सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - आध्यात्मिक प्रगती
------------------------------------------------------------
आध्यात्मिक प्रगती आणि खालावणारी आर्थिक स्थिती
------------------------------------------------------------
योगी मनोहरांची आध्यात्मिक प्रगती अतिशय वेगाने सुरू होती. सर्व तत्त्वांची साकार निराकार दर्शने, अनेक देव-देवतांची दर्शने, संतमहात्म्यांची दर्शने, कुंडलिनी जागृती, विश्वाच्या मुळाचे रहस्य, महाशून्य अवस्था, समाधी अवस्था अशा अनेक गोष्टी त्यांना वेगाने प्राप्त होत होत्या. या सगळ्या अनुभवांमध्ये वायुतत्त्वाचा अनुभव मात्र फार कष्टदायक होता असे योगी मनोहर सांगत. वायुतत्त्वाचा अनुभव म्हणजे एका क्षणात संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रवास. हा अनुभव घेताना मोठमोठे योगी तो आवेग सहन न झाल्यामुळे शरीर त्यागतात. परंतु योगी मनोहरांनी हा भयानक आवेगही पचवला होता. परंतु असे करताना त्यांना भयानक शारीरिक पीडा सहन करावी लागली होती. ही पीडा सहन करताना त्यांना एक दिवस एका झाडाखाली एक योगीपुरुष भेटले आणि त्यांनी सांगितले की "घाबरू नको, तुझी या अवस्थेतून ज्ञानेश्वर माउली सुटका करतील". ज्ञानेश्वर माउलींनीच त्यांची पुढे यातून सुटका केली आणि योग्य मार्ग दाखविला असे योगी मनोहरांनी पुढे सांगितले.
याच काळात योगी मनोहरांनी त्यांचे घरासमोरच स्थापन झालेल्या योगाभ्यासी मंडळातही सेवा दिली. जनार्दन स्वामींचे अधेमधे योगी मनोहरांच्या घरी येणेजाणे असायचे. योगी मनोहरांच्या गाण्याच्या मैफिलीसुध्दा त्यांचे गायक मित्रांसह अधेमधे व्हायच्या. योगी मनोहरांनी त्यांचे गाण्याचे शास्त्रीय शिक्षण लहानपणी महाल भागात राहाणारे काळीकर गुरुजी यांचेजवळ झाले असा बरेचदा उल्लेख केला होता. योगी मनोहर आता उत्तम गायक तर होतेच शिवाय, ते गानयोगी झाले होते. संगीतातील दिव्य शक्ती त्यांनी आध्यात्मिक मार्गाने जाणली होती. गाता-गाता ते कधीकधी भावसमाधीत जात असत व बराच वेळ त्या ध्यानस्थ अवस्थेत बसलेले राहात. शालिनीताईसुध्दा गाणे शिकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या पाचही अपत्यांमध्ये गायनाचे अंग उपजतच आले होते. योगी मनोहरांच्या संगीतक्षेत्रातही मोठमोठ्या ओळखी होत्या. त्या काळातील त्यांचे मित्र आणि सोज्वळ व्यक्तिमत्व श्री. शामराव विलायची अधे-मधे योगी मनोहरांकडे येत असत. त्यांनीच योगी मनोहरांच्या पाचही अपत्यांना काही काळ शास्त्रीय संगीत शिकविले.
घरचा खर्च भाडेकरूंकडून येणाऱ्या भाड्यावर कसाबसा निघत होता. याच काळात योगी मनोहरांची हळूहळू आध्यात्मिक व्याख्यानेही होऊ लागली होती. परंतु ते कुठल्याच व्याख्यानाचे पैसे घेत नसत. हळूहळू त्यांची बाहेरगावीही व्याख्याने होऊ लागली. मोठी मुलगी लता आता वयात आली होती. तिचे सतरा वर्षे वय झाले होते. तिचे लग्न करण्याची वेळ आता झाली होती. पहिलेच स्थळ बघितले आणि लग्न जमले. मुलगा देखणा होता आणि कर्तबगार होता. योगी मनोहरांनी कर्ज काढून मुलीचे लग्न थाटात केले. इथून पुढे मात्र कुटुंब चालविण्यासाठी आर्थिक चणचण भासू लागली. कर्ज डोक्यावर होते. संसार चालवायचा होता. अजून चार अपत्यांचे शिक्षण, दोन मुलींची लग्ने अशा बऱ्याच जबाबदाऱ्या हरकरे दांपत्यावर होत्या. योगी मनोहरांनी आपल्या सर्व भावंडांना या आधी अनेकदा भरपूर आर्थिक मदत केली होती. दोन लहान बहिणींना तर घरे बांधून दिली होती. एकीला स्वतःच्या नावाचा प्लॉट फुकट दिला होता. परंतु आता योगीजींच्या कठीण समयी मात्र भावंडांनी पाठ फिरविली होती. कर्ज कसे फेडायचे हा मोठा प्रश्न योगी मनोहरांपुढे आ वासून होता. स्वार्थी भावंडांनी एक पैसुध्दा मदत करण्याचे नाकारले होते. योगी मनोहरांना आर्थिक अभावामुळे कुटुंब चालवणे अतिशय कठीण झाले होते. आर्थिक आवक वाढवण्यासाठी कुठलाच मार्ग नव्हता. शेवटी योगी मनोहरांनी आणि शालिनीताईंनी एक फार मोठा निर्णय घेण्याचे ठरविले. तो कठीण निर्णय म्हणजे त्यांचे रामनगरचे राहते घर विकण्याचा निर्णय! मनावर दगड ठेवून त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. जे घर शालिनीताईंनी आपल्या पावित्र्याने इतके दिवसांपासून नंदनवनासारखे पवित्र केले होते आज ते घर स्वार्थी नातेवाइकांमुळे विकण्याची वेळ आली होती. जे घर योगी मनोहरांनी आपल्या कष्टांच्या पैशाने बांधले होते ते घर आज केवळ परिस्थितीमुळे त्यांना विकावे लागणार होते. या घरात अनेक आठवणी होत्या, पावित्र्य होते, आध्यात्मिक संस्कार होते, संगीताचे सूर भिनले होते. ज्या घराला योगीजींना भेटायला येणाऱ्या अनेक संतमहात्म्यांचे पाय लागले होते ते स्वर्गाप्रमाणे सुंदर असे घर आज विकण्याची पाळी आली होती. त्या कालावधीतील योगी मनोहरांच्या आणि शालिनीताईच्या दुःखी भावना, ते उदास दिवस, त्या उदास संध्याकाळी आणि त्या त्यांच्या चिंतामय रात्री आजही आठवल्या की मन पिळवटून निघते. योगी मनोहर स्वतः योगीपुरुष होते. त्यामुळे त्यांना हा आघात, हे दुःख पचवणे सोपे होते. कारण ते आता हळूहळू या मायेच्या वर जात होते. परंतु शालिनीताई
एक गृहिणी होत्या, पत्नी होत्या, माता होत्या. त्यांची आध्यात्मिक साधना म्हणजे कुटुंबाची सेवा, आल्यागेल्याची सेवा आणि नित्य नियमित देवपूजा. त्या पांडुरंग भक्त होत्या. हा आघात सहन करण्याची त्यांच्यात शक्ती कुठून आली कोण जाणे. परंतु त्या आपल्या पतीच्या निर्णयात ठामपणे सहभागी होत्या. त्यांना त्रास झाला असेल तरी त्यांनी तसे कधीच दाखविले नाही. पतीला कठीण परिस्थितीत साथ देणे हाच त्यांचा धर्म होता. त्या एक महान योगिनी होत्या.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा