कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 4
चमत्कारिक शक्ती व चमत्कार
एखादा जादुगार एखाद्या कापडाच्या चिंधीला हातात धरून त्यावर काही मंत्र पुटपुटल्याचे नाटक करून ती चिंधी भूमीवर खाली ठेवतो. थोड्याच वेळात ती चिंधी जळू लागते. त्यातील रहस्य माहित नसणाऱ्यांना तो एक चमत्कार वाटून ते टाळ्या वाजवू लागतात. मंत्र पुटपुटण्याचे सोंग करून तो जादूगार मुखात जिभेखाली ठेवलेला फॉस्फरसचा तुकडा त्या चिंधीवर थुंकतो. फॉस्फरस पाण्यात ठेवल्याने हवेतील प्राणवायूशी संबंध न आल्यामुळे जळत नसतो. त्या फॉस्फरसच्या तुकड्यावरील लाळेचे बाष्पीभवन होऊन तो कोरडा तुकडा बाहेरील प्राणवायूशी संयोग पावून जळू लागतो. त्यासह ती चिंधीसुध्दा पेट घेऊन जळू लागते. असल्या वैज्ञानिक प्रक्रियेची ज्यांना माहिती नसते, त्यांना त्या जादुगाराचा तो प्रयोग म्हणजे एक चमत्कारच वाटतो. जादुटोण्याची कामे करणारी माणसे अशीच हातचलाखी करीत असतात व सामान्यजनांवर आपला वचक बसवीत असतात.
योगी असलेच चमत्कार अनुभवत असतात. योग्यांचे चमत्कार फसवे व परस्वाधीन नसतात, तर स्वयंभु स्वपरिश्रमावर आधारित असतात. यमनियम, आसन, प्राणायाम व ध्यानाद्वारे मनातील विचारांना शांत केल्यावर चित्त एकाग्र केल्यामुळे प्रकृतीच्या ज्या मूल अवस्थांचा योग्याला त्याच्या त्या अवस्थेला धरून अनुभव येत असतो, त्या त्या अवस्थांना चमत्कार असे म्हणतात. पण चमत्कार म्हणजे फसवणूक नसून योग्याच्या त्या दिव्य प्राकृतिक अवस्थांचे प्रत्यक्ष अनुभव असतात आणि म्हणूनच वैदिक परंपरेने त्यांना ‘चमत्कार’ असे नामाभिधान दिले आहे. तसले दिव्य अनुभव घेऊन त्या अनुभवसिध्द योग्याचे तसे निश्चित मत बनत असते. त्या त्याच्या कल्पना नसतात, तर निश्चित अनुभवसिध्द मत असते म्हणून तसल्या प्रत्यक्ष अनुभवसिध्द अवस्थांना वैदिक परंपरा ‘चमत्कार’ असे नाव देते. ‘च’ म्हणजे निश्चित, ‘मत’ म्हणजे अनुभवसिध्द मन आणि ‘कार’ म्हणजे कर्म सिध्द अवस्था होय. या तीन उपशब्दांना एकत्र करून ‘चमत्कार’ शब्द बनला आहे. चमत्कार इतरांना दाखविण्याकरीता नसून स्वतः योगसाधकानेच अनुभवून त्यावर श्रध्दा अथवा विश्वास ठेवायचा असतो. असल्या चमत्कारात अंधश्रध्दा नसते, तर प्रत्यक्ष स्वानुभव असतो. चमत्कारांचा बाजार करणारे भंपक खरे साधक नसतात तर भोंदू असतात. असल्या भोंदूवर अंधश्रद्धा निर्मूलनावर श्रध्दा ठेवणारे तूटून पडल्यास त्यात वावगे ते काय?
यौगिक साधनांवरून स्वत:च चमत्काराचा दिव्य अनुभव घेणारा योगसाधक असले दिव्य अनुभव घेत असताना प्रकृतिच्या दिव्य यम-नियमांच्या वर म्हणजे स्वतंत्र नसतो. दिव्य प्राकृतिक यमनियमांना धरूनच तो तसले चमत्कार अनुभवू शकतो. तसले दिव्य अनुभव घेऊ न शकणाऱ्या सामान्य माणसांना योग्याचे ते तसले दिव्य अनुभव चमत्कारच वाटतात . तसल्या साधना केल्यावर प्रत्येकालाच तसा दिव्य अनुभव येऊ शकतो हे माहित नसल्यामुळे साधारण व्यक्ती त्यावर भाळून असल्या महात्म्यांच्या मागे अंधविश्वासाने लागते व स्वतः तसल्या दिव्य अनुभवांना वंचित राहून आपले आयुष्य व्यर्थ घालविते. काही जण स्वतः योगसाधना करून तसा अनुभव न घेता वाईटाबरोबर खऱ्या साधकांना त्रास देऊन बदनाम करण्यात धन्यता मानतात. प्रसिध्दी चतुर, पाखंडी लोक असला भंपक प्रचार करून भोळ्या भाबड्या लोकांना आपल्या नादी लावतात व कामिनी, कांचन व कीर्तीचा लाभ उपटतात. असले भंपक प्रसिध्दीलोलुप लोक स्वत:ची व समाजाची निश्चितच हानी करून समाजाला आणखी खोल अशा अज्ञानात लोटतात. त्यामुळे समाज अधिक दुर्बल होऊन चतुर प्रचारकाचा आश्रित बनतो. परकीय आक्रमक असल्या दुर्बल समाजावर सहज स्वामित्व मिळवू शकतो. भारताच्या मागील इतिहासात असल्याच घटना प्रत्यही घडल्या आहेत. भारताच्या दीर्घ गुलामगिरीच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे.
अणू विभाजित करून परमाणू अवस्था प्राप्त करता येईल. परमाणूला विभाजित करून त्यापेक्षा सूक्ष्म सूक्ष्मतर अशा ओत प्रोतांच्या भयंकर शक्तिशाली अवस्था प्राप्त करता येतील. अणूस्फोटांच्या बाबतीत त्या अवस्थांचा विज्ञानाने भरपुर उपयोग करून घेतला आहे. अणू विस्फोट म्हणजे चमत्कार नसून एक प्रत्यक्ष घटना आहे. योगी साधना करून असल्या दिव्य अवस्थांशी एकरूप होऊन त्या अवस्थांचा स्वतः अनुभव घेत असतो. ते सर्व अनुभव त्याचे स्वत:चे असल्यामुळे त्याबद्दल त्याची मतनिश्चिती झालेली असते. म्हणूनच त्याला तो ‘च-मत-कार’ असे म्हणत असतो. चमत्कार इतरांना दाखविण्यासाठी नसतात. म्हणून चमत्काराचा बाजार मांडण्याचा वैदिक परंपरेत विरोध दर्शविला आहे. योगी संत ज्ञानेश्वर माऊलींनी चमत्कार दाखवून मोठेपणा मिळविणाऱ्यांना अतिशय कडक शब्दात सांगितले आहे, ‘आपली माय कोणा देऊ नये’
योगी स्वचित्ताच्या योगाने साधना करून असले दिव्य अनुभव घेत असतो. मनावरील सर्व संस्कार अथवा वृत्ती कुशलतेने मूळ चित्त अवस्थेत परिवर्तित करून योगी आपल्या चित्ताला शुध्द व बलशाली बनवितो. अशा शुध्द चित्ताला असंभव अशी कोणतीच दिव्य अवस्था नसते. बाहेरील विश्वात संचरलेली जी चितशक्ती असते तीच प्रत्येक माणसाच्या पिंडात असते. त्या पिंडस्थित चितशक्तीला ‘चित्त’ असे म्हणतात. एक परमाणू विभाजित केल्यास जशी प्रचंड शक्ती उत्पन्न होऊन प्रचंड उलाढाली करता येतात, तद्वत् या चित्तशक्तीच्या व्यापारापासून योगी दिव्य असे अनुभव घेऊ शकतो, पण ते इतरांकरता नसतात. ज्याचे अनुभव त्यानेच अनुभवायचे असतात. मग ते दिव्य अनुभव इतरजन मानोत अथवा न मानोत. त्याच्या स्वानुभवावर तो निर्धाराने पक्का असतो. परमाणू फोडल्यानंतर वैज्ञानिक प्रक्रियेत त्याद्वारे भयानक संहारशक्ती उत्पन्न होऊन त्याद्वारे संबंधित देश भस्मसात होत असतो, परंतु योगी तसल्या अणू विस्फोटाचा अनुभव अणूंना न फोडता घेत असतो. ज्ञान आणि विज्ञानात इतका आमूलाग्र फरक आहे. हे जाणणे या मार्गात अतिशय आवश्यक आहे.
उत्क्रांतीच्या आजच्या अवस्थेत मानवी योनी ही सर्वात उच्च अशी उत्क्रांत अवस्था आहे. त्यामुळे उत्क्रांतीच्या सर्व प्रतिसादांची केंद्रे मानवी शरीरातील मेंदूत सामावली असली पाहीजेत आणि कुतूहलाची गोष्ट अशी की, मानवी मेंदूत अशी सर्व केंद्रे उत्क्रांतीद्वारे उत्पन्न झाली आहेत. योग्याला जे दिव्य अनुभव व सिध्दी प्राप्त होतात त्या असल्याच उत्क्रांत शक्तीकेंद्रांचा कार्यकलाप होत. मागील सर्व अनुत्क्रांत अवस्थांचा अनुभव योगी घेऊ शकतो. तो एखाद्या गांडूळाप्रमाणे स्वत:ला चिखलात गाडून घेऊ शकतो, माश्याप्रमाणे पाण्यात इुंबू शकतो आणि पक्षाप्रमाणे हवेत तरंगू शकतो. कारण त्या सर्व अनुत्क्रांत अवस्था मानवी शरीराने त्या त्या काळात धारण केल्या होत्या, ज्यांचा पुन्हा अनुभव घेणे मानवाला अशक्य नाही.
लेखक - योगिराज मनोहर हरकरे
९७०२९३७३५७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा