सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - 3
बालपण व बालपणातील चमत्कारिक दिव्य घटना
सगळ्यांचा लाडका बाळ आता हळूहळू रांगू लागला होता. आईचा आणि मोठ्या बहीणभावंडाचा लाडका बाळ अतिशय लोभस होता. त्याला सांभाळणारे आता घरी बरेच सदस्य होते. दाईसुध्दा बाळचा अतिशय लाड करत असे. या दाईने बाळला आपल्या अंगावरचे दूधही पाजले होते. ती राधाबाईंच्या सर्व अपत्यांचा मनापासून सांभाळ करत असे. याच दाईला बाळच्या बाबतीत एकदा एक चमत्कारिक अनुभव आला. बाळला खेळवता-खेळवता एकदा या दाईला असे दिसले की, वीज लखलखल्याप्रमाणे बाळचे संपूर्ण शरीर अचानक तेजःपुंज झाले. दाईला अतिशय आश्चर्य वाटले आणि तिने लागलीच राधाबाईंनाही हा चमत्कार सांगितला. राधाबाईसुध्दा लगबगीने येऊन पाहातात तो काय! बाळ छान दोर्घीकडे पाहून हसत होता. जणूकाही काही झालेच नाही. दाई आणि राधाबाईंनी ओळखले की बाळ, अर्थात, राधाबाईंचे हे आठवे अपत्य परमेश्वरी अंश घेऊन जन्माला आलेले आहे. हे सामान्य बाळ नव्हते. दाईने तर राधाबाईंना लागलीच सांगून दिले की हा बाळ मोठेपणी फार महान संत होणार! यशोदेला कृष्णाच्या बालपणी जशा कृष्णाच्या चमत्कारिक लीला पाहायला मिळाल्या तशाच चमत्कारिक गोष्टी दाईला आणि राधाबाईंनाही या बाळच्या लहानपणी अनुभवास येऊ लागल्या. बाळ कधीकधी पडल्या पडल्या पायाचा अंगठाही चोखत असे. नंद बाबाने कृष्ण जन्मल्यानंतर कृष्णाला टोपलीत ठेवून धो धो पावसात यमुना पार केली होती या प्रसंगचित्रातही बाळकृष्ण पायाचाच अंगठा चोखताना दाखविले गेले आहे. राधाबाईंचा हा बाळसुध्दा पुढे संपूर्ण कृष्णजीवनच जगणार होता. अन्यायाला ठेचून पुढे जाणारे आर्य जीवन जगणार होता.
हळूहळू बाळ वाढू लागला. बाळचे रांगते पाय आता चालू लागले होते आणि दुडुदुडु धावू लागले होते. 'बाळ' पाय फुटल्यावर तर संपूर्ण घरभर दुडुदुडु धावत असे व आई-दाईला आपल्या मागे लावत असे. त्या काळात दत्त संप्रदायातले एक महान संत मोतीबाबा नुकतेच होऊन गेले होते. दाई बाळाला मोतीबाबाच म्हणत असे. तिला हा बाळ पुढे एक महान संत योगी होणार हे तेव्हाच कळले असावे. बाळ आता दोन वर्षाचा पूर्ण होऊन तिसरे वर्षही संपत आले असावे. राधाबाईंना श्रीकृष्णराव परत येण्याची आनंदी बातमी मिळाली आणि त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही.
श्रीकृष्णराव युरोपातून मायदेशी परतले
ठरल्याप्रमाणे श्रीकृष्णराव युध्दक्षेत्रात टपालसेवा देऊन मायदेशी नागपूरला परतले. बायको आणि आठ अपत्यांना तीन वर्षांनी ते भेटत होते. घरात सर्वत्र आनंदीआनंद पसरला. श्रीकृष्णरावांना त्यांच्या या युरोपातील टपालसेवेचा सरकारकडून चांगला मोबदला मिळाला होता. अर्थार्जन बऱ्यापैकी झाले होते. त्यांना मिळालेल्या पैशांतून काही पैसे बाजूला काढून त्यांनी राहात्या जागेच्या जवळच नागपूरच्या महाल या भागात एक जागा विकत घेऊन तिथे एक तीन मजली सुंदर वाडा बांधला. हाच सुंदर, सुबक, विशाल वाडा काही दिवसांनी 'हरकरेंचा वाडा' म्हणून ओळखला जाऊ लागला. घराच्या आवारातच गोड पाण्याची विहीर सुध्दा केली गेली. समोर ओसरी, बाजूला बैठकीसाठी छपरी, ओसरीच्या बाजूलाच एक मोठे देवघर आणि सुंदर मोठे प्रवेशद्वार असलेला हा हरकरेंचा देखणा वाडा सर्वांनाच आवडू लागला.
श्रीकृष्णराव हे अतिशय धार्मिक आणि साध्या, शांत स्वभावाचे होते. अध्यात्माची त्यांना अतिशय आवड होती. त्यांचा गळा अतिशय गोड होता. गाण्याची त्यांना अतिशय आवड असल्यामुळे ते देवघरासमोर बसून बरेचदा गोड आवाजात भजन-कीर्तन करीत असत. त्यांची आठ मुले व आजूबाजूचे लोक त्यांचे भजन-कीर्तन ऐकण्यास आवर्जून उपस्थित होत असत. छोट्या बाळला तर त्याच्या पित्याचे, श्रीकृष्णरावांचे हे गायन अतिशय आवडत असे. बाळला आपल्या मांडीवर बसवून श्रीकृष्णराव गायन करू लागले की हा बाळ ही त्यांच्या सोबत गुणगुणू लागे.
बाळ आता तीन वर्षांचा झाला होता. श्रीकृष्णराव आध्यात्मिक पुरुष असल्याने त्यांनी 'बाळ'मधील दैवी गुण ओळखले होते. ते बाळचे अतिशय लाड करत असत. बाळ त्यांचा विशेष लाडका पुत्र होता. लहानपणासूनच बाळला श्रीकृष्णराव व राधाबाईंनी अनेक आध्यात्मिक गोष्टी सांगून त्यांचा आध्यात्मिक पाया मजबूत केला होता. बाळही त्या आध्यात्मिक गोष्टी अतिशय आवडीने ऐकत असे. श्रीकृष्णराव परतल्यानंतर इतके दिवस म्हणजे तीन वर्षांनी बाळचे जावळं काढण्यात आले. आतापर्यंत त्या काळ्याभोर कुरळ्या जावळामध्ये बाळ श्रीकृष्णाचेच रूप वाटत असे. बाळचे जावळ काढून ते नर्मदेत शिरवण्यात आले. याच काळात राधाबाई पुन्हा गर्भवती झाल्या आणि योग्य समयी त्यांनी एका कन्येला जन्म दिला. हे या हरकरे दांपत्याचे नववे अपत्य.
- डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा