सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - पवनी
--------------------------------------------
पवनी' या तपस्याभूमीत आगमन
--------------------------------------------
आईच्या निधनानंतर मनोहररावांचे नागपुरात मन लागेनासे झाले. नागपूरच्या जवळ भंडारा जिल्ह्यातील पवनी हे स्व. राधाबाईंचे माहेरगाव होते. पवनीला स्व. राधाबाईच्या माहेरची ३०० एकर जमीन होती. परंतु नंतर ती जमीन कोणी बळकावली याचा काही सुगावा लागला नाही. तरीसुध्दा पवनी हे आईचे माहेरगाव असल्यामुळे आणि पवनीची जमीन ही आध्यात्मिक पुरुषांच्या वास्तव्याने पावन झाली असल्यामुळे मनोहररावांना पवनीचे आकर्षण सुरुवातीपासूनच होते. म्हणूनच मनोहररावांनी पवनीला जायचे ठरवले. शालिनीताईंना घेऊन मनोहरराव पवनीला आले.
पवनी अतिशय सुंदर ठिकाण होते. येथे वासुदेवानंद सरस्वतींनी काही काळ साधना केली होती. अनेक संतमहात्म्यांनी पवनीला वास्तव्य केले होते. गावाच्या काठाला वैनगंगा नदीचे मोठे पात्र होते. जमीन सुपीक होती. पवनी हा प्राचीन मंदिरांचा परिसर होता. ही गंधर्व नगरी होती. पवनीला आल्यावर मनोहररावांना आणि शालिनीताईंना अतिशय शांत वाटले. इथे आल्यावर मनोहररावांनी एक लहानसे एका खोलीचे घर किरायाने घेतले. घरातच नागोबाचे मंदिरही होते. मनोहरराव आणि शालिनीताईंचा छोटासा संसार अशा तऱ्हेने पवनीला सुरू झाला.
पवनी ही तपस्याभूमी होती. वैनगंगेच्या काठावर अनेक महात्म्यांनी तपस्या केली होती. मनोहररावांचा आध्यात्मिक पिंड असल्यामुळे येथे आल्यावर त्यांनी अध्यात्मसाधना सुरु करायचे ठरविले. अनायास याच काळात त्यांना पवनी येथील नगरपालिकेने विज्ञान शिक्षक पदासाठी नगरपालिकेच्या शाळेत शिकविण्यास बोलाविले. मनोहररावांना शिक्षकी उत्तम अवगत होती. शिवाय ते उच्च विद्याविभूषित होते. ते बीएस्सी, बीए, बीटी, एमए, बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स अशा अनेक पदव्यांनी विभूषित होते. शिवाय, ते उत्तम गायक व चित्रकारही होते. पवनीचे रहिवासी मनोहररावांच्या व्यक्तित्वाकडे त्यांच्यातील या सर्व गुणांमुळे आकर्षित झाले होते. आपल्या प्रेमळ वागण्याने मनोहरराव आणि शालिनीताईंनी सर्व पवनीवासीयांची मने जिंकून घेतली.
पवनी येथील नगरपालिका हायस्कूलमध्ये मनोहरराव विज्ञान शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या शिकवण्याच्या चांगल्या पध्दतीमुळे विद्यार्थी त्यांच्या शिकवण्यात रमू लागले. विद्यार्थ्यांचे ते आवडते शिक्षक बनले. काही लोकांना मनोहररावांची ही लोकप्रियता खटकली आणि त्यांनी मनोहररावांच्या कामात अडथळे आणणे सुरू केले. राजकारणापासून मनोहरराव नेहमीच दूर राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा तेथील राजकारणाचा वीट येऊन त्यांनी ती नोकरी सोडण्याचे ठरविले आणि तिथला राजीनामा दिला. ते लोकप्रिय शिक्षक असल्याने नगरपालिका प्रमुखांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. परंतु मनोहररावांची आता येथील गढूळ वातावरणात काम करण्याची इच्छा नव्हती. ती नोकरी सोडून एक नवीन आदर्श अशी शाळा निर्माण करावी असे त्यांनी ठरविले. एव्हाना वैनगंगा किनाऱ्यावर त्यांच्या आध्यात्मिक साधनेला सुरुवात झाली होती.
--------------------------------------
वैनगंगा विद्यालयाची स्थापना
--------------------------------------
मनोहररावांची शिकवण्याची पध्दत पाहून अनेक मोठे लोक त्यांचेवर खूश होते. पवनीच्या काही ख्यातनाम नागरिकांनी एकत्र येऊन नवीन शाळा काढण्याचे ठरविले आणि या शाळेची पूर्ण जबाबदारी मनोहररावांवर सोपविण्याचे ठरविले. विद्यालय निर्माण समिती बनवली गेली. या समितीचे कार्यवाहक पद मनोहररावांना सोपविण्यात आले. शाळेचे नावही ठरले 'वैनगंगा विद्यालय' वैनगंगा विद्यालयाच्या स्थापनेसाठी धनाची आवश्यकता असल्याने मनोहररावांनी त्यांचे नावावर असलेली ७ एकर जमीन विकली. त्यातून जे धन मिळाले त्यातून वैनगंगा विद्यालयाची १९५२ साली स्थापना करण्यात आली. शाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी विषयांसह इतर सर्व विषयांचे शिक्षण देण्यात येऊ लागले. शाळेच्या निर्मितीसाठी मनोहररावांनी आपली शेती विकली आणि स्वतःचे घर चालवण्यासाठी मात्र डाळ, पोहा, मुरमुरे इत्यादी वस्तू विकून त्यातून मिळणाऱ्या अल्पशा धनावर ते स्वतःचे कुटुंब चालवू लागले. शाळेतून जो थोडासा पगार त्यांचे नावावर निघे तो ते शाळेच्याच कामाला देत असत. इतर शिक्षकांना मात्र ते नियमित पगार देत असत.
मनोहररावांचा हा त्याग फुकट गेला नाही. शाळेचा निकाल शंभर टक्के लागू लागला. काही दिवसांतच शाळेला शासनाची मान्यता मिळाली. आता शाळेतील आर्थिक अडचण थोडी दूर झाली. शिक्षकांनाही बऱ्यापैकी पगार मिळू लागले. मनोहररावांच्या नावावर जेव्हा पगार निघे त्यातील फक्त साठ रुपये ते घरखर्चासाठी घेत व बाकी पगार शाळेतच जमा ठेवत. शालिनीताईंना त्यांनी घराच्या किरायासकट संपूर्ण खर्च फक्त साठ रुपयांत करण्यास सांगितले. शालिनीताईंनीही कुठलीच तक्रार न करता अवघ्या साठ रुपये महिन्यात आनंदाने घर चालविले. मनोहररावांच्या व्यवस्थापनात त्यांच्या देखरेखीत शाळेचा व्यवहार चोखपणे चालू लागला होता. संघाचे संस्कार मनोहररावांवर झाले होते. गुरुजी गोळवलकर आणि महात्मा गांधी या दोन्ही महात्म्यांचे संस्कार मनोहररावांवर झाले होते. त्यामुळे वैनगंगा विद्यालयाचा संपूर्ण व्यवहार, सर्व कारभार अतिशय स्वच्छ होता. शाळा कशी चालवावी याचा उत्कृष्ट आदर्श मनोहररावांनी निर्माण केला.
----------------------------------------------------
वैनगंगा किनारी कडक तपस्येला सुरुवात
----------------------------------------------------
पवनीच्या वास्तव्यातच मनोहररावांची आध्यात्मिकसाधना खऱ्या अर्थानि सुरू झाली. वैनगंगेचा किनारा घराच्या अगदी जवळच होता. किनाऱ्यावरच शिवाची एक सुंदर पिंड होती. मनोहरराव रोज पहाटे तीन वाजता उठून या शिवाच्या पिंडीजवळ येत आणि तिथे खोल ध्यान लावत असत. हा संपूर्ण परिसर रात्री तीन वाजता अगदी एकाकी वाटे. परंतु मनोहररावांनी कुठलीही भीती न बाळगता आपली नियमित साधना सुरु ठेवली. साधना झाल्यावर, उजाडल्यावर ते घरी परतत आणि घरची कामे करून नंतर शाळेत जात असत.
शालिनीताईसुध्दा सकाळी उठल्याबरोबर वैनगंगेच्या किनारी कळशी घेऊन जात असत व घरासाठी पाणी आणत असत. घरी विहीरही नव्हती आणि नळही नव्हता. त्यामुळे शालिनीताईंना घरासाठी पाणी वैनगंगेवरूनच कळशी-कळशीने आणावे लागे. परंतु हे सर्व शालिनीताईंनी कुठलीही तक्रार न करता आनंदाने केले. पाणी भरून आल्यावर सडासंमार्जन व नंतर स्वयंपाक करून जेवण तयार करणे अशी शालिनीताईंची दिनचर्या असे. अशातच एक दिवस लक्षात आले की शालिनीताई गर्भवती आहेत. घरी आनंदीआनंद झाला. गर्भवती असूनसुध्दा शालिनीताईंचे गंगेवरून पाणी भरणे रोज नियमितपणे सुरू होते. शालिनीताईंचे संपूर्ण आयुष्यच कष्टमय होते. कष्टांचा त्यांनी कधी बाऊ केला नाही.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा