कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 6

ध्यान प्रक्रियेद्वारे जे आराध्य असेल ते साधकांप्रत येत असते. ‘ध्य’ म्हणजे आराध्य आणि ‘आन’ म्हणजे स्वत:प्रत आणणे होय. मनाची घडणच अशी आहे की, ते कधीच एकाग्र होत नाही आणि ध्यानाकरिता तर मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. मग ही एकाग्रता कशी साधायची ? त्यावर गीता सांगते,

'असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते’ ॥ श्लोक. ३५ अ.६ ॥ 

अर्जुना, मनाचा निग्रह करणे कठीणच आहे, परंतु सततच्या अभ्यासाने व वैराग्याने मनोनिग्रह शक्य आहे. एकच साधना सतत केल्याने मनावर ते संस्कार नकळत परिणाम करतात आणि ते त्या संस्कारांना धरून राहते. मन म्हणजे अन्य काही नसून ग्रहण केले गेलेले स्थिर संस्कार होत. नवीन संस्कारांना ग्रहण करण्याकरिता जुन्या अवांछनीय संस्कारांना पुसावे लागते, परंतु जुने संस्कार दृढ झाले असल्याने ते निघता निघत नाहीत. जसजसा प्रयत्न करावा, तसतसे ते जुने संस्कार अधिक दृढ व्हायला पाहतात. त्याकरिता वैराग्य म्हणजे संस्कारावरील आसक्ती कमी करण्याचा अभ्यास करावा लागतो. वैराग्य म्हणजे आसक्तिरहित व्यवहार होय. ‘राग्य’ म्हणजे आसक्ती व ‘वै’ म्हणजे त्यावरील अवस्था होय. वैराग्य आणि मनाचे चांचल्य नाहिसे करण्याकरिता मनाची शिस्त संपादन करायची असून त्याबरोबरच काही साधनांद्वारे मनाला बळेच एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्याकरिता उत्तम म्हणजे भ्रूमध्यावर मन एकाग्र करावे. काही लोक भ्रूमध्यावर सहज मन एकाग्र करू शकतात. मन त्या अवस्थेत वाटेल तिकडे भ्रमण करते आणि एकाग्रता नावाचीच राहते. मागील सर्व घटनांचे अखंड चित्रपट मनासमोर वेगाने नाचत असतात आणि गत आयुष्याच्या सर्व घटना मनासमोर सारख्या सरकत असतात. मनाची घटनाच तशी असल्यामुळे तसे घडते. म्हणून त्याकरिता अन्य उपाय शोधावे लागतात. मन साधारणतः अवयवांच्या आधारे नांदत असते. याकरिता अवयवांना एकच काम करायला लावून स्तब्ध केल्याने मन त्या अवयवांसह आपोआप शांत व एकाग्र होत असते. भ्रूमध्यात ध्यान करणे कठीण वाटत असल्यास बसण्याच्या आसनासमोर एक हात अंतरावर एक दिपक ठेऊन त्याच्या ज्योतीवर ध्यान करावे. त्याला ‘ज्योती त्राटक’ म्हणतात. भ्रूमध्य ध्यानापेक्षा हे ध्यान अधिक सोपे आहे.

त्राटक वा ज्योती ध्यान :

               काहींना केवळ ज्योतीवर ध्यान देऊन त्याद्वारे मनाला एकाग्र करणे सुध्दा जड जाते. पुन्हा मनात नाना विचार येतात व डोळे सुध्दा ज्योतीवर एकटक होण्यापेक्षा मनाच्या विविध विचारांसह मानसिक चित्रपट पहात असतात. अशावेळेस दुसरा प्रयत्न करावा. आसन अशा प्रकारचे असावे, सर्वात खाली चटई, त्यावर लोकरीचे जाड वस्त्र व त्यावर एखादे शुभ्र वस्त्र अंथरून त्या आसनावर पद्मासन लावून बसावे. पद्मासन लावल्याने त्या अवस्थेत अधिक काळ राहता येते. वज्रासनसुध्दा घालता येईल. एकदा एका आसनात                बसल्यानंतर ध्यानप्रक्रिया संपेपर्यंत त्याच आसनात बसावे. पाठीचा कणा सरळ असावा. हनुवटी किंचित् मागे व खांदे किंचित् वर असावेत. डाव्या तळहातावर उजवा तळहात असावा. आसनासमोर एक हात अंतरावर दिपक ठेवून त्याच्या ज्योतीवर डोळयांनी एकटक बघावे. त्याबरोबर एखादे स्तोत्र स्वरात म्हणावे आणि म्हटलेले स्तोत्र आपल्या कानांनी ऐकावे. डोळे ज्योतीवर त्राटक ध्यानात लागलेले, मुख स्तोत्र म्हणण्यात गर्क झालेले आणि कान तेच स्तोत्र ऐकण्यात गुंतलेले ठेवल्याने त्या सर्व इंद्रियांसह मनही आपोआप एकाग्र व्हायला पाहाते. स्तोत्र मात्र अगोदर पाठ केलेले असावे. स्तोत्र संपल्यावर पुन: पुन: म्हणावे. त्राटक व ऐकणे सतत चालू ठेवावे. स्तोत्राचा उच्चार अगदी मनात करू नये; कारण त्यामुळे झोप लागण्याची शक्यता असते. स्तोत्र स्वत:ला ऐकू येईल एवढ्या स्वरात असावे.


               काही जण स्तोत्राऐवजी एखाद्या मंत्राचा वापर करतात, पण मंत्राचा उच्चार केल्याने दोन मंत्रामधील उच्चार करताना मधे थोडा खंड पडतो व त्यामुळे मनाची एकाग्रता खंडित व्हायला पाहते. स्तोत्र एकसारखे सुरू असल्याने त्याचा प्रवाह अखंड असतो व त्या नादाच्या प्रवाहात मन आपोआप एकाग्र होते. त्याला ‘नादानुसंधान’ असे म्हणतात. संस्कृत भाषा छांदस असल्यामुळे स्तोत्र साधारणत: संस्कृत भाषेतच असावेत. हिंदू माणूस देवदेवतेशिवाय राहू शकत नसल्याने हे म्हणायचे स्तोत्र आपल्या इष्ट देवतेचे असावे. इष्ट देवतेचे संस्कृतमध्ये स्तोत्र नसल्यास भगवत् गीतेतील कोणतेही आठ-दहा सलग श्लोक पाठ करून ते म्हणावे. श्लोकसंख्या संपल्यास पुन: त्याचेच आवर्तन करावे. अशा तऱ्हेने बैठक हळूहळू वाढवावी. प्रथम पाच मिनिटे नंतर स्तोत्रास लागणाऱ्या वेळे इतकी एक-एक स्तोत्र वाढवून त्याला लागणाऱ्या समयाइतकी बैठक वाढवावी. अशा तऱ्हेने बैठक वाढवून ती एक तास, दीड-दोन तासांच्या अवधी पर्यंत वाढवावी. बैठक इतकी वाढविता आल्यास एव्हाना ध्यान लागायला सुरूवात होऊन जाते.

               डोळ्यासमोरील ज्योती आता दोन दिसायला लागतात. त्या पुन्हा एक व्हायला लागतात. त्या ज्योतीतून निरनिराळे वर्ण बाहेर निघताना व बाहेरील वर्णवर्तुळे ज्योतीत समाविष्ट व्हायला पाहतात. मनाला एकाग्र करण्याचे संगीतात सामर्थ्य असल्याने स्तोत्र गायनाने इंद्रियासकट मनही त्या गायनाद्वारे गायनाच्या मागोमाग एकाग्र व्हायला पाहते. यालाच नादाच्या मागे जाणे म्हणजे नादानुसंधान असे म्हणतात. आता ज्योती पुढे, बाजूने व मागेही दिसायला लागतात. ज्योतीचा आकार पूर्वीपेक्षा मोठा झालेला दिसतो. नंतर नेत्रासमोर ज्योती ऐवजी एखादा वर्णबिंदू दिसतो, तो वर्णबिंदू आपापल्या वृत्तिस्वभावधर्मानुसार दिसतो. तो वर्णबिंदू अमक्याच वर्णाचा असावा असा आग्रह धरू नये. जी वृत्ती चित्तावर उठेल त्या वृत्तीनुसार वर्णपटल दिसू लागेल. सर्व वृत्ती स्थिर झाल्यास वर्णबिंदू निळ्या रंगावर स्थिर होईल. सुरवातीला लाल किंवा पिवळा वर्णबिंदू दिसू शकेल. लाल वर्णबिंदू शेवटची अवस्था नसून सुरवातीची अवस्था आहे. सूर्याचे किरण वक्रीभवन झाल्यास जे इंद्रधनुष्य दिसते त्यात अगदी खालचा वर्ण तांबडा असतो. कारण तांबड्या वर्णाचे स्पंदन सर्वात अधिक जड असते. निळ्या वर्णाचे स्पंदन सर्वात उच्च विरल असल्याने निळा वर्ण दिसणे सर्वात शेवटची अवस्था होय. इंद्रधनुष्यातील सर्वात शेवटचा वर्ण निळा असतो. ‘तानापिहीनिपाजा’ अशी ती वर्णमालिका आहे. म्हणून केवळ तांबड्या वर्णाचे पटल अथवा बिंदू पाहण्याचा आग्रह धरणे अशास्त्रीय व निम्नस्तराचे आहे. ज्ञानेश्वर माऊलींनीही निळ्या वर्णाचेच गुणगान अधिक केले आहे. ते एका अभंगात असे म्हणतात, ‘आता ज्ञानेश्वर अंतर्बाह्य निळा झाला’ 

लेखक - योगिराज मनोहर हरकरे   

 –९७०२९३७३५७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी