सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - मृत्यूचा (शवासनाचा) पहिला दिव्य अनुभव

पाटणा येथे मठामध्ये राहून मनोहररावांची रोजची दिनचर्या अशा प्रकारची होती. नंतर मठातील भोजन त्यांना मिळत असे. याच काळात जन्म-पुनर्जन्म-मृत्यू या विषयांवरील एका योगीपुरुषाचा ग्रंथ आणि गीतेतील 'वासासि जीर्णानी....' हे प्रकरण मनोहररावांच्या वाचनात आले होते. मृत्यूनंतर जीवात्मा शरीराच्या बाहेर कसा पडतो, जीवात्मा कसा असतो, पुर्नजन्म कसा होतो इत्यादी गूढ गोष्टी त्यांच्या वाचनात आल्या आणि त्यांना त्यात रस निर्माण झाला. ते सदैव त्यावर चिंतन करू लागले. एव्हाना त्यांची आध्यात्मिक साधना खऱ्या अर्थाने सुरू झाली नव्हती. परंतु पूर्वजन्मीचे आध्यात्मिक संस्कार त्यांच्या पिंडावर भरपूर झाले होते. हेच संस्कार त्यांना चमत्कारिक अनुभव देण्यास समर्थ होते. जन्म-मृत्यूसारखा गूढ विषय वाचनात आल्यानंतर मनोहरराव त्याच विचारात मग्न होते. मृत्यू काय असावा, जीवात्मा काय असावा याच चिंतनात ते होते. असेच एकदा सकाळचा व्यायाम, पोहणे, संध्या इत्यादी कार्यक्रम आटोपून ते मठाच्या समोर असलेल्या चौथऱ्यावर डोळे मिटून पडले होते. जेवण तयार व्हायला वेळ होता. व्यायामामुळे जोरात भूक लागली होती. ते चौथऱ्यावर डोळे मिटून पडले. पडल्यापडल्या त्यांचे डोक्यात जन्म-मृत्यूविषयीच विचार सुरू होते. त्यांना डोळा लागल्यासारखे वाटले आणि अचानक एक दिव्य गृह चमत्कारिक अनुभव त्यांना आला. पडल्या पडल्या त्यांना एकदम असे दिसले की, खाली त्यांचे शरीर झोपलेले आहे आणि ते शरीराच्या वर तरंगत आहेत आणि आपलेच शरीर पाहात आहेत. क्षणभर त्यांना काय होत आहे हे कळले नाही. थोड्या वेळात मात्र त्यांच्या लक्षात आले की ते शरीराच्या बाहेर निघालेले आहेत. त्यांचा जीवात्मा शरीराचे बाहेर निघून त्यांचेच शव पाहातो आहे, मृत्यू साक्षात मृत्यू! जिवंतपणी मृत्यूचा दिव्य, परंतु भेडसावणारा अनुभव क्षणभर ते घाबरले. कारण असा अनुभव याआधी कधीच आला नव्हता. भीती वाटायला लागली. साक्षात मृत्यूचाच अनुभव होता तो! 

आता कसे होणार या भीतीमध्ये काही क्षण गेल्यानंतर अचानक जोरदार धक्का बसल्यासारखे त्यांना वाटले. शुध्दीवर येतात तो काय! ते शरीरात पुन्हा परत आले होते. हाता-पायांची हालचाल करून ते उठून बसले. घाबरले होतेच, परंतु त्यांना सावरायला वेळ लागला नाही. त्यांच्या लक्षात आले मृत्यूचा गूढ अनुभव तो हाच! हीच ती जीवात्मा अवस्था जी शरीरापासून भिन्न आहे! हाच तो शारीरिक मृत्यू जो केवळ चिंतनाने त्यांना अनुभवायला मिळाला होता. लाल यावरून मनोहररावांची आध्यात्मिक प्रगती त्यांचे नकळतच किती उच्च अवस्थेला पोहोचली होती याची कल्पना येते. परंतु अजून खऱ्या आध्यात्मिक साधनेला त्यांनी सुरुवातच केली नव्हती. एखाद्या गोष्टीचे केवळ चिंतन करून ती गोष्ट, ती गूढ अवस्था प्रत्यक्ष अनुभवणारा हा महान जीवात्मा किती श्रेष्ठ आध्यात्मिक अवस्थेत असावा याची पुन्हा कल्पना येते. वरील चमत्कारिक घटनेचे प्रत्यक्ष योगी मनोहरांच्या तोंडून जसे ऐकले अगदी तसे इथे वर्णन आहे. एकदा आमच्या तुळशीबागेच्या घरी योगी मनोहर काही साधकांसोबत आध्यात्मिक चर्चा करत होते. त्या वेळेस काही साधकांनी उत्कंठेपायी योगी मनोहरांच्या पहिल्या मृत्यू अनुभवाविषयी विचारले असता योगी मनोहरांनी हा दिव्य अनुभव सांगितला होता. जे ऐकले ते तसेच्या तसे इथे लिहिले आहे. धन्य तो क्षण!


-डाॅ. दत्ताजी हरकरे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी