सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - 4
बालवयातच खोल ध्यानाचा अनुभव
'बाळ' आता मोठा होऊ लागला. एव्हाना बाळ सहा वर्षाचा झाला होता. आईवडिलांनी सांगितलेल्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये बाळ रमून जात असे. आईने सांगितलेल्या ध्रुवबाळाच्या गोष्टीचा तर बाळच्या बालमनावर इतका खोल प्रभाव पडला की ध्रुवबाळाप्रमाणेच हा निर्धारी बाळ एकदा कुणाला न सांगता घराच्या माडीवर चूपचाप ध्यान लावून बसला. घरी सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. बाळ कुठे गेला? राधाबाईंचा जीव घाबरला, दाई घाबरली. श्रीकृष्णराव बाळला शोधू लागले. बऱ्याच वेळानंतर बाळ माडीवर सापडला आणि तोही खोल ध्यानावस्थेत! सगळ्यांनी बघितले की बाळ मांडी घालून डोळे मिटून खरोखरच एका दिव्य ध्यानावस्थेत बसला होता. चेहरा तेज:पुंज दिसत होता. श्रीकृष्णराव - राधाबाईंनी आपल्या या बाळची दिव्य अवस्था पाहिली आणि गहिवरून त्याला आपल्या छातीशी लावले.
बाळने खरोखरच आईने सांगितलेल्या ध्रुवबाळाच्या गोष्टीतून 'निर्धार' आणि 'जिद्द' हे दोन सद्गुण लहानपणीच आत्मसात केले. या दोन गुणांनीच पुढे बाळ एक महान इतिहास घडवणार होता. ही जिद्द बाळने पुढे जन्मभर आपल्या जीवनात जोपासली आणि अशक्य त्या गोष्टी शक्य केल्या.
(बाळची अर्थात, पुढील आयुष्यातील योगी मनोहरांची ही जिद्द भल्याभल्यांना अवाक् करणारी होती. कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी त्यांच्यात असलेली जिद्द ही थक्क करणारी होती. आयुष्याच्या अगदी शेवटच्या दिवसांमध्येही विश्वाला ज्ञानमय बनवून समाजाला योग्य मार्ग दाखविण्याविषयी त्यांची जिद्द कायम होती, नव्हे ती वाढली होती. योगी मनोहरांच्या या रूपाला, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या पैलूला कोटी कोटी प्रणाम! असा योगीपुरुष पुन्हा होणे नाही!)
वरील प्रसंगानंतर बाळ एकदम शांत झाला होता. त्याचे वागणे अतिशय शांत, गंभीर झाले होते. बाळला आताशा एकांत प्रिय वाटू लागला होता. बाळ बरेचदा कुठेतरी एकांतात एकटाच बसून कुठल्यातरी गूढ विचारांमध्ये मग्न झालेला दिसे. श्रीकृष्णरावांनी बाळची ही इतरांपेक्षा वेगळी वागणूक ताडली होती आणि त्यांच्या लक्षात आले होते की याच्या हातून भविष्यात महान आध्यात्मिक कामगिरी होणार.
परयोनीतील अस्तित्वांची बाळला दर्शने
सहा सात वर्षांच्या बाळला आता काही दिव्य अनुभवांची हळूहळू प्रचिती येऊ लागली होती! हे अनुभव बाळला कुठलीही साधना न करता आपणहून येत असत. बहुधा बाळच्या मागच्या जन्मीच्या तपस्येमुळे या जन्मी त्याला असले दिव्य अनुभव आपणहून येऊ लागले असावेत. बाळ त्याच्या मागच्या जन्मी कोण होता या रहस्याचा उलगडा पुढे होईलच. बाळ मागल्या जन्मीही श्रेष्ठ तपस्वी होता.
भगवानगोपाल कृष्णांना गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न केला आहे की, "भगवंता, आपण जर या जन्मात कुठली साधना, तपस्या केली तर ती पुढल्या जन्मात कामी येते का? की इहजन्मातील मृत्यूनंतर सर्व इथेच संपते?” भगवंत यावर फार सुंदर खुलासा करतात. ते अर्जुनाला सांगतात की, “अर्जुना, आपण जेव्हा आपल्या जीवनात कुठली साधना अथवा तपस्या करतो तेव्हा त्या तपस्येचे संस्कार आपल्या शरीरावर तर होतातच, शिवाय या शरीरासोबतच शरीरात वास करणाऱ्या जीवात्म्यावरही ते संस्कार होतात. मृत्यूनंतर शरीर मरेल, पण जीवात्मा कधीही मरणार नाही. जीवात्मा अमर आहे. तो अनेक जन्म घेऊन नवनवीन शरीरे धारण करत असतो. त्यामुळे त्या जीवात्म्यावर साधनेचे वा तपस्येचे जे संस्कार झाले असतात ते कायम असतात. ते संस्कार त्याच्या पुढच्या जन्मात त्याला आणखी उन्नत अवस्थेत घेऊन जातात. जीवात्म्यावर झालेले आध्यात्मिक संस्कार हे कायम असतात.” बाळला येणारे सर्व दिव्य अनुभव म्हणजे त्याच्या गेल्या जन्मातील तपस्येचेच दैवी परिणाम होत.
पावसाळ्याचे दिवस होते आणि हरकरे वाड्याच्या समोरच रस्त्याचे काम सुरू होते. रस्ता तयार करताना जे खड्डे आजूबाजूला झाले होते त्या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी जमले होते. बाळ खेळण्याच्या उद्देशाने त्या खड्ड्यांजवळ जेव्हा-जेव्हा जाई तेव्हा-तेव्हा त्याला हाताच्या पंज्याएवढी लहान-लहान बायामाणसे तेथे काम करताना दिसत. ही लहान- लहान खुजी माणसे माती ने-आण करत, त्या पाण्यात पोहत, खेळत असत व बाळकडे पाहात असत. ती माणसे इतरांना दिसत नसत. फक्त बाळलाच दिसत असत. बाळला हे सर्व चमत्कारिक वाटे. त्या छोट्या-छोट्या माणसांबद्दल इतर त्याच्या सवंगड्यांना सांगणेही शक्य नव्हते. कारण इतर कोणीच त्या माणसांना पाहू शकत नव्हते. शेवटी बाळने आईलाच एकदा विचारले, "आई, त्या खळग्यातील पाण्यामध्ये मला नेहमी वीतभर आकार असलेली बायामाणसे दिसतात ती कोण आहेत गं?” बाळच्या या चमत्कारिक अनुभवाने आईसुध्दा अचंबित झाली होती. तिच्याजवळ याचे उत्तर नव्हते. परंतु बाळची समजूत काढण्यासाठी ती बाळला सांगत असे की ती पाताळातील माणसे आहेत. कधीकधी त्यांना पाताळातून वर यावेसे वाटले की अशा पावसाच्या दिवसांत ती माणसे पाताळातून वर येतात. बाळचे तात्पुरते समाधान होत असे. परंतु ही अशी छोटी-छोटी माणसे दिसण्याचे रहस्य बाळला त्याच्या पुढील परिपक्व आध्यात्मिक अवस्थेत कळले. ती छोटी-छोटी माणसे म्हणजे हे जडजगत सोडून परयोनीतील अस्तित्वे होती. बाळ पूर्वजन्मीचाच तपस्वी असल्यामुळे ती अस्तित्वे बाळला सहजपणे दिसत असत आणि तीसुध्दा छोटी-छोटी मानवी स्वरूपात. गूढ अशा परयोनीतील अस्तित्वांची दिव्यदर्शने बाळला त्या खुज्या मानवांच्या रूपाने होत होती.
बाळचा गतजन्म हा एका महान योग्याचा होता. हिमालयात नेफा या ठिकाणी तपस्येमध्येच संपूर्ण जीवन घालवणाऱ्या एका महान योग्याचा पुनर्जन्म म्हणजेच श्रीकृष्णराव - राधाबाई यांचे आठवे अपत्य बाळ हे होते. (याबद्दल सविस्तर माहिती पुढे येईलच.) बाळला इतक्या लहान वयापासूनच इतक्या अद्भूत उच्च प्रतीच्या आध्यात्मिक अनुभूती कां येत असत या प्रश्नाचा संबंध त्यांच्या पूर्वजन्माच्या तपस्येशी व आध्यात्मिक साधनेशी होता. बाळला अनेक आध्यात्मिक शक्ती जन्मतःच प्राप्त झाल्या होत्या. परंतु याची जाणीव बाळच्या आईवडिलांना व स्वतः बाळलाच आतापर्यंत नव्हती. परंतु काही प्रसंगांतून हळूहळू बाळमध्ये असलेल्या अद्भुत आध्यात्मिक शक्तीची प्रचिती सर्वांनाच येऊ लागली. याच काळात राधाबाईंनी पुन्हा एका कन्येला जन्म दिला. राधाबाई श्रीकृष्णरावांची आता एकूण दहा अपत्ये होती.
- डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा