सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - दर्शन
---------------------------
गहनीनाथांचे दर्शन
---------------------------
एकदा नागपूरहून पवनीला जाताना मनोहरराव गर्दी आणि गडबडीत एक स्टेशन आधीच उतरले. दुसरी बस नसल्यामुळे त्यांनी ठरवले की आता पवनीपर्यंत पायीच जावे. ते पायी चालत निघाले. निर्जन परिसर होता. रस्ताही बरोबर नव्हता. म्हणून ते रस्ता सोडून जवळच्या पायवाटेने निर्जन रानातून जाऊ लागले. आसपास कुणीही नव्हते. पूर्ण परिसर निर्मनुष्य होता. जोरात तहान लागली होती. परंतु आसपास कुठेही पाणी नव्हते. तहान इतकी लागली होती की चार पावले पुढे जाणे ही अशक्य झाले होते. घशाला कोरड पडली होती. शेवटी मनोहररावांना थांबावे लागले. जीव जातो की काय असे त्यांना वाटू लागले. एवढ्यात त्या निर्जन स्थळी दुरून एक काळी कभिन्न व्यक्ती डोक्यावर मडके घेऊन येताना दिसली. जवळ आल्यावर लक्षात आले की तो पुरुष होता. उघडा, गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेला अगदी काळ्या रंगाचा आणि त्याच्या डोक्यावर पाण्याने भरलेले मडके होते. त्या व्यक्तीने सरळ जवळ येऊन मनोहररावांना पाणी पाजले आणि ती व्यक्ती निघून गेली. थोड्या वेळाने त्या व्यक्तीच्या जाण्याच्या दिशेने मनोहररावांनी बघितले असता तिथे त्यांना कोणीच दिसले नाही. पुढे बऱ्याच काळानंतर मनोहररावांची साधनेत प्रगती झाल्यानंतर पाणी पाजणारी व्यक्ती म्हणजे नवनाथांपैकी गहनीनाथच होते हे त्यांच्या लक्षात आले.
(साधुसंत आणि योग्यांवर जेव्हा कठीन जीवघेणा प्रसंग येतो तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी नवनाथ कुठल्या ना कुठल्या रूपात बरोबर येतात. संत गजानन महाराजांची नाव नर्मदेत एकदा बुडणार होती तेव्हाही नर्मदेच्या रूपात येऊन नवनाथांनीच त्यांना वाचविले होते.)
भगवान शिवशंकराचे दर्शन
याच काळात आणि याच ठिकाणी मनोहररावांना भगवान शिवशंकराचे विलोभनीय दिव्य दर्शन झाले. भगवान शंकराचे दर्शनाचे वर्णन आणि माहिती मनोहररावांच्या शब्दांत येथे देत आहे. भगवान शंकराचे दर्शन होण्याआधी साधक प्रत्येक क्षणी शुभ्रतेचा अनुभव घेत असतो. शिवदर्शनात प्रत्येक गोष्ट शुभ्र वर्णाचीच असते. एक दिव्य सुगंध आणि शंखनाद सर्वत्र पसरलेला असतो. शुभ वर्ण साकारत असता काही वेळाने शुभ्र हिमालय दृश्यमान होतो. दिव्य चक्षूंसमोर हिमालय दिसत असतो. सुंदर शुभ्र हिमशिखरे दिसतात. अशातच काही वेळाने साधकाला त्याच्या मस्तकात वरच्या बाजूला चंद्राचे विलोभनीय दर्शन होते. हा चंद्र पूर्णाकृतीतही दिसतो आणि नंतर चंद्रकोरीच्या रूपातही दिसतो. चंद्राचे असे दर्शन म्हणजे साधकासाठी अतिशय आनंदमयी क्षण असतो. तो चंद्रमा आणि त्याचा शुभ्र प्रकाश संपूर्ण विश्वात पसरून विश्वाला शांत करतो. त्यानंतर अनेक प्रकारचे दिव्य नाद साधकाला ऐकू येतात. या नादांमध्ये घंटानाद आणि शंखनाद प्रामुख्याने असतात. हे नाद ऐकायला आल्यानंतर शिवशंकराचे दर्शन अगदीच जवळ असते. या वेळी साधक शरीरभावाचे वर असून एका स्वर्गीय अवस्थेत असतो. साधकाची ही 'शिव' अवस्था अर्थात, कल्याणकारक अवस्था असते. याच अवस्थेला 'नंद' अथवा 'आनंद' अवस्था म्हणतात. साधकाची हीच अवस्था त्याला भगवान शिवशंकराच्या दर्शनाच्या समीप घेऊन जाते. या आनंदमय अवस्थेत शंख, ओंकार, डमरू इत्यादी अनेक स्वर्गीय नादांनी संपूर्ण विश्व चैतन्यमय आणि आनंदमय होते व याच दिव्य क्षणी भगवान शिवशंकर साथकासमोर प्रकट होतात, परंतु अगदी एकच क्षण! धन्य तो क्षण, धन्य ते शिवदर्शन, धन्य तो साधक !
भगवान शिवशंकर अवस्था ही त्यागमय अवस्था आहे. संपूर्ण मायेचा त्याग करून वैराग्यात नेणारी ही अवस्था आहे. वर्ण, वस्त्र इत्यादी सर्वांचा त्याग करणारी ही अवस्था आहे. संपूर्ण वर्ण बाहेर फेकल्यानंतर शुभ्र वर्ण शिल्लक राहातो. हाच शुभ्र वर्ण भगवान शिवशंकराचा आहे. भगवान शिवशंकरांचा नीलवर्ण नाही. भगवान शिवशंकर सर्व शास्त्रांचे आधार मानले जातात. भगवान शंकरांचे दर्शन झाल्यावर साधक सगळ्या विद्या आणि सगळ्या कलांमध्ये • निपुण होतो. साधक गायक, नर्तक, वादक, चित्रकार, बुध्दिमान, सुंदर आणि सर्वव्यापी बनतो. त्याचे जीवन आता पूर्ण झाल्यामुळे त्याच्या मनात फक्त आनंदमय अवस्था भरली असते. त्याला कशाचाही मोह राहात नाही. तो स्वतःच 'शिव' झाला असतो. शिवाची साधना 'शिव' होण्यासाठीच असते. म्हणून शास्त्रांमध्ये सांगितले आहे. - 'शिवहुत्त्वा, शिवम् यजेत्’
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा