सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - विवाह

 

-------------------------------------

विवाह (इ.स. १९४९-५०)

--------------------------------------

उपगडेंच्या मुलीचे स्थळ मनोहररावांना सांगून आले आणि लागलीच मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलीचे घरचे नाव 'छबू' होते. मुलीला वडील नव्हते त्यामुळे ती तिच्या मामांकडे, श्री. लक्ष्मणराव कुर्थेकडेच लहानाची मोठी झाली होती. मुलगी घरकामामध्ये व अनेक कलाकुसरीच्या कामांमध्ये कुशल होती. अतिशय साध्या स्वभावाची आणि सात्विक वृत्तीची होती. मनोहररावांना हवे असलेले सर्व गुण छबूमध्ये होते. त्यामुळे मुलीला बघण्याच्या कार्यक्रमात मनोहररावांनी स्वतः तर्फे काही अटी ठेवल्या नाहीत. फक्त मुलीला सांगितले की, आई आजारी असल्यामुळे आईची सेवा तिला करावी लागेल. मुलीने (छबूने) या गोष्टीस आनंदाने होकार दिला. लगेच साक्षगंध, साखरपुडा पार पडला. भरपूर लोकांच्या उपस्थितीत लग्नही थाटात झाले. लग्नात मनोहररावांच्या नात्यातले, ओळखीतले असे हजार-दीड हजार लोक उपस्थित होते. तो अंदाजे १९५० चा काळ होता. मुलीच्या आईने विधवा असूनही लग्नात कुठल्याही गोष्टीला काही कमी पडू दिले नाही. छबू लहानपणापासूनच परस्वाधीन व कष्टमय जीवन जगली होती. वडील नव्हते आणि मामांच्या घरी त्यांच्या शिस्तीपुढे तोंडातून शब्द काढणेही कठीण होते. अशाही परिस्थितीत छबू मॅट्रिक चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाली होती. मनोहरराव हरकरेंशी छबूचे लग्न झाले आणि तिचे सासरचे नाव 'शालिनी' ठेवण्यात आले. पूर्वीची छबू आता लग्नानंतर 'सौ. शालिनी हरकरे' झाली. लग्न होऊन महाल येथील हरकरेंच्या घरी शालिनीताई हरकरे आल्या, आणि त्यांच्या नवीन जीवनाला प्रारंभ झाला. सासूची पूर्ण सेवा करायची हे मनोहररावांनी त्यांना आधीच सांगितले होते. ठरल्याप्रमाणे हरकरे वाड्यामधल्या २०-२५ लोकांच्या कुटुंबामध्ये रममाण होऊन शालिनीताई आजारी सासूच्या (राधाबाईंच्या) सेवेमध्ये लागल्या. मनोहररावांचा आणि शालिनीताईंचा विवाह ही नियतीची रचना होती. यातूनच पुढे एक मोठा आध्यात्मिक इतिहास घडणार होता. नियतीने मनोहरराव व शालिनीताई या दोन महान पुण्यात्म्यांना एकत्र आणणे म्हणजे एक महान योगायोग होता. हा योगायोग समजण्यासाठी शालिनीताईंचे पूर्वायुष्य बघणे आवश्यक ठरेल.

-----------------------------------------------------

शालिनीताई हरकरे यांचे कष्टिक पूर्वायुष्य

-----------------------------------------------------

मनोहररावांच्या पत्नी सौ. शालिनीताई हरकरे यांचे एकूणच आयुष्य बघितल्यानंतर, त्या खऱ्या अर्थानि संपूर्ण आयुष्य एका सतीचे आयुष्य जगल्या याचा प्रत्यय येतो. त्यांचे लग्नाच्या आधीचे आयुष्य म्हणजे वडील नसल्यामुळे संपूर्ण परस्वाधीन आयुष्य आणि लग्नानंतरचे आयुष्य म्हणजे मनोहररावांसारख्या महान आध्यात्मिक पुरुषाबरोबरचे आयुष्य, जिथे फक्त त्यागच त्याग होता. परंतु देवाने दिलेले असे संपूर्ण आयुष्य शालिनीताई कधीही कुठलीही तक्रार न करता आनंदाने व समाधानाने जगल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक महान तप होते.

शालिनीताईंचा जन्म मध्यप्रदेशातील रंगारी या गावी १० मार्च १९१८ मध्ये झाला. फाल्गुन महिन्यातील वसंतपंचमीचा तो दिवस होता. त्यांचे आईवडिलांचा बालविवाह झाला होता. वयात आल्यावर काही वर्षांनी या जोडप्याला पहिले अपत्य झाले आणि बाराव्या दिवशी बारसे होऊन नामकरण झाल्यावर काही दिवसांतच गेले. दुसऱ्याही अपत्याच्या बाबतीत हेच झाले आणि दुसरेही अपत्य गेले. तिसऱ्या वेळेस मात्र या जोडप्याने नवीन अपत्याचे बारसेही केले नाही आणि नामकरणही केले नाही. या जोडप्याचे तिसरे अपत्य म्हणजे छबू. या कन्यारत्नाचे बारसेही केले नव्हते आणि नामकरणही केले नव्हते. मग आता कन्येला कुठल्या नावाने बोलवायचे म्हणून तिचे घरगुती प्रेमाचे व लाडाचे असे छबी हे नाव पडले. छबी हळूहळू मोठी होऊ लागली आणि सर्व तिला छबू म्हणू लागले. ही छबू आता आईवडिलांची एकुलती एक कन्या होती. छबूचे वडील देखणे होते तर आईचे रूप साधारण होते. वडील अतिशय श्रीमंत होते. ते मालगुजारी करत आणि त्यांचेजवळ भरपूर धन, संपत्ती, शेतीवाडी असल्यामुळे घरी कशाचीही कमतरता नव्हती. आईवडिलांच्या छत्रात अतिशय श्रीमंतीत छबू लहानाची मोठी होऊ लागली. वडिल अतिशय आध्यात्मिक होते. त्यामुळे अधेमधे तीर्थक्षेत्री ते छबूला व आईला घेऊन जात असत.

उपगडे कुटुंब असेच एकदा रामेश्वरला गेले असता एक विचित्र घटना घडली. तीर्थक्षेत्री स्नान करायचे म्हणून उबूच्या आईने आपले सर्व सोन्याचे अलंकार एका गाठोडीत बांधून सुरक्षितरीत्या किनाऱ्यावर ठेवले आणि स्नानासाठी त्या छबू व पतीसह पाण्यात उतरल्या. विशेष म्हणजे छबूच्या वडिलांनी बरीच किंमत मोजून राहून खरेदी केलेली काही किलो वजनाची सोन्याची वीट त्याच दागिन्यांसह गाठोडीत ठेवली होती. गाठोडी अगदी नजरेसमोर ठेवूनच हे दांपत्य पाण्यात उतरले. परंतु कसा कोणास ठाऊक, चोराने बरोबर डाव साधून दागिन्यांचे संपूर्ण गाठोडे त्यातील सोन्याच्या विटेसह पळवून नेले. स्नान आटोपून उपगडे दांपत्य किनाऱ्यावर येऊन पाहातात तो काय, संपूर्ण सोने चोरी गेलेले! छबू व आई रडू लागल्या. वडिलांनी मोठ्या धैर्याने छबूला व आईला सांभाळून सांगितले की, “ज्याच्या नशिबात ते सोने होते तो ते घेऊन गेला." वडिलांनी त्या सोन्यात बरीच पुंजी लावली होती. त्यामुळे त्यांच्यासाठीही तसा हा मोठाच धक्का होता. परंतु त्यांनी वरवर तसे काहीही भासू दिले नाही. रामेश्वरहून घरी परतल्यावर मात्र छबूच्या वडिलांनी जी खाट धरली ती कायमचीच. छबूचे वय तेव्हा आठ वर्षाचे होते. वडिलांची तब्येत हळूहळू खालावतच गेली आणि अशातच एक दिवस त्यांची प्राणज्योत मालवली. छबूवर आणि आईवर दुःखाचा पहाड कोसळला.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी