सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - गणेशाचे दर्शन
---------------------------
गणेशाचे दर्शन
---------------------------
मनोहररावांना भगवान शिवशंकरांचे दिव्य दर्शन झालेपासून त्यांच्यातील अध्यात्माची रुची वाढू लागली होती. ते आता पवनी घाटाजवळच दाट वृक्षांमध्ये असलेल्या एका गणेशमंदिरात जाऊन पहाटे ध्यानास बसू लागले. हे गणेशमंदिर आजही पवनीला आहे. गणेशमंदिरातील नित्यनियमित ध्यानाने मनोहररावांना एक दिवस एका मंगल क्षणी श्री गणेशाचे आपदमस्तक विलोभनीय दर्शन झाले. या सुंदर क्षणाचे त्यांचेकडूनच ऐकलेले वर्णन तेवढेच श्रवणीय होते. गणेश दर्शन होण्याआधी प्रथम लाल वर्णाची अनुभूती येते. नंतर लाल आणि पिवळ्या रंगाचे संमिश्रण म्हणजे शेंदरी वर्णाची अनुभूती येते. या वेळी प्रथम जीव अतिशय घाबरतो आणि शरीराचा विलक्षण दाह होतो. हा दाह शांत होण्यासाठी साधकाने शिवाचे स्मरण करावे. यामुळे गणेशाचे दर्शनाचे वेळी होणारा त्रास कमी होतो. म्हणूनच भगवान शिवशंकरांना शास्त्रामध्ये गणेशाचे पिता मानले आहे. प्रत्यक्षात या अवस्थांमध्ये कोणी कोणाचा पिता किंवा पुत्र नसतो. काही वेळाने शेंदरी वर्ग सजीव वाटून त्यातून स्पंदनात्मक अनुभव येऊ लागतो. काही वेळाने या शेंदरी रंगाचे रूपांतर विशाल उदर अर्थात, लंबोदरात होऊन हे लंबोदर साधकाला स्पर्श करू लागते. ही अवस्था बराच काळ टिकते. या वेळी साधकाचा जीवही घाबरतो आणि साधक बेचैन होतो. परंतु साधकाने धीर सोडू नये. या अवस्थेची सवय झाल्यावर साधक तृप्तावस्थेचा अनुभव घेतो. यालाच मोदकाचा प्रसाद म्हणतात. काही काळाने शेंदरी लंबोदराच्या वर एक सोंड स्पंदन करताना दिसते व साधकाला स्पर्श करते. ओंकार ध्वनी सदैव सुरू असतो; घंटांचा नाद व इतर अनेक अनाहत नाद सुरू असतात. अशा अवस्थेतच एका मंगल क्षणी शेंदरी वर्णाचे एक सजीव, दिव्य अस्तित्त्व साधकापुढे प्रत्यक्ष साकारते. हेच दिव्य अस्तित्व म्हणजे साक्षात गणेश देवता असते. सोंड, विशाल कान, लंबोदर असे विलोभनीय सजीव दर्शन साधकाला गणेशाचे होते. या वेळी सर्व ब्रह्मांडात अनेक अनाहत नाद सुरू असतात. गणेशाचे असे सुंदर दर्शन फक्त एकच क्षण होते. परंतु या एका क्षणाच्या दर्शनानेच साधक पूर्ण तृप्त होतो. गणेशाला बुध्दिदेवता मानले आहे. म्हणून गणेशाचे दर्शन झाल्यावर साधक बुध्दिमान बनतो आणि एका तृप्तावस्थेचा (मोदक अवस्थेचा अनुभव घेत असतो. गणेश साधना आणि गणेश दर्शन म्हणजे बुध्दीची एक परम अवस्था आहे. म्हणूनच वेद व्यासजी या गणेश बुध्दिदेवतेलाच लेखक बनवून महाभारताची रचना करतात.
मनोहररावांना (श्री गणेशाचे) झालेले असे दर्शन म्हणजे त्यांच्या अत्युच आध्यात्मिक अवस्थेचे प्रतीक होय. मनोहररावांनी अर्थात, योगी मनोहरांनी गणेश दर्शनाचे केलेले हे दिव्य वर्णन खरोखरच अद्भुत आणि एकमेव असे आहे. त्यांच्यासारखे महान योगीच अशा देवतांच्या दर्शनाची इतकी सजीव वर्णने करू शकतात. (योगी मनोहरांनी केलेले गणेश दर्शनाचे इतके सुंदर वर्णन इतरत्र कुठल्याही ग्रंथात वाचायला मिळणे अशक्य आहे. योगी मनोहरांची ही प्रत्यक्ष अनुभूती आहे, केवळ कल्पना नाही.) पवनी पाटाजवळील दाट वृक्षांतील या गणेशाची साधना करतांना त्या साधनेच्या वेळीच रोज एक भला मोठा भुजंग तेथे येऊन वेटोळी करून राहत असे. या भुजंगाने मनोहररावांना कधी त्यास दिला नाही. मनोहररावांची साधना झाली कि तो भुजंगही तेथून निघून जात असे. हा एक चमत्कारच होता.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा