सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - 8
बाळच्या अंगी उपजत असलेल्या मंत्रसिध्दी व स्पर्शसिध्दीने त्याने विंचवाचे विष उतरविले व पिशाचबाधाही नाहिशी केली.
बाळच्या अंगी अनेक शक्ती उपजतच आलेल्या आहेत हे हळूहळू सर्वांच्या ध्यानात येऊ लागले. बाळ लहान असला तरी ती एकूण दहा भावंडे असल्यामुळे मोठ्या भावांची लग्ने झाली होती. एकदा बाळच्या मोठ्या भावजयीला विचवाने दंश केला. दंश केलेल्या बोटाला अतियश वेदना होऊ लागल्या. काही केल्या विष उतरत नव्हते आणि वेदना थांबत नव्हत्या. सर्व उपाय सुरू होते, पण गुण पडत नव्हता. बाळ भावजयीची विचारपूस करण्यास जवळ गेला आणि त्याने भावजयीच्या दंश झालेल्या बोटाला स्पर्श केला तो काय आश्चर्य! भावजयीला अचानक वेदना कमी झाल्यासारखे वाटू लागले आणि काही क्षणांतच संपूर्ण वेदना थांबल्या व विष उतरले. सर्व आश्चर्यचकित झाले. हा चमत्कार कसा झाला हे मात्र खुद्द बाळलाही समजले नाही.
बाळला रामरक्षा मुखोद्गत झाली होती. एकदा त्याच्या मोठ्या बहिणीला पिशाचबाधा झाली असता बाळने बहिणीच्या जवळ जाऊन रामरक्षा म्हटली. बाळच्या मुखातून निघणाऱ्या रामरक्षेच्या प्रभावाने बहिणीची पिशाचबाधा नाहीशी झाली.
वरील सर्व घटना पाहिल्यावर भगवंत गोपालकृष्णांच्या बाललीलांची आठवण येते. भगवंत गोपालकृष्णांच्या बालपणीही त्यांनी स्वतःच्या अंगी असलेल्या दैवी शक्तींनी अनेक गंभीर संकटातून गोकुळवासियांची सुटका केली होती. गोपालकृष्णांच्या अंगी असलेल्या दैवी शक्तीची प्रचिती त्यांच्या मातापित्याला व गोकुळवासीयांना अशाच कठीण प्रसंगातून येत असे. योगी मनोहरांचे जीवनही संपूर्णपणे भगवंत गोपालकृष्णांच्या जीवनासारखेच होते. अन्यायाविरुध्द लढून सत्याला विजय मिळवून देणारे. भगवान गोपालकृष्ण जगाचा उध्दार करणारे एक महानायक होते, एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. असेच एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व, जगाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या मार्गाकडे नेणाऱ्या महानायकाचे व्यक्तिमत्त्व बाळच्या रूपाने हळूहळू घडत होते, साकारत होते.
वडिलांचे (श्रीकृष्णरावांचे) निधन
बाळ मनोहर आता मोठा होऊ लागला होता. बाळला कुणी 'मनू' तर कुणी 'बाळ' अशा नावाने संबोधू लागले. बाळने अजून कुठली आध्यात्मिक साधना वगैरे सुरू केली नव्हती. परंतु त्याचे मन मात्र शांत वातावरणामध्ये रमू लागले होते. घरी त्याच्यापेक्षा मोठी
सात भावंडे, तो आठवा आणि त्याच्यापेक्षा लहान दोन बहिणी असा एकूण दहा भावंडांचा सांभाळ राधाबाई श्रीकृष्णराव व्यवस्थित करत होते. त्यांच्या दहाही अपत्यांना त्यांनी कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नव्हती. या दहा भावंडांमध्ये सर्वात मोठे भाऊ दादा होते, तर त्यांचे खालोखाल आबा, भैया, अण्णा व बाळ असा भावांचा क्रम होता. बहिणींमध्ये सर्वात मोठी बहीण ताई व तिच्यानंतर बाई, जीजा, लीला आणि प्रभा असा बहिणींचा क्रम होता. एव्हाना बाळचे दोन मोठे भाऊ दादा, आबा व मोठी बहीण ताई यांची लग्नेही झाली होती. इतर भावंडांच्या लग्नाची जबाबदारीही आईवडिलांवर येऊ घातली होती.
बाळ मोठा होऊ लागला होता. बाळचे शिक्षण व्यवस्थित सुरु होते. या सगळ्या भावंडांना संगीताचा सूर हा जन्मतःच मिळाला होता. वडिल श्रीकृष्णराव यांचा आवाज अतिशय सुरेल आणि मधुर होता. कधीकधी ते अतिशय रसाळ वाणीत आणि गोड स्वरांत श्रवणीय असे कीर्तन करत असत. घरी मोठे देवघर बांधले होते. देवघरासमोर श्रीकृष्णराव आपल्या अपत्यांसोबत सुंदर कीर्तन करत असत. त्यांना त्या वेळी त्यांच्या अपत्यांमधील विशेषतः बाळ सुंदर संगत करत असे. वडिलांकडूनच या सर्व अपत्यांना सूर मिळाला होता. बाळने हळूहळू शास्त्रीय संगीत शिकणे सुरू केले होते.
श्रीकृष्णराव हे रूपगुणसंपन्न असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचेसारखेच सुंदर रूप, रंग या सर्व अपत्यांना प्राप्त झाले होते. वडिलांना अर्थात, श्रीकृष्णरावांना ही सर्व अपत्ये 'दाआजी' असे म्हणत असत. 'दाआजी' आपल्या अपत्यांना कधीच रागवत नसत की मारतही नसत. दाआर्जीचा लाडका पुत्र म्हणजे बाळ होता. बाळच्या अंगी असलेले दैवी गुण त्यांनी जाणले होते. दाआजींनी पुन्हा काही दिवस टपाल कार्यालयातील नोकरी केली होती आणि आता ते पोस्टमास्टर जनरल या पदावरून निवृत्त झाले होते. बाळला तेरावे वर्ष पूर्ण झाले होते आणि त्याने वयाच्या चौदाव्या वर्षात पदार्पण केले होते. दाआजींच्या निवृत्तीनंतर काही दिवस सर्व ठीक चालले होते. मात्र नियतीला जे मंजूर असते ते नियती बरोबर घडवून आणते. दाआजींना अचानक एक दिवस पोटात दुखून उलट्या होऊ लागल्या. अंगात फणफण ताप भरला. ताप काही केल्या उतरेना आणि उलट्या थांबेनात. वैद्यांनी तपासल्यावर सांगितले की टायफाइड आहे. दोन महिने झाले तरी गुण येईना. वैद्यांची औषधे सुरू होती परंतु दाआजींची तब्येत काही सुधारत नव्हती. बाळ दाआजींच्या सेवेतच रमला होता. दाआजींना अतिशय अशक्तपणा आला. खाटेवरून उठणे कठीण झाले. सर्वांना चिंता लागली. राधाबाईसुध्दा चिंताग्रस्त झाल्या होत्या. श्रीकृष्णरावांचे (दाआर्जीचे) वय तसे खूप जास्त नव्हते. त्यांच्या वयाला केवळ ५८ वर्षे पूर्ण झाली होती. परंतु नियतीसमोर कोणाचेही चालत नाही. दाआजींच्या शरीराला अतिक्षीणता आली आणि तशातच एक दिवस त्यांची प्राणज्योत मालवली. राधाबाईंसोबत संपूर्ण हरकरे कुटुंब शोकसागरात बुडाले. हरकरे कुटुंबाचा सगळ्यात मोठा आधार नियतीने त्यांचेपासून हिरावला. या मोठ्या आघातातून बाहेर यायला सर्वांना बराच अवधी लागला.
राधाबाई या दुःखातून सावरण्याचा कसाबसा प्रयत्न करू लागल्या. पाच-सहा अपत्यांना मोठे करणे, त्यांची लग्ने करणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांचेवर येऊन पडल्या. श्रीकृष्णरावांची पेन्शनची रक्कम खूप मोठी नव्हती. त्यामुळे एवढ्या मोठ्या संसाराला कसे सांभाळावे हा प्रश्न होता. बाळचे मोठे भाऊ 'आबा' हेही त्या वेळेस टपाल कार्यालयात नोकरीला होते. त्यांनीही संसाराचा थोडा भार स्वतःवर घेतला. परंतु त्यांचे लग्न झाले असल्यामुळे त्यांचेवर स्वतःचे कुटुंबाचीही जबाबदारी होती. बाळ आता १४ वर्षाचा झाला असल्यामुळे त्यानेही स्वत:वर संसाराची काही अंशी जबाबदारी घेण्याचे ठरविले. बाळने शाळेला लागणाऱ्या पाटी-लेखणी इत्यादी साहित्य विकून घरखर्चाची थोडी जबाबदारी स्वतःवर घेतली. पाटी लेखणी विकणे, अधेमधे कुणाच्या घरची छोटीमोठी कामे करणे, शिकवण्या करणे अशा अनेक कष्टिक मार्गांनी जी काही तुटपुंजी रक्कम हाती येत असे ती बाळ आपल्या कुटुंबाच्या मदतीसाठी आईजवळ देत असे. बाळचे मोठे भाऊ 'दादा' त्या वेळी कॉंग्रेसच्या उपक्रमांमध्ये काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून व्यस्त असल्याने त्यांचेकडून कुटुंबाला कुठलीही मदत होत नव्हती. घरखर्चासाठी अनेक प्रकारचे कष्ट घेऊन बाळ आपले शिक्षणही जिद्दीने पूर्ण करत होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा