सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - महात्मा गांधींबरोबर

 

-------------------------------------------

महात्मा गांधींबरोबर मनोहररावांची बनगावची ऐतिहासिक यात्रा

संघात प्रवेशाआधी मनोहररावांनी १९४४-४५मध्ये महात्मा गांधींसोबत पूर्व बंगालमधील बनगाव या ठिकाणी यात्रा केली होती. बनगावमध्ये हिंदूंवर अतिशय अत्याचार होत होते. ते थांबविण्यासाठी गांधीजींनी मनोहररावांना आपले सोबत बनगावला नेले होते. मनोहररावांनी व गांधीजींनी तेथे जाऊन आपल्या अथक परिश्रमांनी तेथील हिंदूंना अत्याचारातून मुक्त केले. मनोहररावांची ही गांधीजसोबतची यात्रा एक ऐतिहासिक यात्रा होती आणि त्यांनी केलेले तेथील कार्य हे महान ऐतिहासिक कार्य ठरले.

महात्मा गांधीच्या अनुयायी वर्गात मनोहररावांची धाकटी बहीण प्रभा सुध्दा होती. त्याच अनुयायांमध्ये अग्रवाल नावाचा तरूण कार्यकर्ता होता. स्वतः गांधीजींनी या मारवाडी अग्रवाल तरुणाशी प्रभा हरकरे हिचा विवाह लावून दिला. या आंतरजातीय विवाहास मनोहरांवाच्या सर्व भावंडांनी विरोध करून प्रभा हरकरेला वाळीत टाकले. मनोहररावांनी मात्र आपल्या या धाकट्या बहीणीला कधीही अंतर दिले नाही. ते सदैव तिच्या पाठीशी उभे राहिले.

---------------------------------------

संघावर बंदी आणि तुरुंगवास

---------------------------------------

मनोहररावांनी संघप्रचाराच्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. बिहार, बंगाल, आसाम, ओरिसा या प्रांतांमध्ये तर त्यांनी उत्कृष्ट प्रचार करून अनेक कार्यकर्ते निर्माण केले होते. गुरुजींशीही त्यांची आता चांगली ओळख झाली होती व गुरुजींनी मनोहररावांमधील प्रतिभा, कळकळ, जिद्द आणि आध्यात्मिक बैठक ओळखली होती. गांधीजींची स्वातंत्र्य चळवळ नेटाने सुरू होती. यामध्ये गांधीजींना अनेकदा तुरुंगात जावे लागले. अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, अनेक स्वातंत्र्यवीरांना आपले प्राण गमवावे लागले. शेवटी सत्याचा विजय झाला आणि स्वातंत्र्यवीरांच्या स्वातंत्र्यासाठीच्या बंडखोरीपुढे इंग्रजांचे काही चालेनासे झाले. अखेर स्वातंत्र्याचा दिवस उजाडला आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्रता देऊन इंग्रजांनी भारतातून गमन केले. पाकिस्तानचीही निर्मिती झाली. ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनास्थळावर जाताना महात्मा गांधीजींची गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्येचा दोष पूर्णपणे संघावर लावण्यात आला आणि ताबडतोब संघावर बंदी घालण्यात आली. संघाचे सर्व कार्यकर्ते तुरुंगात डांबण्यात आले. मनोहरराव संघाचे कट्टर कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनाही अटक झाली आणि त्यांना कलकत्त्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. गुरुजी गोळवलकरांसोबत सर्व कार्यकर्ते तुरुंगात गेले. गुरुजींसह अनेकांनी संघावरची बंदी उठविण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

-----------------------------------------------------

आईच्या अंतिम इच्छेसाठी लग्नास होकार

-----------------------------------------------------

संघावर बंदी आली त्या काळातच नागपूरला मनोहररावांच्या मातोश्री राधाबाई यांची प्रकृती खराब झाली. अनेक उपाय करूनही प्रकृतीत सुधारणा नव्हती. राधाबाईंना जलोदर झाला होता. संपूर्ण शरीरात पाणी होऊ लागले होते. शरीर अतिशय ठणकत असे. राधाबाईंचा मनोहररावांवर/ अतिशय जीव होता. मनोहरराव भावांमध्ये सगळ्यात धाकटे होते. बाकी सर्व मोठ्या भावांची लग्ने झाली होती. मनोहरराव मात्र संघाचे प्रचारात व्यस्त असल्यामुळे त्यांचे लग्न अजून झाले नव्हते. तसेही मनोहररावांनी संघाचे कार्यासाठी लग्न न करण्याचे ठरविले होते. परंतु राधाबाईंची मनोहररावांचे लग्न बघण्याची मनापासून इच्छा होती. मनोहररावांना त्यांनी अनेकदा निरोपही पाठवला होता. शेवटी न राहवून राधाबाईंनी त्यांचे मोठे चिरंजीव बाबूराव यांना बोलावून सांगितले की कसेही करून मनोहरांचे मन वळवून त्यांना लग्न करण्यास सांगावे. राधाबाईंना लक्षात आले होते की आता त्यांचे आयुष्य फार कमी दिवस उरले होते. बाबूराव हे काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांनी आईचा निरोप मनोहररावांना कळविला आणि सांगितले की मनोहरने लग्न करावे ही आईची शेवटची इच्छा आहे. मनोहररावांना आईबद्दल अतिशय प्रेम होते. परंतु आईची तब्येत इतकी खालावली असेल याची त्यांना कल्पना नव्हती. तुरुंगातून सुटका होणेही अशक्य होते. बाबूरावांनी मनोहररावांची आईशी भेट व्हावी म्हणून ओळखीपाळखीने अनेक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले आणि आईच्या भेटीसाठी मनोहररावांची कलकत्त्याच्या सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली.

सुटका झाल्याबरोबर मनोहररावांनी थेट नागपूर गाठले. घरी आल्यावर आईची तब्येत अतिशय खराब झाल्याचे बघून त्यांना अतिशय दुःख झाले. आईविषयी मनोहररावांना अतिशय प्रेम होते. राधाबाईंनी मनोहररावांना ओल्या डोळ्यांनीच आपली शेवटची इच्छा बोलून दाखविली. "*बाळ, आता माझे जास्त दिवस नाही राहिले रे! मरण्यापूर्वी तुझे लग्न पाहावे आणि सगळ्यात छोट्या सुनेचे मुख पाहावे ही माझी शेवटची इच्छा तू पूर्ण कर बाळ! मी

आता जास्त जगणार नाही. माझी ही एवढी शेवटची इच्छा पूर्ण कर!" आईने काकुळतेने केलेली विनंती आणि त्यातील गांभीर्य मनोहररावांच्या लक्षात आले. त्यांचे हृदय सद्गदित झाले. त्यांचे लक्षात आले की आईच्या शेवटच्या इच्छेसाठी आपला लग्न करण्याचा निश्चय मोडावा लागणार. मनोहररावांसाठी त्यांचे जीवनात प्रथम आईचे स्थान होते. आईसाठी त्यांनी आपले अनेक निर्णय बदलले असते. लग्न न करण्याचा आपला निर्णय त्यांनी बदलला आणि आईच्या शेवटच्या इच्छेसाठी करण्यास होकार दिला. आई राधाबाई अतिशय आनंदी झाल्या. *आईसाठी आपल्या जीवनातला एवढा मोठा निर्णय बदलून मनोहररावांनी मातृप्रेमाचा एक आदर्शच समाजापुढे ठेवला असे म्हणावे लागेल. आईचे ऋण आपण जीवनात कधीच फेडू शकत नाही. त्यांनी लग्नाला होकार दिला आणि ते आईची अविरत सेवा करण्यात मग्न झाले. आईला औषधे देणे, दिवसभर आईचे ठसठसणारे शरीर दाबून देणे, आईची वस्त्रे धुणे, आईला जेवू घालणे अशी सर्व कामे मनोहरराव करू लागले. सर्व बहिणींची लग्ने होऊन त्या आपापल्या घरी गेल्या होत्या. इतर सुना अर्थात, मनोहररावांच्या भावजया राधाबाईंची सेवा करण्यास तयार नव्हत्या. राधाबाईंच्या अंगातून पाणी वाहत असे, त्या अंथरुणातून उठू शकत नव्हत्या. या सगळ्याची शिसारी आल्यामुळे त्यांच्या इतर सुना त्यांची सेवा करण्यास धजत नसत. मनोहररावांनी आईच्या संपूर्ण सेवेचा कार्यभाग स्वतःकडे घेतला.

संघावरची बंदी काढण्यात आली होती. अर्थात, संघावरची बंदी उठविण्यात मनोहररावांचा फार मोठा वाटा होता. गुरुजी गोळवलकरांसोबत सातत्याने चर्चा आणि तत्पश्यात वल्लभभाई पटेलांशी भेट घेऊन मनोहररावांनी संघावरील बंदी उठविण्यात मोलाचे सहकार्य दिले होते. मनोहरराव जेव्हा आईला भेटण्यासाठी कलकत्याच्या मध्यवर्ती कारागृहातून नागपूरला आले त्यानंतर आईला भेटून पुन्हा तुरुंगात जायची त्यांची तयारी होती. परंतु गुरुजी गोळवलकरांनी मनोहररावांना तसे न करता संघावरील बंदी उठविण्यास प्रयत्न करण्यास कळविले. त्यानंतर मनोहरायांनी सरदार वल्लभभाई पटेलांसह अनेक मोठ्या मंडळींची भेट घेऊन संघावरील बंदी उठविण्यात मोलाचे सहकार्य केले होते.

मनोहररावांचे वय आता ३६ वर्षांचे झाले होते. त्यांनी लग्नासाठी होकार दिल्यामुळे त्यांच्या मोठ्या भावांनी स्थळ शोधणे सुरू केले होते. आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे ठरविल्यामुळे मनोहररावांनी मुलगी बघण्यासाठी स्वतःच्या विशेष अटी ठेवल्या नव्हत्या. त्यांची फक्त एकच अट होती की त्यांच्या जीवनात पत्नी म्हणून येणाऱ्या स्त्रीने त्यांच्या आईची मनापासून सेवा करावी. स्थळाच्या शोधात असतानाच हरकरे कुटुंबीयांच्या संपर्कात

उपगडेंचे स्थळ आले आणि इथून आता एका इतिहासाची, एका नव्या अध्यायाची रचना मनोहररावांच्या जीवनात होण्यास खरी सुरुवात झाली.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी