सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - 6
कृष्णविवराचे दर्शन व चंद्र-सूर्याचे दिव्य दर्शन
'बाळ'ला रात्री झोपेतही बऱ्याच चमत्कारिक अनुभूती येत असत. रात्री झोपल्यानंतर त्यास असे दिसे की तो आकाशात गमन करतो आहे. खाली अनेक गावे, वस्त्या, रस्ते, नद्या, तलाव, सागर आहेत. तो वेगाने सर्वत्र आकाशातून फिरत आहे. वर आकाशात अनेक ग्रह आहेत. त्यांच्याही पलीकडे तो अतिशय वेगाने जात आहे. अतिशय वेगाने वर जाता जाता अतिशय दूर, विश्वाच्या दुसऱ्या टोकाला एक काकु विवर आहे, जे त्याला स्वतःकडे ओढत आहे. भयानक वेगाने त्या काळ्या विवराकडे जाताना कर्णकर्कश आवाज येतो आहे. जीव घाबरतो आहे. असे दिसल्यानंतर बाळ घाबरून त्या अवस्थेतून जागा होत असे. हे अनुभव मात्र तो फारसे कोणाजवळ बोलू शकत नसे कारण हे अद्भुत अनुभव शब्दांच्या पलीकडले होते आणि बाळ अजून वयाने लहान असल्यामुळे हे सर्व शब्दांत सांगणे त्याच्यासाठी शक्य नव्हते. ही प्रत्यक्ष कृष्णविवराची अनुभूती होती. इथूनच जगाची उत्पत्ति आणि इथेच जगाचा विलय होणारे हे स्थळ म्हणजे कृष्णविवर होते या गोष्टीचे रहस्य समजण्यास बाळला बराच काळ लागला. प्रत्यक्ष कृष्णविवराची अनुभूती इतक्या लहान वयात घेणाऱ्या बाळची पूर्वजन्माची आध्यात्मिक तयारी किती उच्च असावी याची कल्पना येते.
एकदा बाळला रात्री झोपेत चंद्राचे अद्भुत सुंदर असे दर्शन झाले. विशाल पांढरा शुभ्र चंद्र! ज्याचा शीतल प्रकाश अतिशय सुखावणारा होता. चंद्राचे ते पंचगुणात्मक दर्शन होते. चंद्राचा एक स्वर्गीय सुगंध येत होता, त्याची एक स्वर्गीय चव येत होती, त्याचा एक दिव्य नाद येत होता, त्याचा सुखद स्पर्श होत होता आणि शुभ्र रंग वर्णनातीत मोहक होता. बाळला तो दिव्य चंद्र स्वतःच्या मस्तकातच असल्यासारखे वाटत होते. अर्धा चंद्र स्वतःच्या मस्तकात आणि अर्धा चंद्र मस्तकाबाहेर असा तो विलोभनीय अनुभव होता. बराच वेळ त्या मंत्रमुग्ध अवस्थेत राहिल्यानंतर बाळ ध्यानावर आला. ही दिव्य अनुभूती शब्दांपलीकडील असल्यामुळे आईला तो नीट सांगू शकला नाही.
असेच पुन्हा एकदा बाळला विशाल सूर्याचे दर्शन निद्रावस्थेत झाले. कोटी कोटी सूर्य एकत्र आल्यानंतर जे तेज निर्माण होईल ते तेज त्या सूर्यात होते. हे तेज सामान्य डोळ्यांनी बघण्यासारखे नव्हते. त्यासाठी दिव्य दृष्टीच आवश्यक होती. त्या सूर्याच्या ठिकाणी कोटी कोटी सूर्याचे तेज होते तरी तो सूर्य दाहक व तापदायक मुळीच वाटत नव्हता. सूर्याच्या समोर संपूर्ण विश्वाला सामावून घेणारे एक विशाल सरोवर होते ज्यात लाखो कमळे फुललेली होती. एकसारखा ॐकार ध्वनी येत होता. सर्वत्र तेजच तेज पसरले होते. सूर्यदर्शनाच्या या दिव्य अवस्थेतून बाळला जाग आली. तेव्हा सूर्योदय होत होता. या दिव्य अवस्थेचे वर्णन करून कुणाला सांगणे बाळला केवळ अशक्यच होते.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा