सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - संत ज्ञानेश्वर माउली


----------------------------------------------

संत ज्ञानेश्वर माउलींचा साक्षात्कार

----------------------------------------------

 सर्वकाही सुरळीत सुरू होते. मनोहररावांचे मन पुन्हा अध्यात्माकडे धावू लागले होते. पूर्वी आलेले दिव्य आध्यात्मिक अनुभव पाठीशी होतेच. परंतु मन समाधानी नव्हते. काही चांगल्या अनुभूती अजूनही येतच होत्या. परंतु त्या आध्यात्मिक अनुभूतींचा योग्य आशय सांगून योग्य मार्ग दाखवणारे ज्ञानीपुरुष त्यांना मिळत नव्हते. ते अनेक ठिकाणी गुरूच्या शोधात फिरले. कुणी कुणी आपल्या पध्दतीने काही साधनेचे प्रकार मनोहररावांना करायला सांगितले. परंतु ते केल्याने मनोहररावांना त्रास होऊ लागला. अर्थातच, साधनेचे ते प्रकार चुकीचे होते. योग्य गुरूच्या प्राप्तीसाठी आणि योग्य गुरूच्या मार्गदर्शनासाठी मनोहरावांचे मन तळमळत होते. 

त्याच काळात स्वामी अप्रबुध्दांची त्यांनी भेट घेतली. योगसाधनेचे काही धडे त्यांना स्वामींकडून घेता आले. परंतु अजूनही आध्यात्मिक जीवनातील रितेपण जात नव्हते. 'मोहे लागी लगन गुरु चरनन की' अशी अवस्था मनोहररावांची झाली होती. अध्यात्मात प्रगती होण्यासाठी ज्यांना गुरूची तळमळ लागते त्यांना कुठल्या ना कुठल्या रुपात गुरू बरोबर मिळत असतात. मग ते गुरू मानवरुपातही असू शकतात किंवा परमेश्वरी परमात्मस्वरूपातही मिळू शकतात. संत तुकाराम गुरूंच्या शोधात असताना त्यांना स्वप्नात 'बाबाजी' गुरूंनी गुरुमंत्र दिला होता. शिष्याला जशी योग्य गुरूची आवश्यकता असते तशी गुरूलाही योग् शिष्याची आवश्यकता असते. रामकृष्ण परमहंसांनी तर स्वामी विवेकानंदांसारख्या शिष्याला असेच शोधून स्वतःकडे आकृष्ट केले होते. मनोहररावांना अशीच तळमळ गुरूप्राप्तीसाठी लागली होती. या तळमळीत काही काळ गेल्यावर शेवटी एक दिवस तो क्षण आला ज्या क्षणासाठी मनोहरराव व्याकूळ होते. या क्षणाने त्यांच्या संपूर्ण जीवनाला योग्य कलाटणी मिळून त्यांच्या संपूर्ण जीवनाचेच सोने झाले.

रामनगरच्या घरी एकदा सकाळी ध्यानाला बसले असताना एका दिव्य क्षणी संत ज्ञानेश्वर माउलींचा साक्षात्कार त्यांना झाला!!! क्षणभरच !! त्या दिव्य साक्षात्काराद्वारे माउलींनी त्यांना आळंदीला समाधिस्थळाला दर्शनाला येण्याचे सुचविले. धन्य तो क्षण. साक्षात्काराच्या दिव्य क्षणाने मनोहररावांचे संपूर्ण आयुष्यच दिव्य झाले. सर्वत्र शांत, सुंदर, प्रसन्न वाटू लागले. मनाची तळमळ, तगमग शांत होऊन आंतरिक समाधान प्राप्त झाले. ज्या गुरूच्या शोधात ते व्याकूळ झाले होते ती व्याकूळता शांत झाली होती. साक्षात गुरूच आपणहून भेटल्याचे समाधान मिळाले होते. सगळेच वातावरण कसे धन्य धन्य झाले होते.

दुसऱ्याच दिवशी शालीनीताईंना सांगून मनोहरराव आळंदीला निघाले. आळंदीला माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्याचा यंदाचा त्यांचा अनुभव पूर्णतः भिन्न होता. साक्षात परमेश्वर मिळाल्याचा तो आनंद होता. जीवनाचे सार्थक झाले होते. इथून आता त्यांचा एक नवीन आध्यात्मिक प्रवास सुरू होणार होता. आता खऱ्या अर्थाने ते जगाचे उध्दारक बनून जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवणार होते. खऱ्या अर्थाने आता ते योगी होणार होते. समाधिस्थळाचे दर्शन घेऊन मनोहरराव नागपूरला आले आणि पुन्हा एकदा आध्यात्मिक साधनेत मग्न झाले.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी