कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 2

 योगसूत्राचे महान लेखक भगवान पतंजली आपल्या चित्ताला प्रथम शांत करण्याच्या साधनेला फार महत्व देतात. पहिल्याच सूत्रात ते म्हणतात, ‘योग: चित्तवृत्ति निरोधः’ यात वापरलेला निरोध शब्दाचा आशय वृत्तींचा विरोध करणे अथवा वृत्तींना नष्ट करणे नसून त्यांना कुशलतेने आपल्या ताब्यात घेऊन त्यांचा विकास उत्तम कार्याकरिता करणे असा आहे. स्वतःच आपल्या चित्त-वृत्तींवर कुशलतेने संयम साधून चित्तावर आणखी बाह्य संस्काराचा पगडा न बसू देणे असल्या अभ्यासाला योगाभ्यास म्हणतात. असल्या प्रयत्नांनी चित्त अधिकाधिक शुध्द होत जाऊन त्यावर कोणतेच बाह्य संस्कार मुद्रित केले जात नाहीत. चित्त अथवा अंत:करण म्हणजे संपूर्ण सुखाचे शांत स्वरूप अथवा समाधानी अवस्था होय, असली चित्ताची शांत अवस्था एखाद्या शुद्ध शांत पाण्याप्रमाणे असते.असल्या शांत उदकातील खोल तळसुध्दा पहाणाऱ्याला दिसू शकतो. परंतु याच शांत पाण्यावर आघातामुळे उत्पन्न झालेली कंपने पाण्याचे मूळ स्वरूप बदलवून त्याच्या तळाशी असलेले शांत स्वरूप दिसू देत नाही. चित्ताची अशीच अवस्था असते. मनाद्वारे बाहेरून प्राप्त झालेले सर्व संस्कार नसण्याइतके शांत झाल्यास मनाच्या त्या मूळ अवस्थेला चित्त असे म्हणतात.

पूर्णत्वाकडे वाटचाल :

               असले संस्काररहित शुद्ध मन अथवा चित्त सामान्य माणसाच्या अनुभवाला न येऊ शकणारे दिव्य अनुभव घेऊ शकते. एखादी स्प्रिंग ताणून धरल्यास व नंतर त्यावरील ताण कमी करून ती सोडल्यास जशी ती आपणहून आपल्या मूळ अवस्थेत येते, तद्वत शुद्ध चित्त (संस्काररहित मन) त्याच्या मूळ अवस्थेत राहू दिल्यास ते आपणहून उत्क्रांतीच्या उच्च उच्च अवस्था प्राप्त करीत असते. गूढ अनुभव हे साधना मार्गावरील उत्क्रांतीची स्टेशने होत; पण त्याकरिता चित्ताला त्याच्या मूळ अवस्थेत येऊ द्यावे लागते. बाहेरच्या कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम अडथळ्याचा परिणाम होऊ न दिल्यास चित्त उत्क्रांतीच्या पूर्ण अवस्थेची आपणहून वाटचाल करीत असते. उत्क्रांतीचा असा दिर्घ प्रवास पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असतो.

               डार्विनच्या सिध्दांताप्रमाणे पूर्णत्वाकडे वाटचाल करणारा उत्क्रांतीचा असा दीर्घ प्रवास केल्यावर मनावर होणाऱ्या बाह्य संस्कारामुळे खचून न जाता, उलट त्यात एक विलक्षण शक्ती येते, जी आलेल्या बाह्य अडथळ्यांना जुमानत नाही. जडाच्या विरोधामुळे उलट ती पूर्णत्वाची वाटचाल अधिक तीव्र व शक्तीशाली बनविते. बाहेरील परिस्थितीशी आपल्या जड अस्तित्वाला जोडून घेणे व त्या परिस्थितीच्यावर जाऊन स्वतःची  उच्च उत्क्रांत अवस्था प्राप्त करणे याला उत्क्रांती असे म्हणतात. विख्यात वैज्ञानिक सर जेम्स जिन्स स्पष्टच म्हणतात (There are no events, we come across them) जगात घटनाच नाहीत. आपण असल्यामुळे त्या आपल्याला अनुभूत होतात.

जीवात्म्याची अथवा पिंडाची उत्क्रांती: 

               विद्युत भाराने व्याप्त तारेमध्ये सर्वत्र विद्युत प्रवाह सारखाच असतो: परंतु त्या विद्युत तारेची रचना विभिन्न तऱ्हेने केल्यास, तीच तार अन्य गुण दाखवत असते. आपण परमाणूला फोडून त्याचे रूपांतर ओतप्रोतात करू शकतो. त्यातील ओत आणि प्रोत त्याच गुणांचे असतात. आपण या ओतप्रोतांची ही सापेक्ष रचना अथवा अवस्था बदलू शकतो; परंतु ओतप्रोतातील असलेली सनातन उर्जाशक्ती मुळीच बदलू शकत नाही. मूळ पदार्थाच्या विभिन्न सापेक्ष अवस्थांमुळे गुणही बदलत असतात. म्हणून उत्क्रांतीतील विभिन्न गुण अवस्था मूळ पदार्थावर अवलंबून नसून पाहाणाऱ्याच्या सापेक्ष दृष्टिकोन अथवा अवस्थेवर अवलंबून आहे. म्हणून ज्ञान हा गुण जीवात्म्याचा आहे. जड शरीराचा नाही.

               यावरून असे दिसून येईल की, उत्क्रांतीद्वारे ग्रहण केले गेलेले संस्कार जीवात्म्यावरच परिणाम करतात. केवळ जड शरीरामुळे नव्हे ! जड रचनेला प्रकृती म्हणतात, तर त्या प्रकृतीचा खेळ साक्षी भावाने पहाणाऱ्या जीवात्म्याला पुरूष असे सांख्य शास्त्रात म्हटले आहे. योगशास्त्रात सांख्य तत्वज्ञान प्रमाण मानले आहे. यावरून असे दिसून येईल की, केल्या जाणाऱ्या सर्व योगसाधना जीवात्म्याकरिताच असतात. आपल्या उत्क्रांत संस्कार अवस्थेनुसार जीवात्मा आपल्या प्राप्त शरीराची आवश्यक अशी पुनर्रचना करून घेतो. शरीरातील प्रत्येक पेशीतील गुणाणुंची आवश्यक अशी फेररचना म्हणजेच कुंडलिनी जागृती                                                                                                                                           होय; जो आजचा बहुचर्चित विषय आहे. 

               कुंडलिनी जागृतीनंतरच दिव्य अनुभव येतात. यावर डायलेक्टिक्स वादावर प्रेम करणारे जडवादी असा तर्क करतात की, ‘शरीरातील प्रत्येक पेशीत जी रासायनिक अथवा पदार्थविषयक प्राकृतिक क्रिया-प्रक्रियांद्वारे कार्ये आपणहून प्रत्यही घडत असतात, त्यामुळे आपल्याला असे वाटते की, जीवात्मा नामक एक अवस्था असून त्याद्वारे शरीराची सर्व कार्ये घडत असतात. परंतु असे मानण्याचे कारण नाही’. हे खरे आहे की भूक, पचन, जठरातील रसोत्पादन संग्रहण, उत्सर्ग, घाम येणे, मूत्र विसर्जन, रक्ताभिसरण, भय, क्रोध, प्रेम, द्वेष आणि कामवासनासुध्दा शरीरातील होणाऱ्या रासायनिक अथवा पदार्थविषयक घडामोडींचाच परिपाक होय. पशु-पक्षांमध्ये एक प्राकृतिक रीत दिसून येते. त्यांच्यापैकी एखादा जर इतरांद्वारे मार खात असेल, तर इतर पशु-पक्षी त्या मार खाणारा पशु-पक्षांवरच तुटून पडून त्याला आणखी मार देतात व जमल्यास त्याला मारून टाकतात. परंतु मानवांमध्ये याउलट प्रकार दिसून येतो. 

               एखादा मानव जर इतर मानवांकडून मार खात असेल, तर इतर बघणारे मानव त्या मार खाणाऱ्या मानवाचा पक्ष घेऊन त्या मार देणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील. मानवाची असली सहाय्य करण्याची वृत्ती इतर पशु-पक्षांमध्ये असलेल्या प्राकृतिक वृत्तीचा परिपाक नसून मानवाने स्वत:च्या उन्नत बुध्दीने त्याच्या मनावर जे संस्कार घडवून आणले आहेत त्यांचा हा परिपाक होय. मैथुनाच्या वेळेस इतर प्राणी मादीच्या जननेंद्रियाद्वारे प्रसृत होणाऱ्या स्त्रावाचा वास घेऊन मगच नर मैथुन उद्युक्त होत असतो. परंतु मानवाच्या बाबतीत असे नसते. मानवाचे कामवासनेचे व्यवहार केव्हाही होत असतात. प्राकृतिक अवस्थेच्यावर जाऊन मानव असला व्यवहार करीत असतो. त्याच्या बुध्दीद्वारे तो तसा अप्राकृतिकरीत्या वागत असतो. बलात्कार होणारी एखादी विचारवती स्त्री बलात्कार होण्यापेक्षा मरण पत्करते. उत्क्रांतीतील सामान्य वृत्तीच्यावर हे वागणे आहे. मग असली उच्च वृत्ती उत्क्रांत की अनुत्क्रांत ? असले वागणे पेशींमधील प्रक्रियांना धरून आहे की, त्यावर वागणाऱ्या सुसंस्कृत बुध्दीत आहे ? निश्चितच असली बुध्दीची झेप जीवात्म्याच्या उच्च विचारांना धरून आहे. प्राकृतिक आवश्यकता अथवा अवस्थांच्यावर जाऊन मानवाने असा उत्क्रांत व्यवहार स्वेच्छेने स्वीकारला आहे. असले सुसंस्कृत वागणे शरीर भावाच्यावर जाणाऱ्या जीवात्म्याच्या बुध्दीचा अविष्कार आहे असे मानल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

लेखक - योगिराज मनोहर हरकरे  

शब्दांकन – राजेश कोल्हापुरे –९७०२९३७३५७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी