी लागलीच युरोपला जायची तयारी सुरू केली.
योगी मनोहर हे त्यांच्या आईवडिलांचे आठवे अपत्य होते आणि त्यांचा जन्म गावाबाहेर दूर एका शेतात ऐन माध्यान्ही बारा वाजता होणे या सगळ्या दैवी, चमत्कारिक घटना त्यांच्या पुढील दैवी संत जीवनाचे संकेत देणाऱ्याच होत्या. आठ आणि बारा हा आकडा रामकृष्ण या देवतांच्या व अनेक संतमहात्म्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. भगवान रामचंद्रांचा जन्मही ऐन माध्यान्ही सूर्य तळपत असताना झाला होता. भगवान गोपालकृष्ण यांचा जन्म रात्री बारा वाजता आणि तोही बंदिगृहात झाला होता. भगवान गोपालकृष्ण हेसुध्दा त्यांच्या आईवडिलांचे आठवे अपत्य होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्मसुध्दा गोकुळाष्टमीला रात्री बारा वाजताच झाला होता अशी माहिती मिळते. बहुतेक संतमहात्मे, जे जगाच्या उध्दारासाठी या जगात येतात त्यांच्या जन्माबाबत हे चमत्कारिक योग जुळून आलेले असतात. येशू ख्रिस्तसुध्दा गाईच्या गोठ्यात जन्माला आले होते.
ऐन दुपारी बारा वाजता रामाचा जन्म होणे म्हणजे ज्ञानाचा तळपता सूर्य त्याच्या संपूर्ण ज्ञानावस्थेत असताना ज्ञानाची साधना करणाऱ्या चित्तात एका परमोच्च स्वर्गीय आनंदाचा जन्म होण्यासारखेच आहे. श्रीकृष्णाचा जन्मही रात्री बारा वाजता होणे म्हणजे मध्यरात्री ज्ञानसाधना करणाऱ्या ज्ञानसाधकाच्या चित्तात श्रीकृष्णासारख्या संपूर्णरूपी आनंदाचा जन्म होण्यासारखेच आहे. बारा हा आकडा अध्यात्मात पूर्णत्त्वाचा आकडा मानला आहे, तर आठ हा आकडा ज्ञानसाधनेतील अंतिम परिपक्व अवस्था दर्शविणारा आकडा आहे. योगाचे प्रकारसुध्दा आठच आहेत ज्यांना आपण अष्टांगयोग म्हणतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी हे अष्टांगयोग आहेत. यातील शेवटली आठवी पायरी म्हणजे समाधी अवस्था अर्थात, योगसाधनेची परिपूर्ण अवस्था होय. भगवान गोपालकृष्णाचे आपल्या आईवडिलांचे आठवे अपत्य असणे, योगी मनोहरांचेही आपल्या आईवडिलांचे आठवे अपत्य असणे, संत ज्ञानेश्वरांचा जन्मसुध्दा गोकुळाष्टमीचाच असणे या घटना या महान व्यक्तींच्या दैवी, ईश्वरी व्यक्तिमत्त्वांशी संबंधित असाव्यात असा संकेत ज्ञानवंताना या घटनाक्रमातून मिळत असल्यास ते अगदी योग्य आणि स्वाभाविक आहे. आठ आणि बारा हा आकडा ज्योतिषशास्त्रातही खडतर मानला आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास या सर्व व्यक्तींचे जीवनही अतिशय खडतर होते हेसुध्दा आपल्या लक्षात येईल. भगवान गोपालकृष्णांचे तर संपूर्ण आयुष्यच अन्यायाचा प्रतिकार करणारे खडतर आयुष्य होते. या खडतर जीवनाचा प्रवास त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच सुरू झाला होता. संत ज्ञानदेवांचे जीवनसुध्दा जन्मापासून नव्हे, तर जन्माच्या आधीपासून खडतर होते. योगी मनोहरांचे जीवनही किती खडतर होते है। त्यांचे चरित्र वाचल्यानंतर प्रत्येकाला समजणार आहे. एकूण म्हणजे संत व्यक्तींचे जीवनात बरेचदा काही अंशी साम्य असल्याचे जाणवते.
श्रीकृष्णराव आणि राधाबाई हरकरे हे आपल्या आठ अपत्यांसह अंबाझरीहून आपल्या घरी परतले आणि तडकाफडकी नवजात बाळाचे बारसेसुध्दा आटोपण्यात आले. बाळाचे नाव आईवडिलांनी प्रेमाने 'मनोहर' असे ठेवले. बाळाचे व्यवहारी नाव जरी मनोहर ठेवण्यात आले तरी त्यांचे घरगुती नाव मात्र बाळ राहिले व पुढे कित्येक वर्षे या बालकाला बाळ व नंतर बाळासाहेब याच नावाने ओळखले गेले या तेजस्वी दैवी बालकाचा (अर्थात, एका महान योगी श्रेष्ठाचा, योगी मनोहरांचा) देवी जीवनप्रवास आता इथून पुढे सुरू होणार होता. बालकाचे नाव 'बाळ' आता सर्वांच्या मुखात रुळू लागले. ठरल्याप्रमाणे श्रीकृष्णराव आपल्या नवजात बाळाला, राधबाईंना आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचा निरोप देऊन परदेशगमनाला निघाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा