सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - वामविद्येचा अनुभव

 ----------------------------

वामविद्येचा अनुभव (पिशाचविया)

----------------------------

वामविद्येचा अनुभव (पिशाचविया)

१९६७चा काळ असावा. योगी मनोहरांचा आध्यात्मिक प्रवास नेटाने सुरू होता. रोज काहीतरी नवीन दिव्य आध्यात्मिक अनुभव, कधीकधी कुणा महापुरुषाशी भेट अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत होत्या. अशातच एकदा शालिनीताईंच्या मामांच्या ओळखीचा एक गृहस्थ योगी मनोहरांच्या रामनगरच्या घरी आला. त्याचे नाव विश्वनाथ असे होते. तो चंद्रपूरकडचा होता व नागपुरात येऊन त्याने वामविद्येद्वारे चमत्कार दाखवून आपले प्रस्थ जमवले होते. वामविद्या म्हणजे पिशाचविद्या पिशाचांना बंधित करून त्यांचेद्वारे आपले काम करवून घेणारे मांत्रिक हे वामविद्येचे उपासक असतात. विश्वनाथ असाच वामविद्या सिध्द असलेला मांत्रिक होता. शालिनीताईंच्या मामांनी त्याची योगी मनोहरांशी भेट करवून दिली. विश्वनाथला योगी मनोहरांचे एकूणच आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आवडले आणि तो त्यांचा चहाता झाला. हा विश्वनाथ रोज काहीतरी चमत्कार करून दाखवत असे. आम्हीही पाच भावंडे त्याचे ते चमत्कार पाहाण्यात रमू लागलो. हा विश्वनाथ कधीकधी आपला गमछा झटकल्यासारखा करून त्यातून चॉकलेटचा डबा काढत असे. कधी ताटावर टॉवेल झाकत असे व तो टॉवेल उचलल्यावर ताटात स्वादिष्ट मिठाई दिसत असे. कधी आंब्याचा आंबट रस आपल्या जादूने अतिशय गोड करत असे. कधीकधी हाताची मूठ बंद करून उघडत असे तर त्यात चॉकलेट अथवा विभूती अथवा कुंकू असे. त्याच्या त्या चमत्कारांतून खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू आम्हाला मिळत असल्यामुळे आम्ही सर्व भावंडे अतिशय खूश होतो. योगी मनोहर हे विज्ञानाचे विद्यार्थी असल्यामुळे या विद्येतील नेमके विज्ञान जाणण्याची त्यांना उत्कंठा होती. त्यांनी विश्वनाथला ही विद्या शिकविण्याची विनंती केली. परंतु विश्वनाथने या गोष्टीस नकार दिला. त्याने सांगितले, “मनोहरराव, तुम्ही आध्यात्मिक पुरुष आहात. ही पिशाचविद्या आहे. ही विद्या तुम्ही शिकू नये. परंतु योगी मनोहरांना त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांना या विद्येचे रहस्य व विज्ञान जाणून घ्यायचे होते. एकदा तर विश्वनाथने कमाल केली. योगी मनोहरांसोबत तो एका मिठाईच्या हॉटेलात गप्पा करत बसला असता ज्या टेबलावर ते बसले होते त्याच्या खाली हात घालून जादूने भरभरून मिठाई काढणे सुरू केले. तो टेबलच्या खाली रिकामा हात नेत असे आणि हात वर आणल्यावर मात्र मूठभर मिठाई भरली असे. अशी बरीच मिठाई काढल्यानंतर शेवटी योगी मनोहरांनी त्याला तसे करण्यास थांबविले. नंतर दोघेही हॉटेलमधून जाण्यास निघाले असता त्यांना काउंटरवर काहीतरी गडबड असल्याचे दिसले. विचारले असता हॉटेलमालकाने सांगितले की काचेच्या शोकेसमध्ये ठेवलेली मिठाई अचानक गायब झाली होती. हॉटेलमालक व त्याचे नोकर कुणालाच काही कळेनासे झाले होते. योगी मनोहरांनी जे ओळखायचे ते ओळखले. विश्वनाथने पिशाचविधेद्वारे जी मिठाई जादूने काढली होती ती त्याच हॉटेलमधील होती. मांत्रिक पिशाचांना वश करून त्यांचेकडून अशा वस्तू काढत असतात. पिशाचे या चतुर मात्रात्मक जगताच्या वर असल्यामुळे त्यांना काळवेळ नसतो किंवा शरीरही नसते. ते अदृश्य असतात. ते मांत्रिकाद्वारे वश झाल्यानंतर ज्या वस्तूला स्पर्श करतील ती वस्तू अदृश्य होत असते. मांत्रिकाजवळ ती पिशाचे आणून ठेवतात तेव्हा ती पुन्हा दृश्यमान होते. वस्तू व्यक्तातून अव्यक्त आणि अव्यक्तातून पुन्हा व्यक्त होण्याची शृंखला काय असते हे जाणून घ्यायची योगी मनोहरांना उत्कंठा होती. परंतु ते या विधेपासून दूरच राहिले. पुढे बऱ्याच वर्षांनंतर योगी मनोहर आपल्या काही साधकांमध्ये या विद्येचा खुलासा करताना मी ऐकले.

योगी मनोहरांनी सांगितले की, पिशाचविद्या ही अशी विद्या आहे की ज्यामधे मांत्रिक पिशाचाला वश करून त्यांचेकडून बरीच कार्ये करत असतात. यात वस्तू गायब करणे, भानामती, पीडा लावणे, जारणमारण करणे, मूठ मारणे हे सगळे प्रकार येतात. पिशाचे ही शरीर नसल्यामुळे सर्वत्र मुक्त संचार करत असतात. परंतु इच्छा अपुऱ्या राहिल्यामुळे भौतिक शरीराचा मृत्यू झाल्यानंतर पिशाचयोनीत अनंत काळ राहातात. पुढे केव्हातरी कुठल्या सत्पुरुषाच्या कृपेने मुक्त होतात. परंतू त्यांच्या या पिशाच अवस्थेत मात्र त्यांना वश करून एखादा मांत्रिक त्यांच्याकडून अशी निकृष्ट कामे करत असेल तर ती पिशाचे त्या मांत्रिकाला त्याच्या मृत्यूनंतर पिशाच योनीत घेऊन जातात. म्हणून पिशाचविद्येच्या मागे कुणी लागू नये.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी