कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 8
इंद्रियांची क्षमता आणि दिव्यानुभूती
एका सेकंदात २० ते २०,००० स्पंदने असणारे आवाजच आपल्या कानाला ऐकू येतात. कानातील पडदे २० अथवा २०,००० स्पंदनांच्या खाली अथवा वर असलेले आवाज ग्रहण करून त्याचे ज्ञान देऊ शकत नाहीत. योगमार्गाचा अभ्यास करून कानाची क्षमता वाढवून २० च्या खालील आणि २०,००० वरील कंपने कानाने ऐकण्याची शक्ती वाढविता येते. योगी कानाने पाहू शकतो आणि स्पर्शही करू शकतो. डोळ्यांची क्षमता वाढवून योगी पहाण्याच्या क्रियेद्वारे ऐकूही शकतो. म्हणून सूर्यचंद्रताऱ्यांच्या प्रकाशाद्वारे त्यांचे नादही ऐकू येऊ शकतात. असल्या नादांना अनाहत नाद असे म्हणतात. एवढेच नव्हे, तर शरीराच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे पंचगुणात्मक म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यासारखे अनुभव घेऊ शकतो, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. वटवाघूळ रात्रीच्या काळोखात सुखनैव इतस्ततः उडत असते. रात्रीच्या काळोखात त्याला कसे काय दिसते या प्रश्नाचा उलगडा आता झाला आहे. उडताना वटवाघूळ आपल्या तोंडाद्वारे एकप्रकारचा स्वरातीत आवाज उत्पन्न करीत असते. तो आवाज समोरील वस्तूंवर आदळून परावर्तित होऊन वटवाघूळाकडे परत येतो, परंतु परत येणाऱ्या स्वरातीत आवाजाची क्षमता आता वाढलेली असते. तो परतलेला स्वरातील आवाज त्या वटवाघूळाच्या शरीरावर आदळून वटवाघुळाला त्या परावर्तित आवाजाच्या द्वारे दूरस्थ वस्तूंचा आगाऊ स्पर्श होत असतो. त्यामुळे वस्तूपासून दूर असून सुध्दा त्याचा स्वरातीत स्पर्श आगाऊ झाल्यामुळे वटवाघूळ त्या वस्तूवर न आदळता त्याला चुकवून अन्य स्थळी जात असते. अशा तऱ्हेने स्वरातील आवाजाचे परिवर्तनाचे रूपांतर स्पर्श गुणात होऊन रात्रीच्या अंधकारात सुध्दा वटवाघूळाला सुखनैव उडता येते. योगीसुध्दा असल्याच क्लुप्तिने दूरचा स्पर्श करू शकतो, दूरचा ध्वनी ऐकू शकतो, दूरचे पाहू शकतो, आणि असलेच चमत्कारीक वाटणारे प्रयोग करू शकतो, पण त्याकरिता इंद्रियांची क्षमता वाढवावी लागते. बोलपटात असल्याच तंत्राचा वापर करून प्रकाशाचे रूपांतर नादात केले जाते. चित्राच्या पट्टीवरील प्रकाश पुंजक्याद्वारे किरणशलाका पलीकडील विद्युत उपकरणावर पाडल्या जातात. त्या प्रकाशाचे रूपांतर ध्वनीत केले जाऊन चित्रपटातील सर्व संभाषणे व नाद-लहरी श्रोत्यांना सादर केली जातात. ही कार्ये उपकरणांच्याद्वारे केली जातात. योगी आपल्या इंद्रियांची क्षमता वाढवून हे करू शकतो. प्रत्येक इंद्रियावर चित्त एकाग्र करून योगी त्यांची क्षमता वाढवून त्याद्वारे पंचगुणात्मक दिव्य अनुभव घेऊ शकतो. असले अनुभव इतरांना चमत्कारिक व असंभाव्य वाटतील; पण योगी तसले दिव्य अनुभव घेऊ शकतो, त्यातील हे शास्त्र आहे. हे प्रयत्नांचे शास्त्र आहे.
अध्यात्माची आवश्यकता :
स्वत:त असलेले दिव्य अस्तित्व ओळखणे म्हणजे अध्यात्म होय, ‘अध्य+आत्म’ या दोन उपशब्दांद्वारे अध्यात्म शब्द तयार झाला आहे. परंतु प्रमुख प्रश्न असा येऊ शकतो की, अध्यात्माची आवश्यकताच काय आहे? केवळ अध्यात्मिक कल्पना अथवा जीवनयापन करून मानवाला काय लाभ आहे ? प्रत्येक वस्तुजाताचे अथवा अस्तित्वाच्या मूळात जाऊन त्याचा शोध घेणे बुध्दिमान मानवाचा धर्म असतो. आणखी एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो की, असल्या मूलशोधनाची आवश्यकताच काय? आजचे वैज्ञानिक उत्क्रांत जग असल्या गूढ शोधाचेच फल होय. प्रत्येक अवस्थेच्या पलीकडे जाण्याची वृत्ती नसती तर इतके शोध लागून मानवी जीवन समृध्द व समाधानी झाले नसते. एखादे उपकरण अथवा यंत्र शोधले गेल्यानंतर सुध्दा त्यात समाधान न मानता त्यापेक्षाही अधिक उपयुक्त व सोयीस्कर यंत्र शोधून काढण्याची प्रवृत्ती संशोधकांत दिसून येते. त्याचा लाभ समाजातील यच्चयावत् घटक घेत असतात. त्या उपकरणांचा उपयोग करण्याची एक पध्दत व शिस्त असते. त्या शिस्तीने वागल्यास ती ती उपकरणे सुयोग्य तऱ्हेने वापरता येतात. अंतराळात प्रवास करणाऱ्या अंतराळयात्रींना तर अधिक शिस्तीने व संयमाने वागावे लागते. अन्यथा ते चंद्रावर अथवा अन्य ग्रहांवर जाऊच शकत नाहीत. विज्ञानापलिकडील मूळ अवस्था जे अध्यात्म, त्याची आवश्यकता यासाठीच असते. साधारण जीवनाकरिता जर शिस्त व संयम आवश्यक आहे तर चिरंतन सुखदायी अध्यात्माकरिता आवश्यक अशी शिस्त व संयम का ठेवू नये ? उत्क्रांतीत संयम आवश्यक असतो. उत्क्रांत जीव आपल्या जुन्या सवयी टाकून उच्च उत्क्रांत सवयींनी वागत असतो. त्यामुळेच उत्क्रांत जीवन शक्य झाले आहे. म्हणून ज्यांना मानवाचे अधिक उत्क्रांत जीवन आवश्यक वाटत असेल असल्या विचारी व्यक्तींना अध्यात्माची आवश्यकता असते. उत्क्रांत आणि सुसंस्कृत जीवनाला आवश्यक असे संयमपूर्ण जीवन आजच्या पिढीला आवडत नाही. निसर्गातील पशूंचे स्वैर जीवन त्यांच्या समोर असल्याने तसल्या स्वैर जीवनाचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने ते निसर्गातील पशू जीवनाचा हवाला देतात आणि तसले स्वैर पशू जीवन सुखी असते असे मानतात. लग्न संस्था अथवा समाज नियमांच्या बंधनाचा त्यांना विचार नसतो. तसल्या बंधनांमुळे खरे सुख आणि उपभोग मिळू शकत नाही अशी त्यांची धारणा असते. त्यांच्या कल्पनेप्रमाणे ज्या समाजाने त्यांच्याकरिता काही केले नाही त्या समाजाकरता त्यांनी संयम आणि त्याग का करावा? असा ते प्रश्न विचारतात, निसर्गत:च असणाऱ्या लैंगिक आकर्षणामुळे ते नवपिढीला जन्म देतात आणि नैसर्गिक वात्सल्य भावनेमुळे संततीचे भरणपोषण करतात. तसे करताना ते पुढील पिढीवर उपकार करीत नसतात. नवी पिढी स्वत:चे कष्ट व बुध्दी सामर्थ्यावर आपले उदरभरण करून आपली जीवनयात्रा सुखाने चालवू शकते. सुयोग्य व्यक्तीच जीवनाच्या संघर्षात जगू शकतात असे त्यांचे मत असते. म्हणून जिवंत राहण्याकरिता तथाकथित सुसंस्कृत आचार विचार व संयमात राहण्याची त्यांना आवश्यकता नसते. उलट असले विचार जीवन दुःखी व बंधनात ठेवल्यासारखे आहेत असे ते मानतात. असले स्वतंत्र विचार करणारे लोक अध्यात्म अथवा सामाजिक नीती या गोष्टी आपल्या वैयक्तिक बडेजावाकरिता राबणाऱ्या शिष्ट लोकांचे इतरांना मूर्ख बनविण्याचे कारस्थान आहे असे मानतात. असल्या लोकांना धर्माची, अध्यात्माची पर्वा नसते. असल्या विचारांना ते अफूची गोळी मानतात. अशांचे असे म्हणणे काही अंशी खरे असते, कारण माकडे जशी झाडाला चिकटून राहतात तद्वत सामाजिक, भौगोलिक दृष्ट्या मान्य असलेल्या खुळचट चालीरीतींनाच धर्म मानून अनेक लोकांना अधिकाधिक संख्येत आपल्या संख्या गटात येनकेन प्रकारेण ओढून आणून त्यात निरर्थक धन्यता मानणारे धार्मिक लोकही आज कमी नाहीत. आत्मज्ञानाकरिता धर्मपंथांची स्थापना झालेली असते, संख्याबलाचा अहंकार करण्याकरिता नव्हे.
लेखक - योगिराज मनोहर हरकरे –९७०२९३७३५७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा