कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 9

 धर्माच्या नावावर स्वार्थ साधणाऱ्या लोकांना दारिद्र्य, अज्ञान आणि आत्मविस्मृती असल्या मानव जीवनाला मारक आचार विचारांची पर्वा नसते. ते आपला मोठेपणा दाखविण्याकरिता काय वाटेल ते करतील; पण स्वत:चे जीवन मात्र त्या आदर्शापासून वंचित ठेवतील. असल्या फसव्या पाखंडी लोकांचे जीवन असल्या नव विचारी व्यक्तींसमोर असल्याने ते अध्यात्म अथवा सुसंस्कारित जीवनाला दांभिक मानतात. अध्यात्माची कास धरून राजकारण करणाऱ्या अथवा राजकारणाचा आधार घेणाऱ्या अध्यात्मिक कार्यकलापाबद्दल आपणास कर्तव्य नाही. पूर्णत्व आणण्याकरिता आवश्यक अशा उत्क्रांतीच्या अग्रवत् मार्गाबद्दल आपणास विचार करायचा आहे. उच्चावस्थांकरिता निम्न अवस्थांचा त्याग केल्याशिवाय उत्क्रांती घडत नसते. उत्क्रांतीच खालच्या अनुत्क्रांत अवस्थांचा त्याग करायला लावते, जसे सुरवंट स्वत:भोवती कोष तयार करून काही काळ त्यात राहून त्यापेक्षा उच्च अशी फुलपाखराची अवस्था प्राप्त करतात, व निम्न सुरवंट अवस्थेचा नाश करतात. उत्क्रांतीच्या नियमानुसार न वागणाऱ्या योनीत आपल्या योनी-अस्तित्वालाच मुकावे लागते. प्राचिन डायनासोर इत्यादी भव्यकाय योनींना असाच स्वसंहार पहावा लागला. म्हणून ज्यांना उच्च उत्क्रांत जीवन जगायचे असेल त्यांना सुखावह व आकर्षित वाटणाऱ्या निम्न अवस्थांचा त्याग करावाच लागेल, अन्यथा नष्ट होणे हाच त्यांच्या समोर पर्याय आहे. उन्नत जीव अनुत्क्रांत जीवनाच्या आकर्षणाला कधीच बळी पडत नसतात. उत्क्रांतीला उन्नत उच्च संस्कारित जीवन हवे, जे जीवन शर्यतीत टिकेल. उत्क्रांती म्हणजे संस्कारित जीवन होय, जे उच्च संस्कृतीला जन्म देत असते. संस्कृतीचा येथील आशय कथित धर्मपंथ अथवा सभ्यता नव्हे. असल्या कथित धर्मपंथाचा व भौगोलिक सभ्यतांचा पूर्वकालात बरेच वेळा नाश झाला आहे. जे सनातन सत्य असेल तेच या प्रवाहांत टिकेल. अन्य अवस्थांचा नाश होऊन त्यांचे नाव सुध्दा राहणार नाही. म्हणून सुसंस्कारित सुसंस्कृत विचारी जीवन उत्क्रांती करता आवश्यक आहे. वैदिक परंपरा सहस्त्रावधी वर्षांपासून हेच सांगते. सनातन याचा अर्थ जे जुने सत्य असेल ते नवीन कालाला धरून त्या भाषेत व स्वरूपात मांडणे होय. सत्याला जुने अथवा नवे असे काहीच नसते, जसा सागर जुनाही नसतो अथवा नवीनही नसतो. तो सदा भरलेला असतो, तो जीवांचे जीवन असतो ! 

आपण सुखाकरिता सुख देणाऱ्या उपकरणांवर अवलंबून राहतो; पण ती सुखद उपकरणे शोधून काढण्याकरिता वैज्ञानिकांना आयुष्याची अनेक वर्षे कष्टात घालवावी लागतात तेव्हा सुखद उपकरणे ते शोधून काढू शकतात, सुखाच्या लालसेकरिता आपण सापाच्या कातेप्रमाणे निम्न अवस्थांचा त्याग करित असतो. उच्च अवस्थांकरिता निम्न अवस्थांचा त्याग हा उत्क्रांतीचा रूढ मार्ग आहे. सुखाच्या अनुत्क्रांत अवस्थांना चिकटून बसणाऱ्या लोकांना खरे सुख तर मिळणार नाहीच; पण जीवनाच्या शर्यतीत लवकर नष्ट व्हावे लागेल. मानवाचे शरीर व जीवन उत्क्रांतीची उच्चतम अवस्था आहे असे मानण्यात येते आणि हे खरेही आहे; पण अजून एक उच्च उत्क्रांत अवस्था शिल्लक राहिली आहे आणि ती म्हणजे परमोच्च योगी होय. योगी हा परमात्म अवस्थाच होय कारण तो प्रकृतीवर पूर्ण नियंत्रण ठेवून प्रकृतीच्या सदा वर असतो. प्रकृतीच्या अधीन नसून तो प्रकृतीला राबवितो. उत्क्रांतीद्वारे होणाऱ्या उन्नयनाला अगणित काल लागतो. तावत्काल ज्यांना थांबायचे असेल त्यांनी थांबावे; पण पराक्रमी पुरूष इतका काळ थांबत नाही. तो ‘याची देही याची डोळा’ पूर्णत्व अपेक्षितो. त्या पूर्णत्वाकरिता संयम व सतत परिश्रम आवश्यक असतात. पूर्वी पृथ्वीच्या अन्य भागात जाण्याकरिता पायी अथवा घोड्यावर बसून यात्रा करीत असत. नंतर आगगाड्या निघाल्या. त्यांनाही वेळ लागतो म्हणून आता विमानाचा प्रवास सर्वात जलद व सुखकारक मानला जातो. ज्याला ज्याला शक्य आहे तो विमानयात्राच  पसंत करतो. अशा रितीने आपल्याला काळाच्यावर जायचे असते. त्याकरिता अध्यात्ममार्ग अथवा योग मार्ग अत्यंत सुयोग्य मार्ग आहे. योगी उत्क्रांतीची अंतिम अवस्था होय, योगी प्रकृतीला आपल्या दिमतीत ठेवतो, तो स्वयंभु संपूर्ण अस्तित्व होय. मानवी जीवनाचे हे अंतिम आश्रयस्थान आहे. असल्या परमयोग्यांना पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकताच नसते. जीवनयात्रा असेपर्यंत तो देहा द्वारे कार्य होऊ देतो, जसे किल्ली दिलेल्या घड्याळाचे काटे घड्याळाच्या स्प्रिंगमध्ये ताण असे पर्यंत चालू राहतात. गीता असल्या परमयोग्याचे वर्णन करते.

प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥५५.अ. २ !! एषा ब्राह्मी स्थिति:पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । स्थित्वाऽस्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ।।७२,अ.२ !!


शरीर आणि तत्वज्ञान

               वैदिक परंपरेत ज्ञान प्राप्तिकरिता शरीराला अतिशय महत्वाचे आद्य उपकरण मानले आहे. ‘शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम्.’ प्रत्येक योनीचे शरीर त्याचे मागील योनीतील आवश्यक अशा संस्कारांचा अवतार असतो. अनेक असंख्य योनी जीवनाचा परिपाक म्हणजे त्या जीवाचे सद्य जीवन असते. मानवी जीवनाने उत्क्रांतीचे अथपासून इतिपर्यंत सर्व टप्पे अनुभवले आहेत. एक पेशीय अमीबा संतान वाढीकरिता स्वत:चे दोन भाग करून आपली जात अमर ठेवण्याचा प्रयत्न करतो. गांडुळ स्वत:त मादी व नराचे संभोग अवयव उत्पन्न करून स्वत:च स्वत:चा संभोग घेते व संतान उत्पन्न करून आपल्या वंशाची वेली अमर ठेवण्याचा प्रयत्न करते. मासा पाण्यात तर पक्षी आकाशात समाधान मानायला लागला. मानवाने या सर्व योनि-वैशिष्ठ्यांचा त्याग करून स्वतःचे उत्क्रांत शरीर संपादन केले पण त्याला पूर्वीच्या योनीप्रमाणे पाण्यात डुंबता येत नाही की हवेत उडता येत नाही. त्याने प्राकृतिक नियमांना राबवून पाणबुडीद्वारे सागराच्या तळाशी तर अवकाशयानाद्वारे अन्य ग्रहावर पदार्पण करण्यास आरंभ केला आहे. 

               मागील अनुत्क्रांत योनीच्या अनावश्यक गोष्टींचा त्याग करून मानव सद्य अवस्थेत अवतरित झाला आहे. त्याने मत्स्य अथवा पक्ष्याचे जीवन त्यागून आता तो आपल्या पायांनी भूमीवर चालत आहे. काही मासे व पक्षी जमिनीवर चालतात; पण त्यांच्या व मानवाच्या चालण्यात फरक आहे. पावसाळ्यात काही पतंग प्रकाशाकडे आकर्षिले जाऊन तेथे क्रीडा करतात, नंतर ते आपले पंख छाटून अळीप्रमाणे जमिनीवर वळवळू लागतात. त्यांच्यावर टपलेल्या पाली अथवा सरडे त्यांवर ताव मारीत असले तरी त्या पतंगाचे पंख तोडण्याचे कार्य उत्क्रांतिला धरूनच असते. पानावरील सुरवंट कोषात बध्द होऊन पंखाचा कीटक होतो हे उत्क्रांतिचेच लक्षण होय. मागील अवस्थांचा त्याग करून उच्च अवस्थांना ग्रहण करणे ही उत्क्रांतिची वाटचाल होय.

लेखक - योगिराज मनोहर हरकरे   

अधिक माहिती साठी संपर्क–९७०२९३७३५७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी