सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - पवनीवरून नागपूरला

-----------------------------------------------------------

पवनीवरून नागपूरला आगमन

-----------------------------------------------------------

पवनीला अशा प्रकारे मनोहररावांचे आणि शालिनीताईंचे संसारी जीवन सुखात सुरू होते. गीतेमध्ये सांगितले आहे की, जेव्हा-जेव्हा जगाला ज्ञानी पुरुषांची गरज भासते, तेव्हा- तेव्हा ते ज्ञानीपुरुष पृथ्वीवर अवतरतात आणि जगाला योग्य मार्ग दाखवतात. योगी मनोहरांचा जन्म म्हणजे याच कार्यासाठी झालेला पुण्यावतार होता. त्यामुळे केवळ संसारात रमणे आणि केवळ संसारसुखापुरते आपले जीवन मर्यादित ठेवणे हे योगी मनोहरांच्या प्रारब्धात नव्हते. त्यांचे जीवन जगाच्या कल्याणासाठी होते. ज्या महान विभूतींचे जीवन जगाच्या कल्याणासाठी असते, नियती त्यांना बरोबर त्या मार्गाकडे नेत असते. जीवनात एखादी कलाटणी मिळते, काही बदल होतात आणि अशा व्यक्ती आपणहून त्यांच्या ध्येयाकडे वळतात. योगी मनोहरांच्या पवनीच्या वास्तव्यानंतर जे काही बदल त्यांच्या जीवनात होत गेले ते त्यांना त्यांच्या हातून पुढे होणाऱ्या विशाल आध्यात्मिक कार्याच्या मार्गावर नेणारेच होते.

मनोहररावांचा स्वभाव सर्वांना मदत करण्याचा होता. ते घरच्यांना बाहेरच्यांना नेहमी अडी-अडचणीत मदत करत असत. त्यांच्या सगळ्या भावंडांवर त्यांनी मनापासून प्रेम केले. त्यांच्या पुढच्या जीवनात तर त्यांनी आपल्या भावंडांना पैसाअडका इत्यादी सगळी मदत केली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या धाकट्या बहिणीला त्यांनी एक पूर्ण घर एकही पैसा न घेता फुकट दिले. पुढे मात्र योगी मनोहरांना जेव्हा भयानक आर्थिक अडचण आली तेव्हा ज्यांच्यावर त्यांनी उपकार केले होते त्यांपैकी कुणीही भावंडे मदतीला आली नाहीत. मनोहरराव पवनीच्या वैनगंगा विद्यालयात असताना अधेमधे आपल्या भावंडांनाही तेथे राहाण्यास बोलवत असत. त्यांचा खाण्यापिण्याचा व येण्याजाण्याचा खर्च स्वतः मनोहररायच करत असत. भावंडांविषयी प्रेम हेच या गोष्टीस कारणीभूत होते. 

बरेच दिवस पवनीत राहिल्यानंतर मनोहररावांनी नागपूरला परतण्याचा निर्णय घेतला. पवनीच्या वैनगंगा विद्यालयात राजीनामा देऊन मनोहरराव पत्नी शालिनीताई आणि तीन अपत्ये (लता, मुक्ता व त्र्यंबक) यांसह नागपूरला परतले. शालिनीताईंनी मनोहररावांना त्यांच्या या निर्णयात कुठलीही तक्रार न करता पूर्ण साथ दिली. नागपूरला परतल्यावर मनोहरांनी काही दिवस भाड्याच्या घरात काढले. नंतर कर्ज काढून त्यांनी रामनगर येथे प्लॉट घेऊन त्यावर घर बांधले. याच घरात त्यांनी आपल्या सासूला व शालिनीताईच्या मामांनासुध्दा राहायला जागा दिली. पुन्हा नोकरी-व्यवसायाच्या शोधात ते लागले. एका कॉलेजच्या प्राचार्यपदी त्यांनी काही दिवस काम केले. परंतु इथेही त्यांना समाधान व शांती मिळाली नाही. काही दिवस त्यांनी फटाक्यांचा व्यवसाय करून बघितला. परंतु फटाके विकण्याऐवजी आप्तांना वाटण्यातच संपले. नफा तर नाहीच, तोटाच तोटा. यानंतर काही दिवस ट्रॅक्टरचा व्यवसायही त्यांनी करून पाहिला. परंतु असे व्यवसाय करण्यात फक्त नफ्याचाच विचार करणारी व्यापारी वृत्ती असावी लागते जी मनोहररावांजवळ नव्हती. कारण ते आध्यात्मिक पुरुष होते. आध्यात्मिक पुरुष आणि व्यापार हे समीकरण कधीही जमणारे नाही. तुकारामादी संत याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. मनोहररावांना व्यापारातही ठायीठायी फसवणारे लोक भेटले. व्यापार करताना कधीकधी खोटेपणाही करावा लागतो जो मनोहररावांनी कधीच केला नाही. त्यामुळे ट्रॅक्टरचा हा व्यापारही बंद पडला.ंं

शेतीचा व्यवसाय करून पाहिला. परंतु एक-दोनवेळा ज्या गड्याला शेती वाहण्यासाठी दिली त्या गड्यानेच ती शेती बळकावली. एकदा तर मनोहररावांनी स्वतः घेतलेली शेती आपल्या पुतण्याला फुकट देऊन टाकली. कर्ज काढून एक-दोन ठिकाणी त्यांनी प्लॉट घेतले होते तेही दोन धाकट्या बहिणींना फुकटात देऊन टाकले. शेवटी मनोहररावांनी घर थोडे मोठे करून भाडेकरी ठेवले. येणाऱ्या भाड्याच्या पैशांवर पर बऱ्यापैकी चालू लागले. *रामनगरचे घर बांधल्यावर मनोहरराव व शालिनीताईंना आणखी दोन अपत्ये झाली. चौथे अपत्य म्हणजे मुलगी वनिता आणि तिच्यानंतर पाचव्या अपत्याचा जन्म झाला ज्याचे नाव दत्तात्रय ठेवण्यात आले. हा दत्तात्रयाचा जन्म म्हणजेच माझा जन्म. माझ्या जन्मानंतर शालिनीताईंना म्हणजे माझ्या आईला अपत्ये झाली नाहीत. अर्थात, मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझे भरपूर लाड केले. अशा पध्दतीने आमचे आता सात जणांचे कुटुंब झाले. आम्ही पाच भावंडे (लता, मुक्ता, त्र्यंबक, वनिता, दत्तात्रय) आणि आमचे आईवडील (मनोहरराव व शालिनीताई). सर्व सुरळीत सुरू होते. आता मनोहररावांचे मन पुन्हा अध्यात्माकडे वळू लागले. आमचे घरी आध्यात्मिक लोकांचे येणे सुरू झाले. आमची आई शालिनीताई साक्षात अन्नपूर्णा होती. आल्यागेल्याचे ती खाणेपिणे करत असे. आमच्या सर्व आत्या आमच्याकडे नेहमी माहेर म्हणूनच यायच्या. आमच्या

बाकी काकांकडे त्यांना माहेरपणा जाणवत नसे. आमच्याकडे मात्र आमच्या आईच्या प्रेमळ स्वभावामुळे आत्यांना माहेरी आल्यासारखे वाटे. त्या आमच्याकडे आल्यावर आमची आई त्यांना माहेरवाशिणीचेच प्रेम देत असे. त्यांना कामंही करू देत नसे. त्यांनाही आमच्या आईच्या हातचा स्वयंपाक अतिशय आवडत असे. आमची आई शालिनीताई अतिशय कष्टाळू होती. तिला आम्ही रिकामे बसलेले कधी पाहिले नाही. दिवसभर कष्ट आणि फक्त दोन वेळचे जेवणाव्यतिरिक्त ती अधेमधे काहीही खात नसे. आल्यागेल्याला मात्र आग्रह करून खाऊ घालत असे. आमचे हे घर मोठे असल्याने सगळे नातेवाईक आमचेकडे येऊन राहात असत आणि तृप्त होत असत.

-डाॅ. दत्ताजी हरकरे.


-डाॅ. दत्ताजी हरकरे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी