कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 7

चित्ताची एकाग्रता क्रमागत वाढल्याने डोळ्यांना पाणी येते. नंतरच्या काळात नेत्रांना पाणी येणे बंद होऊन नेत्र अर्धोन्मिलीत  म्हणजे अर्धवट बंद व्हायला पाहतात. काहींचे नेत्र पूर्णपणे बंद पडायला पाहतात. त्यामुळे पुन्हा नेत्र उघडण्याची इच्छाच होत नाही. नेत्रांची असली अवस्था उच्च होय. नेत्र बंद असूनही ज्योती अथवा वर्णपटल दिसू लागतात. काही दिवसानंतर स्तोत्र बंद पडायला पाहते. सर्व इंद्रिये मनाच्या खोल अवस्थेत जायला पाहतात, त्यामुळे मुख स्तोत्र म्हणण्यात रस घेत नाही. तशी अवस्था आल्यास स्तोत्र बळेच चालू करण्याचा अट्टाहास करू नये. अशी उन्मनी अवस्था बराच काळ राहते. आता मनातील विचार पांगुळतात. चित्त एक विषयक बनते. यानंतरची अवस्था म्हणजे मन मनाची कक्षा ओलांडून चित्त अवस्थेत जायला पाहते. मनावरील संस्कार नष्ट झाल्यास त्या उच्च शुध्द अवस्थेला चित्त असे म्हणतात. चित्त स्वस्थ झाल्याने श्वास सुध्दा बंद पडायला पाहतो. ही अत्युच्च प्राकृतिक अवस्था असते. त्यामुळे घाबरून न जाता तशाच श्वासविरहीत अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करावा. या उच्च अवस्थेला ‘अ-श्व’ अवस्था म्हणजे श्वासविरहीत अवस्था असे म्हणतात.

                  ही श्वासविरहीत अवस्था कित्येक साधकांना भयावह व तापदायक वाटते; पण त्यांनी घाबरू नये. श्वास आपोआप चालू होतो व मनावरील दडपण कमी होते. श्वासाची प्रक्रिया पुन: चालू करण्याच्या प्रक्रियेला ‘अश्वमेध यज्ञ’ असे नाव दिले आहे. रामायणात श्रीराम सर्व रामायण आटोपल्यावर आणि महाभारतात धर्मराज सर्व महाभारत युद्ध संपल्यावर असाच अश्वमेध यज्ञ करतात. अश्वमेध यज्ञ म्हणजे खोल ध्यानात बंद पडलेला श्वास पुन्हा सुरू करण्याचा पराक्रम होय. श्वास बंद पडल्यावर शरीरातील रक्तप्रवाह सुध्दा बंद पडतो आणि साधक एका निरालंब केवल अवस्थेत असतो. यालाच समाधी अवस्था असे म्हणतात. पण ही झाली उच्च समाधी अवस्था. त्या अगोदर अनेक दिव्य अनुभव येतात. डोळ्यासमोर अनेक दिव्य व्यक्ती येऊन निघुन जातात. त्यांचा बोध होत नसतो. या अवस्थेला रामायणात कूट चित्रपटाची अवस्था म्हणजे चित्रकूट असे म्हटले आहे. उच्च धारणेच्या प्रत्येक साधकास ही चित्रकूट अवस्था येतेच. अनेक व्यक्ती एखाद्या चित्रपटासारख्या दिव्य दृष्टीसमोरून सरकत जातात; पण त्याचा बोध होत नसतो. कानात दिव्य नाद  ऐकू येतात, घंटानाद, मुरलीनाद, मृदंगाचा नाद, दुंदुभिचा नाद, चंद्रसूर्याचा नाद, ताऱ्यांचा नाद, मेघनाद इत्यादी नादांचा कल्लोळ होत असतो. त्यांना अनाहत म्हणजे कधीही नष्ट न होणारे नाद म्हणतात, पण समाधी अवस्थेकरिता असले निम्नस्तराचे नादानुभव मारक असतात. खऱ्या साधकाने त्यावर जायला हवे. मनाची उच्च अवस्था आल्याने खालच्या स्तरावर शरीराद्वारे काही मुद्रा आपण होऊन होत असतात. त्यातच काही साधक धन्यता मानतात. समाधिच्या उच्च अवस्थेकरिता असल्या मुद्रांचा लोप होणे आवश्यक असते. त्याला रामायणकार ‘लोपामुद्रा’ असे म्हणतात. ही लोपामुद्रा अगस्त्य ऋषिंची पत्नी दाखविली आहे. ‘अ’ म्हणजे नाही व ‘गस्त्य’ म्हणजे गतिमान अवस्था ! ज्या साधकाच्या मनाची चंचल गतिमान अवस्था संपून तो निरालंब निस्तब्ध परम समाधी अवस्थेत असतो त्याला रामायणकार ‘अगस्त्य ऋषी’ असे म्हणतात. समाधी अवस्था काही दिवस सुध्दा असू शकते. असल्या श्रेष्ठ योग्याला संसाररूप सागरच नसतो. तो संसारसागर पिऊन टाकतो. अगस्त्य असलाच संसार रूप सागर पिऊन टाकतात. असल्या कल्पावस्थेत साधकाचे शरीर न सडता, न कुजता बराच काळ राहू शकते. ही प्रकृतीची मूलावस्था होय. या दिव्य अवस्थाविरहीत अवस्थेत साधक केवळ असण्याचाच अनुभव करतो. याही पलीकडे काहीच नसते. ज्याचे वर्णन करणे शब्दापलीकडील व वाचेपलीकडील असते. म्हणूनच त्याला ‘अनिर्वाच्य ब्रह्म' असे म्हणतात. ऋग्वेदातील नासदीय सूक्तात या अवस्थेचे अतिशय सुंदर वर्णन आले आहे. शब्दापलीकडील दिव्य अवस्था शब्दात अंकित करण्याचा त्यात प्रयत्न आहे. 

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमापरोयत् किमावरीवः कुहकस्य शर्मनंभः किमासीद् गहनं गभीरम् । न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत् प्रकेतः । आनीदवातं स्वधया तदेकं तस्माध्दान्यंन परः किं चनास । (ऋग्वेद मंडल १०।१२।१-२)

आशय - त्या अती उच्च अस्तित्वाच्या अवस्थेत असत्य नव्हतेच पण सत्यही नव्हते (सत् म्हणजे असलेली खरी अवस्था होय) हे सर्व वस्तुजातमय विश्व प्राप्त होण्याकरिता जे माध्यम असावे लागते तेही नव्हतेच, त्या माध्यमाला धरून ठेवणारे व्योम म्हणजे अवकाशसुध्दा नव्हते. मग कोणी कोणाला आवरले? आणि कशाच्या द्वारे ही तत्वे उत्पन्न झालीत? ते गहन गंभीर तत्व तेव्हा कोठे होते? त्यावेळी मृत्यू नव्हता की, अमृतत्व नव्हते. त्यावेळेस रात्र म्हणजे अंधकार नव्हता किंवा पुढे सरकणारा प्रकाशही नव्हता. केवळ एकच एक होते आणि ते स्वत:त स्पंदन करीत होते. त्यानंतर काय होते हे सांगता येत नाही.

               सत्य जाणण्याची पराकाष्ठा या सूक्ताद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे पाश्चिमात्य विद्वान ह्या नासदीय सुक्ताची खूप प्रशंसा करतात. दृश्यमान जगताचे त्या अवस्थांना धरून जे ज्ञान प्राप्त करायचे त्याबद्दलचा प्रयत्न व त्याचे स्पष्टीकरण म्हणजे वेदातील सूक्ते होत. त्यांना मंत्रमयता नंतरच्या काळात लावली गेली. मंत्रमयता लावल्यावर त्याभोवती एक अद्भूत मंत्राचे वलय निर्माण करून वेदासारख्या दिव्य ज्ञानाला मंत्राचे मर्यादित रूप दिले गेले आणि त्याद्वारे भौतिक सुखाकरिता याचना करून त्या मंत्राचा उच्चार करून प्रयत्न करण्यात आले, धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका दिव्य अवस्थेचे हे काय अध:पतन होय! अनेक ज्ञानविज्ञानांचे विषय वेदात सूत्रमय पध्दतीने वर्णन केले गेले आहेत. सर्व विद्या विज्ञानाचे आगर म्हणजे वेद होत. आजच्या सर्व शोधांचे मूळ वेदात सापडेल. मन:स्वास्थ्याचे नियम, शारीरिक रोगांचे हरण, ज्योतिष शास्त्र, रसायन शास्त्र, विज्ञान, गणिताचे महान सिध्दांत, भूगोल परिक्षण, अंतराळ ज्ञान, वेगाचे शास्त्र, अवकाश ज्ञान,कालमापन  इत्यादी अनेक रहस्यमय ज्ञानाची उकल वेदात सूत्रमय पध्दतीने केली आहे. वेदांची भाषा न समजल्याने आपण त्यातून भलतेच तर्क काढून स्वत:चे समाधान करतो व समाज अज्ञानातच राहतो. ही अवस्था आता दूर केली पाहिजे. वेदांचा अभ्यास केल्यास त्यातून कितीतरी ज्ञानविज्ञानाची दालने उघडी होऊन मानव समाजाचे त्यामुळे भले होणार आहे. आज माहित नसलेले सिध्दांत आणि कूटशास्त्रे त्याद्वारे प्राप्त होऊ शकतील, पण तसा प्रयत्न व्हायला हवा.

लेखक - योगिराज मनोहर हरकरे    –९७०२९३७३५७ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी