सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - भुतावळ्या वाड्यात
--------------------------------------
भुतावळ्या वाड्यात वास्तव्य
--------------------------------------
पवनीच्या आबाजी नाईकांनी मनोहररावांना व शालिनीताईंना राहाण्यासाठी आपला वाडा दिला होता त्यालाही एक कारण होते. या वाड्यात कोणी राहाण्यास तयार होत नसत. तिथे भूतपिशाच असल्याची चर्चा होती व काही लोकांचा तसा अनुभव होता. नाईकांनी विचार केला की मनोहरराव व शालिनीताई एका खोलीच्या छोट्या घरात राहात आहेत तेव्हा त्यांना आपला खाली असलेला वाडा द्यावा. ते कधीकधी शालिनीताईंना विचारत असत, "का गं? तुला इथे काही भूत वगैरे दिसते का?' त्यांच्या या प्रश्नाला शालिनीताई नेहमी हसत-हसत 'नाही' उत्तर देत असत. पवनीवासीयांनाही कधीकधी आश्चर्य वाटे की त्या भुतावळ्या वाड्यात हे हरकरे दांपत्य कसे राहात असावे? मनोहररावांना अनेकदा संस्थेच्या कामानिमित्त बाहेरगावी जावे लागे तेव्हा तर शालिनीताई एकट्या त्या वाडयात अपत्यासह राहात असत. त्या वेळी तिथे वाड्यात वीज नव्हती. रात्र कंदिलाच्या उजेडात काढावी लागे. परंतु शालिनीताई खंबीर आणि मजबूत होत्या. त्यांनी खंबीरपणे या वाड्यात दिवस काढले. ज्या वाड्यात मनोहरराव आणि शालिनीताईंसारखे आध्यात्मिक दांपत्य असेल तिथे भूतपिशाचांची काय टाप! या हरकरे दांपत्याच्या वास्तव्यामुळे तेथील पिशाचबाधा केव्हाच गेली होती. शालिनीताईंचा हा खंबीरपणा आणि मजबूतपणा याला दाद द्यावीच लागेल. कुठलीही स्त्री अशा भुतावळ्या वाड्यात राहाणे पसंत करणार नाही. शालिनीताईंनी मात्र नवऱ्याला साथ देण्यासाठी हेही करून दाखविले होते.
------------------------------------------
आणखी दोन अपत्यांचा जन्म
------------------------------------------
याच कालखंडात १९५४ साली मनोहरराव आणि शालिनीताई यांना दुसरे अपत्य, कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांची दुसरी कन्याही मोहक आणि गोंडस होती. या कन्येचे नाव 'मुक्ता' असे ठेवण्यात आले. लता आणि मुक्ता या दोन गोंडस कन्यांच्या सहवासात दिवस आनंदात जात असताना शालिनीताईंनी दोन वर्षांनी म्हणजे १९५६ साली पुन्हा एका पुत्रास जन्म दिला. शालिनीताई आणि मनोहररावांचे हे पहिले पुत्र अपत्य असल्याने संपूर्ण पवनी गावात आनंद सोहळा झाला. मनोहरराव हे उत्तम शिक्षक म्हणून पवनी गावात प्रसिध्द होते. त्यामुळे संपूर्ण पवनीतील नागरिक त्यांचा आदर करत असत. हरकरे मास्तरांना मुलगा झाल्याची बातमी गावात पसरताच संपूर्ण गावाने आनंद व्यक्त केला. संपूर्ण गावात मिठाई वाटण्यात आली. मुलाचे बारसेही थाटात होऊन संपूर्ण गावाला भोजन देण्यात आले. मनोहररावांची सर्व भावंडे या बारशाला उपस्थित होती. त्यांचे मोठे बंधू बाबूराव हरकरे यांनी या पुत्रासाठी त्र्यंबक हे नाव सुचविले आणि या पुत्राचे नाव 'त्र्यंबक' ठेवण्यात आले. पहिला मुलगा असल्यामुळे त्र्यंबक बाळाचे खूप कौतुक झाले.तीन अपत्यांना सांभाळून शालिनीताई घरचे सर्व काम सांभाळीत असत व बालकमंदिरही चालवीत असत. शालिनीताईना मदतीसाठी मनोहररावांनी बैनाबाई नावाची एक घरकाम करणारी बाई लावून दिली होती. ही बैनाबाई अतिशय प्रेमळ होती. शालिनीताईचे तीनही अपत्यांना तिने प्रेमाने सांभाळले. एव्हाना मनोहररावांनी वैनगंगा शाळेची चांगली भरभराट केली होती. एक आदर्श शिक्षक म्हणून मनोहररावांची सर्वत्र ख्याती पसरली होती. गावातल्या लोकांना अडी-अडचणीच्या वेळी ते नेहमी मदत करत असत. त्यामुळे लोकांचे ते श्रध्दास्थान बनले होते. मनोहररावांची प्रातः कालची साधना वैनगंगेच्या किनारी नित्यनियमित सुरू होती. याच काळात मनोहररावांनी वैनगंगा विद्यालयाचा विस्तार करण्याचे ठरविले..
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा