सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - माजलेल्या गुंडाला घडा

 अन्यायाला आणि गुंडगिरीला मनोहररावांचे चोख उत्तर

पवनीला वैनगंगा विद्यालयाची स्थापना व मनोहररावांची पवनीतील लोकप्रियता याची बातमी मनोहररावांच्या नागपुरातील भावंडांनासुध्दा मिळाली. हे कौतुक बघण्यासाठी हरकरे भावंडे पवनीला आली. यात मनोहररावांचे मोठे भाऊ भैयाजी हरकरे हे सुध्दा होते. भैयाजी हरकरे हे विनोबा भावेचे अनुयायी होते आणि शांतताप्रिय होते. पवनीला आले असता भैयाजी हरकरे हे एका मंदिरात जायला निघाले. मंदिरात जाण्यासाठी गंगेचा एक छोटासा पूल चालून जावा लागे. हा पूल कोणी बांधला होता याची कुणाला कल्पना नव्हती. परंतु त्या पुलावर एका दादाचे साम्राज्य होते. त्या पुलावरून जाण्यासाठी या दादाला प्रत्येकाला कर द्यावा लागे. उंच धिप्पाड शरीरयष्टीमुळे हा दादा सर्वांना धाक दाखवून पुलावरून जाण्यासाठी प्रत्येकाकडून कर घेत असे. या दादाने पवनीत दादागिरी व गुंडगिरी सुरू केली होती. सर्व त्याला भीत असत.

भैयाजी हरकरे या पुलावरून जायला निघाले असता या गुंडाने

भैयाजींना हटकले आणि त्यांना पैसे मागितले. भैयाजींनी देण्यास नकार दिल्यामुळे या गुंडाने भैयाजींना आईबहिणीच्या शिव्या देऊन तेथून धक्का मारून घालविले. भैयाजींनी झालेला प्रकार घरी येऊन शांतपणे मनोहररावांना सांगितला. मनोहररावांना आपल्या मोठ्या भावाचा अशा प्रकारे झालेला अपमान सहन झाला नाही. मनोहरराव जरी आध्यात्मिक, योगप्रेमी होते तरी अन्यायाविरुध्द त्यांच्या मनात चीड होती. इतर वेळी शांत राहाणारे मनोहरराव कुणावर अन्याय होताना बघू शकत नसत. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी ते नेहमी सज्ज असत. या बाबतीत ते साक्षात 'कृष्ण' होते. त्यांचे जीवनात त्यांना जिथे-जिथे अन्याय दिसला तिथे त्यांनी अक्षरशः त्या अन्यायाला ठेचून काढले. भैयाजींवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी मनोहरराव ताबडतोब पुलाकडे निघाले. पुलाजवळ जाऊन पाहातो ते काय, एक उद्दाम

माजलेला गुंड प्रत्येकावर दादागिरी करून पैसे वसूल करत होता. मनोहररावांना हे सहन झाले नाही. मनोहररावांनी आखाडा पिसला होता, भरपूर व्यायाम करून शरीर कमावले होते. आखाड्यात असताना कुस्तीचे डावपेच आणि शत्रूला लोळवायचे कसे हे त्यांना चांगल्या पध्दतीने माहीत होते. मनोहरावांनी त्या गुंडाला खेचून त्याच्या जोरात कानफटीत लगावली. गुंड मनोहररावांपुढे उंच धिप्पाड होता आणि ताकदवान होता. तोही मनोहररावांना मारण्याच्या पवित्र्यात पुढे आला. दोघांमध्ये झटापट सुरु झाली. गुंडाने सुरा काढला आणि मनोहररावांना मारणार इतक्यात मनोहररावांनी त्याला पाय अडकवून खाली पाडले आणि गुद्दाप्रहार करू लागले. दोघांमध्ये बराच वेळ झटापट झाली. गुंडाने पुन्हा सुरा मारण्याचा प्रयत्न केला आणि या वेळी मात्र मनोहररावांनी गुंडाचा सुरा पकडलेला पंजा आवळून धरला. गुंड वेदनेने विव्हळू लागला. मनोहररावांनी त्याचे थोबाडात हाणून त्याला बजावले की पुन्हा त्याने पुलाजवळ फिरकू नये. या संपूर्ण झटापटीत मात्र त्याचा सुरा मनोहररावांच्या मांडीत लागला आणि मांडी फाटून त्यातून भळभळ रक्त वाहिले. घरी आल्यावर मनोहररावांची रक्तबंबाळ मांडी पाहिल्यावर शालिनीताईंना काय झाले असावे याचा अंदाज आला आणि त्यांनी लगेच त्या जखमेवर हळद लावून पट्टी बांधली. घाव मोठा असल्यामुळे तो भरायला बरेच दिवस लागले.

पुढे या लढाईवर कोर्टात केस झाली आणि त्यात मनोहररावांच्या बाजूने निकाल लागला. गुंडाला शिक्षा झाली. पुढे हा दादा गाव सोडून गेला. जाताना मात्र त्याने स्वतः मनोहररावांची भेट घेतली आणि त्याच्या जीवनात मनोहररावांसारखा सच्चा मर्द प्रथमच पाहिल्याचे त्याने कबूल केले.

योगी मनोहरांची या गुंडाशी लढाई आणि शिवाजी महाराजांची अफजलखानशी लढाई या दोन घटनांमध्ये बरेच साम्य आढळून येते. दोन्ही लढायांमध्ये शत्रू उंच, धिप्पाड व उद्दाम होता. दोन्ही लढाया सत्यासाठी आणि तत्त्वांसाठी होत्या. शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र घडवला. योगी मनोहरांनी आपल्या आध्यात्मिक ताकदीने संपूर्ण विश्वालाच ज्ञानाचा आणि सत्याचा संदेश दिला. *जगाच्या उध्दारासाठी परमेश्वराने ज्यांची नियुक्ती केली आहे. ते कुठल्याही रूपाने येऊन आपले जगदुध्दाराचे कार्य करून जातात. कधी ते राजा असतात, कधी योगी असतात, कधी संत असतात, कधी भक्त असतात, कधी राम असतात, कधी मत्स्य असतात, कधी कासव असतात तर कधी योगीपुरुष असतात. ध्येय सगळयांचे एकच असते. जगाला ज्ञानाचा व सत्याचा मार्ग दाखवून जगाचा उध्दार करणे. या त्यांच्या जगदुध्दाराच्या कार्यात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले तरी त्यांचे कार्य ते

अविरत सुरू ठेवतात. इह जीवनातले आपले जगदुध्दाराचे कार्य पूर्ण करतात आणि कार्य आटोपल्यावर इहलोक सोडून परमात्म

तत्त्वात विलीन होतात. योगी मनोहरांचा जन्मही याच कार्यासाठी झाला होता. त्यांचे जीवन म्हणजे एक अवतार कार्य होते. त्यांनी लिहून ठेवलेले गीता, रामायण, महाभारत, कुंडलिनी, जन्म-मृत्यू विज्ञान, संगीत ते समाधी, दिव्यानुभूती, सणांचे रहस्य इत्यादी अनेक ग्रंथ म्हणजे या संसाराला मिळालेली अनमोल देण आहे. अशा महान योग्याचे चरित्र लिखाणाचे काम करताना वारंवार धन्यता वाटते.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी