सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - बालगंधर्व
------------------------------------
बालगंधर्व मंडळी पवनीला
------------------------------------
शाळेला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता. दहावी मॅट्रिकच्या पहिल्या तुकडीचा शंभर टक्के निकाल लागला होता. त्यामुळे वैनगंगा विद्यालयाचे नाव सर्वत्र पसरले. मनोहररावांची जबाबदारी आता वाढली होती. शाळेला शासकीय अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु ते अनुदान मिळेपर्यंत शाळेच्या विस्तारासाठी निधी आवश्यक होता. त्या काळात बालगंधर्व नाटक मंडळ अतिशय गाजत होते. सर्वत्र बालगंधर्वांच्या गायनाचे व नाटकांचे प्रयोग होत होते. श्रोते बालगंधर्वांच्या नाटकासाठी वेडे झाले होते. बालगंधर्वांचा आवाज, त्यांची गायकी, नाट्यगीते आणि स्त्री वेषातील त्यांच्या भूमिका या सगळ्या गोष्टींनी श्रोते अतिशय भारावले होते. मनोहरराव स्वतः उत्तम गायक असल्याने गायनाचे वेड त्यांनाही होतेच. वैनगंगा विद्यालयाच्या मदतीसाठी मनोहररावांनी बालगंधर्व नाटक कंपनीची नाटके पवनीला आयोजित करून त्यातून येणारा निधी शाळेला देण्याचे ठरविले.
बालगंधवांचे नाटक म्हटल्यावर पवनी व पवनीच्या आसपासच्या गावातील अनेक मान्यवर श्रोत्यांनी नाटकाला प्रतिसाद दिला. त्या वेळी बालगंधर्वांसोबत नटी मीनाक्षी व गोहर कर्नाटकी यादेखील होत्या. संपूर्ण नाटकमंडळी बालगंधर्वांसह मनोहररावांच्या
घरी (वाड्यात) उतरली होती. शालिनीताईंनी या सर्व कलावंतांची सोय उत्तम केली. बालगंधर्वांनी स्वत: शालिनीताईंची मनापासून तारीफ केली. या नाटकाच्या दिवशीच नटी मीनाक्षी यांचा छोटासा अपघात झाला होता. हात-पाय व चेहऱ्याला मार लागला होता. मजा म्हणून मीनाक्षी बालकमंदिरातील सीसॉवर बसल्या आणि उलटून खाली पडल्या. हात-पाय व तोंड फुटले आणि आता नाटक कसे होणार याची सगळ्यांना चिंता लागली. शालिनीताईनी मात्र नटी मीनाक्षीला दिलासा दिला आणि त्यांच्या जखमांवर हळदीने असा काही इलाज केला की संध्याकाळी नाटकाचे वेळेत मीनाक्षी अगदी स्वस्थ झाल्या आणि नाटकही उत्तम झाले. बालगंधर्वासह सर्व नाटकमंडळींनी शालिनीताईचे आभार मानले. दोन नाटके होती आणि दोन्ही नाटके उत्तम झाली. श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नाटक कंपनीचे मानधन देऊन उरलेला निधी मनोहररावांनी वैनगंगा विद्यालयाला दिला आणि या निधीतून विद्यालयाचे विस्तारकार्य करण्यात आले.
लेखक: डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा