कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 3

 मुंगी पासुन मानवापर्यंत सर्व प्राणी मृत्युला भीत असतात. त्यांच्या सद्य जीवनात त्यांनी मृत्युचा अनुभव कधीच घेतलेला नसतो. असे असताना त्यांना अनुभवाला येणारे मृत्युचे भय त्यांना कसे प्राप्त झाले हा प्रश्न उरतोच. यावर काही तर्क येऊ शकतात आणि ते असे की, त्यांच्या या मृत्यु भयाचा वारसा त्यांना त्यांच्या माता-पित्यांच्या गुणसूत्रात (Cromosomes) विद्यमान असणाऱ्या संस्कार-पिंडाच्याद्वारे (genes) प्राप्त झाला असेल. परंतु माता पित्याच्या पेशीत असलेल्या संस्कारपिंडावर ते जिवंत असेपर्यंत मृत्यूचे संस्कार होतच नसतात, म्हणून प्रत्येकाचा मृत्यू भयगंड त्यांच्या माता पित्याच्या संस्कारपिंडापासून आला असावा असे म्हणता येणार नाही. असल्या मृत्यूभयाचा संस्कार ग्रहण करण्याकरिता जीवात्मा नामक एक स्वतंत्र अस्तित्व मानावे लागते. मागील जन्माचा मृत्यूभयाचा संस्कार हा जीवात्माच ग्रहण करतो. कारण त्याचे मागील जन्माचे शरीर मृत्यूसह नष्ट होत असते. मृत्यु संस्कार भय माता पित्यांच्या गुणसुत्राद्वारेही नाही आणि स्वशरीराद्वारेही प्राप्त होत नाही. तसला मृत्युसंस्कार ग्रहण करण्यास शरीरात राहून शरीर व्यापाराच्यावर असलेली जीवात्मा नामक अवस्था असते हे मान्य करावेच लागेल. हा जीवात्मा मागील जन्माचे आवश्यक ते सर्व संस्कार घेऊन नवीन शरीर नवजन्माद्वारे प्राप्त करून जुन्या संस्कारांचा वारसा घेत असला पाहिजे. मृत्युचे भय जीवात्मादशा व पुनर्जन्माचा सिध्दांत सिध्द करते. मागील जन्माच्या मृत्यूच्या वेळेस जीवात्म्याला त्याच्या त्या जन्माच्या शरीराद्वारे जे भयानक क्लेश अनुभवाला येत असतील ते अनुभव जीवात्मा त्याच्या पुढील जन्मात नकळत स्मरण करतो. म्हणूनच प्रत्येक जीवाला सतत मृत्यूचे भय सतावीत असते. मागील अनेक जन्मातील मृत्युक्लेशांचे भयानक संस्कार इहजन्मात जीव स्मरत असतो. यामुळे जीवात्मा व पुनर्जन्म मानावाच लागतो.

जीवन आणि मृत्यु 

               आपण झोपल्यानंतर आपल्या अनैच्छिक मज्जातंतूद्वारे आपल्या शरीरातील सर्व क्रिया, जसे श्वासोच्छ्वास, रक्तप्रवाह, पचन, रससृजन, शोषण, आणि असल्याच शरीरवृध्दीच्या सर्व प्रक्रिया सतत चालू असतात. मनुष्य मेल्यावरही त्याच्या मृत शरीरातील केशवृध्दी आणि नखवृध्दीसारख्या क्रिया काही काळ चालूच राहतात. मृत्यूनंतर शरीरातील पेशी मरतच असतात. रक्त पिचून ते सडत असते आणि मृतशरीरही कालांतराने सडून गळत असते. परंतु त्याही अवस्थेत सडणे, नवीन रस उत्पन्न होणे, सडक्या भागातून वायू तयार होणे इत्यादी क्रिया चालूच असतात. मग असे असता त्या मृत शरीरात असल्या विघटनाच्या प्रक्रिया का चालू असतात? या प्रश्नाचे उत्तर वाटते तेवढे सोपे नाही 

               मृत झालेल्या प्राण्याचे शरीर त्या शरीराचा अन्न म्हणून उपयोग करणाऱ्या इतर प्राण्याला अथवा माणसाला जीवनदायीच असते. मृत शरीरातील अवयव खाणाऱ्याच्या शरीरात नवमांस व रक्त उत्पन्न करीत असते. मग ते मृत शरीर मृत कसे समजायचे ? असे असता मृत्यु कशाला समजायचे ? उत्तर कठीण आहे. तात्विकदृष्टया जड अथवा मृत मानला गेलेला धोंडा जिवंत घडामोडींचा पुळका असतो, कारण त्यात असलेले अणू, परमाणू अथवा ओतप्रोत त्या सभोवतालच्या प्राणस्पंदन करणाऱ्या बाहेरील जगतातून एकसारखी प्राणस्पंदने आपल्या अस्तित्वात कर्षण करीत असतात. असल्या स्पंदन पुंजकरूप दगडाला निर्जीव समजायचे काय? तोच दगड इतर वनस्पतींकडून अन्न म्हणून वापरला जातो की, जे अन्न त्या वनस्पतींना जीवनदायी असते. श्वासोच्छ्वास करताना अशुध्द रक्तातील कर्बाचा कण फुफ्फुसात ओढल्या गेलेल्या प्राणवायूसह संलग्न पावून बाहेर फेकला जातो. रक्तात असताना तो कर्बकण जिवंत असतो, तर तो कर्बकण रक्ताचा त्याग करून प्राणवायुशी संलग्न पावल्यावर कर्बाम्ल वायू बनतो आणि एक जड पदार्थ बनतो. तोच जड मानला गेलेला कर्बाम्ल वायू कण वनस्पतींद्वारे कर्षण केला जातो आणि वनस्पतींना जीवन देणारा बनतो. मग जड आणि चेतन यातील भेद स्पष्ट करणारी लक्ष्मण रेषा कोणती आणि ती रेषा कोण स्पष्ट करणार ? जड आणि चेतनात स्पष्ट विलगीकरण करणारे अस्तित्व कोणते? मग मृत्यू आणि जीवन कशाला म्हणायचे?

समाधी अवस्थेतील योगी

               समाधी अवस्थेत असणाऱ्या योग्याच्या शरीरातील श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण, अन्नपचन, शोषण आणि पेशी वृद्धी यांसारख्या जीवनास आवश्यक अशा सर्व प्रक्रिया बंद असतात. समाधी अवस्थेत अनेक दिवस असणाऱ्या योग्याच्या शरीरावरील असलेल्या केसांचे अथवा नखांचेही वर्धन होत नसते. त्या योग्याचे समाधी अवस्थास्थित कल्प शरीरात कोणतीच प्रक्रिया चालू नसल्याने ते प्रक्रियाबंद शरीर कुजत नाही की ते सडून त्यातून कुजलेला वायू सुध्दा निघत नाही. त्या शरीरातील विश्वात्मक झालेला जीवात्मा त्याच्या शरीरभावावर येत नाही, तोपर्यंत ते समाधिस्त शरीर तसेच राहते. असल्या जड शरीराला कल्प शरीर म्हणतात आणि हे कल्प शरीर तो योगी कितीही काळ त्या शरीराबाहेर असला तरी सडत किंवा नष्ट होत नाही, जी अवस्था इतर सामान्य माणसाच्या मृत शरीराची असते. सामान्य माणसाचा जीवात्मा शरीरत्याग करून बाहेर गेल्यामुळे त्या मृत शरीरातील कुजणे, वायू प्रकोप होणे, अनावश्यक रस उत्पन्न होणे यासारख्या क्रिया चालू असतात. परंतु समाधिस्थित योग्याच्या शरीरात असल्या विघटनात्मक क्रिया मुळीच चालू नसतात. ते समाधिस्थ शरीर जसेच्या तसे अविघटित अवस्थेत असते. समाधिस्थ झालेला योगी देहभावावर येईल त्यावेळेस त्या कल्पशरीरातील श्वासोच्छ्वास, रूधिराभिसरण आणि जीवनावश्यक प्रक्रिया पुन्हा चालू होतात आणि त्या समाधिस्थ योग्याचे नवजीवन प्रारंभ होते.

              यावरून समाधिस्थ असलेल्या योग्याचे प्राकृतिक प्रक्रिया बंद असलेले कल्प शरीरातील जीवनदायी प्रक्रिया परत चालू करणारे असे एक स्वतंत्र अस्तित्व असले पाहिजे, जे देहभावावर आल्यानंतर पुन्हा स्वशरीरातील जीवनाला आवश्यक अशा प्रक्रिया सुरू करीत असले पाहिजे. या शरीराच्या स्वतंत्र अस्तित्वास वैदिक परंपरेत ‘जीवात्मा’ असे म्हणतात. हा जीवात्मा शरीरास त्यातील विद्युत बनुन एखाद्या यंत्राप्रमाणे चालवीत असतो. या शरीराचा स्वामी जीवात्मा आपल्या शरीरास आवश्यकतेनुसार कार्यान्वित करत असतो. म्हणून उत्क्रांतीचा संबंध या जीवात्म्याशी असतो; कारण बाहेरून येणाऱ्या संस्कारातून आपल्या जीवनाला आवश्यक असे उपयुक्त संस्कारच ग्रहण करून अनावश्यक संस्कार जीवात्मा ग्रहण करीत नाही. जड शरीर जीवात्म्याद्वारे संचलित होत असल्याने ते योग्य-अयोग्य संस्कारांची निवड करू शकत नाही, त्यामुळे योग्य  संस्काराद्वारे जीवात्माच  शहाणा होत असतो. जड शरीर जडभावाने युक्त जडच रहाते. जडात काय प्रगती होणार? कारण स्पंदन पावणारे अणु-परमाणु अथवा ओतप्रोत त्यांचे तेच नियत रडगाणे चालू ठेवणार!

लेखक - योगिराज मनोहर हरकरे  

शब्दांकन – राजेश कोल्हापुरे –९७०२९३७३५७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी