कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 5

सर्व जड वस्तू संधारणाचे सुक्ष्म अवस्थारूप म्हणजे ओत होय. ओतांची सर्वसापेक्ष स्पंदने संधारण करून परमाणू-अणू निर्माण होतात. अणूलाही त्याची एक संधारण गती असते, जी ओतांच्या स्पंदनांना अवगुंठीत करून प्राप्त होत असते. असली ओतस्पंदने मुक्त करून त्यांचा उपयोग दूरदर्शनात केला जातो. मानवी शरीरही  असल्या संग्रहीत स्पंदनांचे चक्रव्यूह असल्यामुळे तसा सुयोग्य प्रयत्न केल्यास मानवी चित्त आपल्या शरीररूप व मेंदूरूप उपकरणाद्वारे तसले सूक्ष्म अनुभव घेऊ शकते. सर्व दिव्य अनुभवांचे मूळ संचित केंद्र मानवी चित्त आहे. म्हणून योगी जड उपकरणाशिवाय दूरचे ऐकू शकतो, दूरचे पाहू शकतो, दूरचा स्पर्श करून त्या वस्तूंचा स्पर्श, गंध, चव इत्यादी दिव्य अनुभव घेऊ शकतो, परंतु त्याकरिता योग्याचे चित्त अतिशय साक्षपी अवस्थेत असावे लागते. 

               मानवी शरीर सुद्धा मुंगीपासून माकडापर्यंतच्या सर्व उत्क्रांत अवस्थांचे सर्वश्रेष्ठ उत्क्रांत स्वरूप असल्यामुळे सर्व गत योनींचा अनुभव मानवी शरीर घेऊ शकते.एकपेशीय जीव अमीबा जडकर्बाचे संस्कारीत अवस्थेपासून उत्पन्न झाला असे  मानण्यात येते. अमीबाचे अधिक उत्क्रांत स्वरूप म्हणजे हायड्रा होय. हायड्राने  सभोवतालच्या परिस्थितीवर मात करून आपले रूपांतर जेली मत्स्यात केले. जेली मत्स्यापासून मत्स्य, मकर, सस्तन प्राणी आणि वानर योनी उत्पन्न होऊन सध्या ती उत्क्रांती मानवात स्थिर झाल्यासारखी वाटते. शून्यापासून हे सर्व विश्व प्रत्यही अनेकविध अवस्थांद्वारे नटत असते व परत त्या महाशून्यात स्थिरावत असते. ‘उत्पद्यंते विलीयंते’ ही सृष्टीची लीला आहे, ज्याला भावनाशील भक्तजन परमेश्वराचीच लीला समजतात. अशा तऱ्हने अज्ञानामुळे मूळ प्रकृतीलाच परमेश्वर समजतात. गीता स्पष्ट सांगते, 

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः। 

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते । श्लो.१४ अ.५ ।

चित्त हेच शक्तिकेंद्र

               सर्वत्र विद्यमान असलेल्या जाणीव व अस्तित्वाला ‘चित्’ असे म्हणतात तर पिंडागणिक बंदिस्त झालेल्या त्या सर्वास्थित चिताला ‘चित्त’ असे म्हणतात. म्हणून सर्वत्र विद्यमान असलेल्या चित्ताचा मानवी चित्त एक अंश आहे. गीता अध्याय १५ मधील, श्लोक ७ मध्ये हेच सांगते,

ममैवांशो जीवलोके जिवभूत: सनातनः’ ।

                विश्वात कोठेही स्पंदन झाले की, त्याचे संग्रहण मानवी चित्तावर होत असते म्हणून उत्क्रांतिद्वारे संग्रहित झालेल्या सर्व अवस्थांचे ज्ञान परमयोगी करू शकतो आणि उलट न्यायाने मानवी चित्तावरील स्पंदनाचा सर्व विश्वावर परिणाम होऊ शकतो. योग्याच्या असल्या निर्माण चित्ताला पातंजल योगसूत्रात ‘ऋतंभरा प्रज्ञा’ असे म्हटले आहे. योगशास्त्राचे अनुशासन अवलंबिल्यास प्रत्येक मानवी चित्त असे विस्मयकारक चमत्कार अनुभवू शकते. आपल्या मेंदूत अशी सर्व अतींद्रिय केंद्रे आहेत जी चित्ताच्या प्रस्फुरणाने अतींद्रिय अनुभव घेऊ शकतात. योगी अवकाशगमन करू शकतो, विश्वाशी एकरूप होऊ शकतो, अणू परमाणुचे स्पंदन जाणू शकतो, पृथ्वीची गरिमा अनुभवू शकतो आणि असलेच दिव्य दर्शन करू शकतो. योगानुशासनाने मेंदूतील ती दिव्य केंद्रे उत्तेजित केली जाऊन ते ते सर्व अनुभव योगी घेऊ शकतो. उत्क्रांतिच्या दीर्घकालीन वाटचालीची ती देणगी आहे. मेंदूही चित्ताने भारलेला असल्याने एकमेकांच्या पूरक प्रयत्नाने पूर्णत्व अनुभवू शकतो. पूर्ण उत्क्रांतिचे पूर्ण अनुभव योगी घेऊ शकतो, नव्हे तर पूर्ण उत्क्रांती म्हणजेच पूर्ण योगी होय.

               मुलत: चित्त स्फटिकाप्रमाणे शुध्द असते, परंतु ग्रहण केलेल्या बाह्य संस्कारांमुळे त्यावर संस्कारपुटे चढून ते मलीन होत असते, ज्याला मन असे म्हणतात. म्हणून उत्क्रांतीद्वारे प्राप्त झालेल्या सर्व संस्कारांची मूस म्हणजे मन होय. चित्तावरील असल्या बंधनकारक अवस्थांमुळे चित्त मलीन होऊन त्याची मूळ शक्ती कमी कमी होत जाते. चित्त शुध्द असल्यास त्याची शक्ती प्रकांड असते. असले चमत्कार चित्त अनुभवू शकते, उत्पन्न करू शकते, परंतु योगमार्गाची शिस्त तसले चमत्कार दाखवू देण्यास मनाई करते. ते चमत्कार स्वतः पिऊन स्वस्थ बसायचे असते. अनुभवांनी धन्य होऊन योगी सर्व अनुभवांच्यावर जाऊन परमेश्वर बनत असतो. योगी सदा अंतर्मुख असतो. अन्य लोकांना तसले दिव्य अनुभव विदित केल्यास एकतर ते विस्मयतेने कुंठित होऊन काहीच करणार नाहीत, अथवा त्यापासून विकृत चालना घेऊन त्याचा बाजार मांडून अनुभव नसताना बुवाबाजी करतील. कोणत्याही समंजस समाजाला हे घातक आहे. स्वानुभवातून धन्यता ही योगाची शिकवणूक आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात – ‘पिंडे पिंडिचाचि ग्रासु हा नाथपंथीचा संकेतु’ 

               स्वत:च्या अनुभवावरून लेखक सांगू इच्छितो की, निष्ठापूर्वक व श्रद्धेने योग्य साधना केल्यास प्रत्येकजण असले दिव्य अनुभव घेऊ शकतो. त्याकरिता अन्य अशास्त्रीय धर्मसंप्रदाय अथवा व्यक्तीवर श्रध्दा न ठेवता साधकाने स्वतःवर व स्वतःच्या प्रामाणिक अथक प्रयत्नावर निष्ठा ठेवल्यास प्रत्येक साधक परमोच्च अवस्था प्राप्त करू शकेल. त्याकरिता मध्यस्थ अथवा मसीहाची आवश्यकता नाही. अपक्व संप्रदाय अथवा धर्मपंथांनी मानवाला अपूर्ण अवस्थेतच समाधान मानण्यास शिकविले असल्याने असले अंधश्रद्धाळू लोक वृथा कल्पनेच्या आहारी जाऊन इतर मानवांवर अन्याय करण्यास प्रवृत्त होतात. त्यातच आपल्या धर्ममतांची धन्यता मानतात. आज सर्वत्र हेच चालले आहे म्हणून दिव्य जगातील सत्ये जाणण्याकरता असल्या अशास्त्रीय व अज्ञानमूलक संस्कारांना प्रथम दूर केले पाहिजे. अन्यथा चित्ताची शुध्दता मलीन होऊन ते चित्त सत्याचे दर्शन अथवा स्वसामर्थ्याचा अविष्कार करू शकणार नाही. सततचा सुयोग्य अभ्यास व त्याद्वारे सुयोग्य संस्कार मनावर करावे लागतात. मागील सर्व दुष्ट संस्कार हळूहळू पुसावे लागतात. मगच योग्य संस्कारांना साधनेत वाव मिळू शकतो. जुने संस्कार पुसणे फार कठीण असते. पण सततच्या संथ प्रयत्नाने हिऱ्याला पैलू पाडण्याप्रमाणे ते शक्य होऊ शकते. केवळ वाचनाने अथवा निव्वळ चर्चा करून हे साधणार नाही. त्याकरिता सततचा अभ्यास व चिंतन आवश्यक आहे. हे करण्यासाठी ध्यानाचा फार उपयोग होतो. म्हणून वैदिक परंपरेत ध्यानाला महत्व दिले आहे. ‘विद्’ म्हणजे ज्ञान प्राप्त करणे आणि ‘वैदिक’ म्हणजे ज्ञान प्राप्त करून त्यानुसार स्वत:चे जीवनयापन करणे होय. या अर्थाने ज्ञान प्राप्त करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वैदिक होणे आवश्यक आहे.

ध्यानापासून समाधीकडे

अतींद्रिय दिव्य अनुभव व त्यापलीकडील ज्ञानावस्था प्राप्त करण्याचे महाद्वार म्हणजे ध्यान प्रक्रिया होय. जाणिवेच्या एका विषयावर मन केंद्रित करणे म्हणजे ध्यान होय, शास्त्र ध्यानाची परिभाषा सांगते –

 ‘सर्वशरिरेषु चैतन्यैकाग्रता इति ध्यान’

सर्व शरीरातील चैतन्याचे एकीकरण करण्याच्या प्रयत्नसाधनेला ‘ध्यान’ असे म्हणतात.

लेखक - योगिराज मनोहर हरकरे   

शब्दांकन – राजेश कोल्हापुरे –९७०२९३७३५७

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी