सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - साधना (2)
------------------------------------
विशाल ब्रह्मराक्षसाचे दर्शन
------------------------------------
पिशाच अवस्थेच्या नंतरची अवस्था म्हणजे 'राक्षस अवस्था' असते. राक्षस अवस्थेतील शक्ती आणि क्षमता पिशाच अवस्थेपेक्षा जास्त असते. मानव आपल्या जीवनात जे कर्म करतो त्यातील सत्कर्मामुळे त्याला मृत्यूनंतर सद्गती मिळते, तर वाईट कर्मामुळे पिशाच, राक्षस, ब्रह्मराक्षस, कुष्माड अशा वाईट योनीत त्याला जावे लागते. अशाच राक्षस योनीचा अनुभव मनोहररावांना पवनीच्या साधनाकाळात आला. एकदा मनोहरराव मध्यरात्रीची वैनगंगा तीरावरील साधना आटोपून पहाटे घरी परतत असता एका देवीमंदिराजवळ आले. देवीच्या मंदिराजवळच झाडाखाली एक महाकाय ब्रह्मराक्षस बसलेला त्यांना दिसला. त्याचे शरीर अतिमहाकाय होते, डोळे मोठे एकदम लाल होते. त्याची नजर भयानक होती. मनोहरराव मात्र न घाबरता त्याच ठिकाणी उभे राहून त्याचेकडे बघू लागले. पराजगताचे काही अद्भुत अनुभव त्याला विचारण्याची मनोहररावांची इच्छा होती. परंतु तो ब्रह्मराक्षस काही बोलतही नव्हता आणि हलतही नव्हता. त्याचा श्वास अतिशय जोरात सुरू होता. तो काही बोलत नाही हे पाहून मनोहरराव जायला निघाले. वळून थोडी पावले चालल्यानंतर जेव्हा मागे बघितले तेव्हा मनोहररावांना तेथे कोणीच दिसले नाही. वेगवेगळ्या योनींचा हा अनुभव आणि माहिती पुढे मनोहररावांनी त्यांच्या जन्म-मृत्यू रहस्य' या पुस्तकात लिहून ठेवली आहे.
कुष्मांड दर्शन
एक दिवस मनोहरराव संध्याकाळी वैनगंगेच्या किनारी फिरत असता त्यांना एक मोठा आवाज आला. समोर बघितले असता त्यांचे समोरून एक गोलाकार जीव पुढेपुढे जात होता. त्याला कुठलेही अवयव नव्हते. हात नाही, पाव नाही तरीसुध्या तो पुढेपुढे जात होता. डोळे असल्यासारखे वाटत होते, पण प्रत्यक्षात त्याला डोळेही नव्हते. त्याच्या त्या गोलाकार शरीराची अतिशय दुर्गंधी येत होती. ही नीच अशी 'कुष्मांड' योनी आहे हे मनोहररावांनी तत्काळ ओळखले. कुष्मांड योनी ही पिशाचयोनीपेक्षाही अतिशय नीच अशी अवस्था असते. या योनीमध्ये मृत्यूनंतर जो आपल्या दुष्कर्माने जातो त्याला यातून युगायुगांपर्यंत सुटका नाही.. म्हणूनच मनोहरराव समर्थ रामदासस्वामींचे एक महत्त्वाचे वचन सर्व साधकांना सांगत असत. ते म्हणजे 'सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे'. मानवदेह मिळाल्यावर या देहाद्वारे सदैव सत्कर्मच करावे.
गंधर्व दर्शन व यक्षिणी दर्शन
गंधर्व दर्शन आणि यक्षिणी दर्शन असे दोन्ही अनुभव मनोहररावांना पवनीला आले होते. गंधर्व दर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव पुढे नागपूरलाही आला होता त्याचे वर्णन पुढे येईलच. पवनीला नित्याप्रमाणे स्नान वगैरे आटोपून मनोहरराव किनाऱ्यावरील शंकराच्या पिंडीजवळ ध्यान लावून बसले होते. ध्यानात त्यांना गंधर्व व अप्सरेचे सुंदर दर्शन झाले. गंधर्व व अप्सरा दोघेही अतिशय सुंदर बांध्याचे आणि दिसायला अतिशय सुंदर होते. त्यांचा रंग गुलाबी कमळासारखा सुंदर होता. त्यांना पाहिल्यावर असे वाटत होते की त्यांच्या शरीरात हाडे नसावीत. त्यांचा प्रत्येक अवयव अतिशय कोमल व सुंदर होता. ते दूर होते परंतु त्यांचा स्पर्श प्रत्यक्षपणे जाणवत होता. अतिशय मऊ, मखमली असा तो स्पर्श होता. त्यांच्या संपूर्ण शरीराचा अतिशय सुंदर दिव्य सुगंध येत होता. त्यांच्या त्या दिव्य सुगंधाने संपूर्ण वायुमंडळ भरल्यासारखे वाटत होते. ते स्वर्गीय स्वरांत काहीतरी गात होते. त्यांची भाषा संस्कृतसारखी वाटत होती, परंतु ती पूर्णपणे संस्कृत नव्हती. गंधर्व अप्सरेचे हे संपूर्ण दर्शनच अतिशय सुखावह असे होते.
गंधर्व अप्सरांप्रमाणेच यक्ष, यक्षिणी हेसुध्दा अतिशय सुंदर असतात. त्यांची शरीरयष्टी थोडी स्थूल असली तरी मादक असते. अशाच एका सुंदर यक्षिणीचे दर्शन मनोहररावांना याच ठिकाणी एकदा झाले. मनोहरराव ध्यानाला बसले होते. अचानक एक सुंदर, आकर्षक, स्थूल, पण मादक शरीराची दिव्य स्त्री त्यांचेपुढे येऊन उभी राहिली. ती यक्षिणी आहे हे मनोहररावांनी ताबडतोब ओळखले. तिच्या पायांचा स्पर्श जमिनीला होत नव्हता. ती इतकी सुंदर व सुडौल बांध्याची होती की कोणीही तिच्यावर भाळावे. तिच्या प्रगटण्यावरून वाटत होते की ती काहीतरी द्यायला आली होती. यक्ष, यक्षिणींना सिध्द करून त्यांच्याकडून धन, संपत्ती, सत्ता, भोग असे सर्व काही प्राप्त करता येते. मनोहररावांना मात्र या सगळ्याची गरज नसल्यामुळे त्यांनी यक्षिणीला काहीही मागितले नाही. ती बराच वेळ होती. नंतर अंतर्धान पावली. तिच्या दर्शनाने मात्र मनोहरराव अतिशय तृप्त झाले आणि नंतर घरी परतले. यक्ष गंधर्व हे भगवान शिवाचे अनुयायी असतात. म्हणूनच भगवान शिवाच्या दर्शनाच्या आधी यक्ष गंधर्व-अप्सरांची दर्शने होतात असे योगी मनोहर सांगत. या वेळी योगायोगाने त्यांची शिवाच्या पिंडीसमोरच साधना सुरू होती.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा