सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - संघकार्य
संघकार्य
------------
मनोहरांची संघाच्याप्रती आस्था आणि समर्पणाची वृत्ती बघून डॉ. हेडगेवार प्रभावित झाले होते. त्यांनी मनोहरांवर संघप्रचाराची जबाबदारी वाढविण्याचे ठरविले आणि मनोहरांकडे उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशात संघप्रचाराचे काम सोपविले. मनोहरांचे तेव्हा त्यांच्या नागपुरातील महालच्या वाड्यात राहाणे होते. संघकार्यालय इथून अगदी जवळ होते. या संघाच्या कार्यालयाजवळच श्री. रायकर यांचेकडे गुरुजी गोळवलकरांचे वास्तव्य होते. एकदा एका संघशास्वेत मनोहरांची गुरुजी गोळवलकरांशी भेट झाली. गुरुजी आध्यात्मिक पिंडाचे होते आणि मनोहरांनाही अध्यात्माची अतिशय आवड असल्यामुळे दोघांची मते जुळली. गुरुजींचा सहवास मनोहरांना वारंवार मिळू लागला./ डॉ. हेडगेवारांनी गुरुजींकडे कलकत्ता प्रांत संघप्रचारासाठी सोपवला होता. परंतु पुढे १९४० मध्ये डॉ. हेडगेवारांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले आणि गुरुजींना नागपूरला येऊन संघाची जबाबदारी सांभाळावी लागली.
सरसंघचालक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर गुरुजींनी संघाच्या प्रचारासाठी दहा प्रमुख लोकांची समिती नेमली. त्या समितीमध्ये मनोहरांचा आवर्जून समावेश त्यांनी केला. मनोहरांचा आध्यात्मिक पिंड, जिद्द, समर्पण भाव आणि प्रामाणिकपणा या सर्व गोष्टींमुळे गुरुजी मनोहरांवर अतिशय प्रभावित झाले होते. म्हणूनच गुरुजींनी मनोहरांकडे संघप्रचाराची मोठी जबाबदारी सोपवण्याचे ठरविले आणि त्यांनी बिहार, बंगाल, आसाम, ओरिसा या चार प्रांतातील संघप्रचाराचे संपूर्ण कार्य मनोहरांकडे सोपविले. मनोहरांचे वय अगदीच कमी, परंतु जबाबदारी तितकीच मोठी होती. ही जबाबदारी मात्र मनोहरांनी समर्थपणे पेलली.
संघ प्रचारासाठी मनोहरांना बिहार, बंगाल, आसाम, ओरिसा या प्रांतांमधे जाऊन वास्तव्य करावे लागले. त्यांचा प्रेमळ, शांत स्वभाव आणि संघाची तत्त्वे, वैशिष्ट्ये समजावून सांगण्याची शैली यामुळे सर्व प्रभावित होऊ लागले. मनोहरांनी अशा प्रकारे अनेक लोकांना एकत्रित केले आणि त्यांना संघाचे कार्यकर्ते बनविले. संघ कार्यकर्त्यांचा एक मोठा समुदाय मनोहरांनी या प्रांतांमध्ये निर्माण केला. अर्थात, यामागे मनोहरांची प्रचंड मेहनत, चिकाटी, जिद्द आणि लोकसंग्रह करण्याचे कौशल्यही होतेच. हे सर्व करताना मनोहरांना अतिशय कठीण कठीण प्रसंगातून जावे लागले. कधी-कधी दोन-दोन, तीन-तीन दिवस पोटात अन्न नसे, कधी-कधी त्यांचेमागे मारेकरीही लावले जात. या सगळ्या कठीण परिस्थितीतून मनोहर मार्ग काढीत होते. कधी राहायला छत मिळे; तर कधी जंगलातून मारेकऱ्यांपासून वाचत-वाचत प्रवास करावा लागे. परंतु संघप्रचाराची जी धुंद त्यांचेमध्ये होती तिच्यापुढे या सर्व गोष्टी त्यांना मामुली वाटत होत्या. त्यांची चिकाटी, मेहनत आणि कार्यशैली बघून संघाचे सर्व कार्यकर्ते त्यांना मनोहरराव व बाळासाहेब असे सन्मानाने संबोधू लागले. इथूनच मनोहरांचे 'मनोहरराव' हे नाव प्रचलित झाले.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा