सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - शालिनीताई हरकरे
शालिनीताई हरकरे यांचे कष्टिक पूर्वायुष्य
-----------------------------------------------------
शालिनीताईंच्या वडिलांची भावंडे व नातेवाईक असा बराच गोतावळा होता. परंतु स्वार्थ आणि लोभ जागृत झाला की माणूस आप्तांनाही परका करतो. छबूच्या आईला हाच अनुभव आला. नातेवाइकांनी त्यांची सर्व संपत्ती, जमीनजुमला हडप केला आणि या मायलेकींना घराबाहेर काढले. छबूच्या आईने त्यांना अनेक विनवण्या केल्या, परंतु सर्व व्यर्थ ठरल्या. सोबत लहान मुलगी आणि पुढचे पहाडासारखे आयुष्य असे फार मोठे संकट छबूच्या आईवर आले. मायलेकींची ही दयनीय अवस्था पाहून छबूचे दूरचे मामा, छबूच्या आईच्या दूरच्या नात्यातले एक भाऊ त्यांचे मदतीला धावून आले. यांचे नाव होते लक्ष्मणराव कुर्थे. सर्व त्यांना बाबूराव कुर्थे म्हणत ते ब्रह्मपूरीला राहत. त्यांची पत्नीही लग्नानंतर अल्पकाळातच वारली होती. पुन्हा लग्न करण्याची त्यांची इच्छा नव्हती. अशातच बहिणीवर (छबूच्या आईवर) असा दुर्धर प्रसंग आल्याने बाबूरावांना या मायलेकींची दया आली आणि त्यांनी या दूरच्या नात्यातल्या बहिणीला, अर्थात, छबूच्या आईला व छबूला आपल्या घरी आश्रय दिला. खरोखरच, परमेश्वराची करणीही कुणाला न समजणारी आहे. हरण करणारा तोच आणि देणाराही तोच ! बाबूराव कुर्थेनी छबूच्या आईची आणि छबूच्या संगोपनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि ते नागपूरला आले. त्यांचा सांभाळ करू लागले.
छबू हळूहळू मोठी होऊ लागली. कुर्थे मामांची शिस्त कडक होती. त्यांचेसमोर बोलायची कुणाची हिम्मत नव्हती. छबू शाळेत जाऊ लागली. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि छबूने मॅट्रिक परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण केली. त्यानंतर अजून एक वर्ष छबूचे शिक्षण झाले. त्यानंतर मात्र तिचे शिक्षण बंद झाले. छबूचे आता लग्नाचे वय झाले होते. त्याकाळी मुलींची लग्ने अल्पवयातच होत असत. परंतु छबूचे जीवन असे परस्वाधीन. मामांपूढे शब्द काढणे कठीण. घरी धनही नव्हते. त्या काळी मुलीचे लग्न म्हणजे हुंडा देऊनही सर्व खर्च मुलीकडच्यांनाच करावा लागे. एवढा पैसा कुठून आणायचा हा प्रश्न होता. लग्नाची मुले छबूला पाहायला येत असत. परंतु धनाच्या अभावी बोलणी पुढे जात नसत. अशीच वर्षांवर वर्षे जाऊ लागली. होता-होता छबूचे वय आता ३२ वर्षांचे झाले होते. ज्या काळात मुलीचे लग्न तिच्या १५व्या वर्षी होत असे त्या काळात छबू ३२ वर्षांपर्यंत अविवाहित होती. याच्या किती वेदना छबूला झाल्या असतील याची कल्पना करणेही कठीण आहे. इतके वर्षे लग्न न जमणे याची पीडा आणि सोबतच समाजाचेही ताशेरे! छबूने मात्र हे सर्व शांतपणे सहन केले. इतक्या वर्षांचा काळ मात्र छबूने वाया घालवला नाही. या काळातच ती अनेक कलांमध्ये निपुण झाली. चित्रकला, विणकाम, पाककला, गाणे अशा अनेक गोष्टी तिने स्वतः शिकवण्या करून त्यातील प्राप्तीतून शिकल्या. राष्ट्रसेविका समितीमध्येही छबू जात असे. तिथेच तिने स्त्रीयांनी आपले रक्षण कसे करावे याचे शिक्षण घेतले व ते शिक्षण इतर मुलींनाही दिले. लाठी चालवून स्वत:चे रक्षण कसे करावे यात छबू तरबेज झाली होती. याचे शिक्षण तिने अनेक मुलींना दिले.
असेच दिवस जात होते आणि अचानक एक दिवस नियतीने जो योग घडवायचे ठरवले होते तो बरोबर घडवून आणला. नागपूरमधील हरकरें कडील धाकटा मुलगा मनोहर हा लग्नाचा असून मुलाचे वय मुलीच्या वयाशी जमते आहे ही गोष्ट बाबूराव कुर्थेच्या कानावर आली. लगेच निरोप धाडून हरकरे कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आणि हरकरेंचे धाकटे चिरंजीव मनोहरराव छबूताईंना पाहाण्यासाठी आले. मनोहरराव त्यांच्या या काळात अतिशय देखणे दिसत होते असे प्रत्यक्षदर्शी सांगत. मनोहररावांनी तारुण्यात आल्यावर आखाड्यात जाऊन भरपूर व्यायाम केला होता, शिवाय बिहार, बंगालमध्ये संघप्रचारार्थ गेले असता त्यांचा व्यायाम नियमित होता. तल्लख बुध्दी, अनेक भाषांवर प्रभुत्व, संघाचे संस्कार आणि आकर्षक देहयष्टी यामुळे मनोहररावांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच खुलले होते. छबूताईंच्या जीवनातील कष्टमय प्रवासाची कल्पना मनोहररावांना होती आणि म्हणून कदाचित त्यांचे लक्षात आले असावे की हीच मुलगी लग्नानंतर आपल्या आईची सेवा करू शकेल. मुलीला पाहाण्याचा कार्यक्रम झाला आणि सर्व सुरळीत जमून येऊन साक्षगंधही झाले व लवकरच लग्नही झाले. अर्थात, लग्नासाठी छबूताईंच्या आईने आपले ठेवणीतले दागिने विकून व कर्ज काढून निधी जमवला होता. लग्नानंतर छबूताई शालिनीताई हरकरे झाल्या. शालिनीताईंचे पूर्वायुष्य अर्थात, लहानपणापासून विवाहापर्यंतचा असा कष्टप्रद खडतर प्रवास म्हणजे त्यांच्या पुढील जास्त खडतर प्रवासाची जणू पूर्व तयारीच असावी.
-----------------------------------------------------
मनोहरराव व शालिनीताईंचा विवाह म्हणजे नियतीचा एक अपूर्व योग
-----------------------------------------------------
मनोहरराव आणि शालिनीताईंचा विवाह म्हणजे एक अपूर्व योगच होता. मनोहररावांनी सुरुवातीलाच निर्णय घेतला होता की संघाचे कार्यासाठी विवाह न करता अविवाहित राहावे. वयाची ३६ वर्षे होऊन गेली तरी ते अविवाहित होते. लग्न करण्याचा कुठलाही विचार नव्हताच. परंतु संघावरील बंदीच्या काळात त्यांचे तुरुंगात जाणे, इकडे नागपूरला आईची प्रकृती अतिशय खालावणे, आईने आपली शेवटची इच्छा पूर्ण करण्यास त्यांना नागपूरला बोलावणे, नेमके छबूताई उपगर्डेचेच स्थळ येणे, छबूताईंचे इतके वय होऊनसुध्दा लग्न न जमणे, मनोहररावांचे स्थळ येताच त्यांच्याशी ताबडतोब लग्न जमणे, तडकाफडकी लग्न होणे आणि मनोहरराव व शालिनीताई एकमेकांचे जीवनसाथी होणे या सर्व गोष्टी नियतीची एक रचनाच असावी असे वाटते. शालिनीताईंचे त्या काळात वयाच्या बत्तिशीपर्यंत लग्न न जमणे हाही नियतीचाच एक डाव असावा. अन्यथा मनोहररावांना (भविष्यातील एक श्रेष्ठ योगीपुरुष 'योगी मनोहर' यांना) शालिनीताईंसारखी सुशील, भगवत् भक्त आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची जोडीदार मिळाली नसती. मनोहररावांच्या पुढील आध्यात्मिक खडतर, काटेरी प्रवासात शालिनीताईंनी त्यांना सावलीसारखी साथ दिली होती. ही साथ देण्यासाठी शालिनीताईंचीच नियुक्ती नियतीने केली होती असेही म्हणणे जास्त योग्य ठरेल. कारण मनोहरराव त्यांच्या पुढच्या आयुष्यात जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे महान योगी ठरणार होते आणि त्यांच्या या महान आध्यात्मिक कार्यात त्यांना साथ देणारी पत्नीदेखील तितक्याच आध्यात्मिक उच्च योग्यतेची असणे आवश्यक होते. म्हणूनच शालिनीताईंचे इतके वर्षे लग्न न जमणे हा नियतीच्या रचनेचाच एक भाग असावा. याची अजून चांगली उकल पूढिल दृष्टान्तावरून होईल.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा