सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - हनुमान दर्शन

 

---------------------

हनुमान दर्शन

---------------------

बहुतांशी देवतांची दर्शने मनोहरावांना पवनी येथेच झाली. एक दिवस ते सकाळी पवनी गावाच्या बाहेर फिरायला निघाले. पवनी हे गाव पुरातन गाव आहे. पुरातन गावांना वा शहरांना किल्ल्याप्रमाणे प्रचंड मोठी कोट म्हणजे सर्व बाजूंनी असणारी भिंत असे आणि आत-बाहेर जाण्यासाठी चारही बाजूंनी विशाल द्वारे असत. पवनीलादेखील पश्चिम दिशेला असेच एक विशाल प्रवेशद्वार आहे. हे द्वार ४० फूट उंच आहे. याच द्वारातून मनोहरराव बाहेर निघाले. मनोहरराव नेहमी स्वतःच्या अतींद्रिय अवस्थेत असत. गावाबाहेर फिरून झाल्यावर ते पुन्हा त्या पश्चिम द्वाराजवळ आले. तेथे येऊन पाहातात तो त्यांना एक अद्भुत अनुभव आला. ४० फुटाच्या त्या विशाल द्वारांच्या वरून एका विशाल वानराने खाली उडी मारली आणि मनोहररावांकडे पाहात पाहात ते अदृश्य झाले. ते वानर साधारण वानरापेक्षा अतिविशालकाय होते. परंतु त्याचे सर्व हावभाव मानवासारखे होते. त्या वानराचे ते दर्शन स्वर्गीय व अद्भुत होते. तसे वानर पृथ्वीतलावर कुठेही नसावे. त्याचा वर्णही एक वेगळाच धूम्र वर्ण होता. त्याच्या शरीराचा एक दिव्य सुगंध येत होता. त्याचा स्पर्श मनोहररावांना दुरूनच जाणवत होता. हे अद्भुत वानर दिसले त्या वेळी आजूबाजूला कोणी होते की नव्हते हे मनोहररावांना आठवत नाही. परंतु असे हे अद्भुत वानरदर्शन झाल्याबरोबर मनोहरराव काही वेळ एका दिव्य अवस्थेत गेले आणि त्या अवस्थेत त्यांना कळले की त्यांना जे दिसले ते केवळ वानर नव्हते, तर साक्षात 'हनुमान' होते. मनोहररावांना साक्षात हनुमानाचे दिव्य सजीव दर्शन झाले होते.

योगी मनोहरांनी त्यांच्या नंतरच्या काळात एकदा सांगितले होते की हनुमानाचे दर्शन सहसा कुणाला होत नाही. कारण हनुमान म्हणजे वायुतत्त्व! वायुतत्त्वाची अनुभूती अतिशय कठीण, दुर्गम असते. वायुतत्त्वाचे साकार रूप म्हणजे हनुमान. वायुतत्त्वाची गती म्हणजे एकाच क्षणात संपूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करणे आहे. ही अनुभूती केवळ शब्दांच्या पलीकडची आहे. म्हणून ही अनुभूती (ब्रह्मांडाला एकाच क्षणात प्रदक्षिणा) आल्यावर साधकाला विलक्षण त्रास होतो. जीव विलक्षण घाबरतो आणि कधीकधी शरीर संपूर्ण फाटून जाते. केवळ उच्च कोटीचे साधकच या वायुतत्त्वाची अर्थात, हनुमंत दर्शनाची अनुभूती घेऊ शकतात.योगी मनोहरांना इतक्या कमी वयात हनुमानाचे असे दर्शन होणे आणि ती अनुभूती त्यांना पचवता येणे यावरूनच त्यांची आध्यात्मिक अवस्था किती उच्च कोटीची होती हे लक्षात येते.

पवनी हे गाव म्हणजे संतनगरी आहे. ती एक गंधर्वनगरी आहे. अनेक संतांनी, योग्यांनी पवनीला तपस्या केली आहे. योगी मनोहरांच्या आधी वासुदेवानंद सरस्वती यांनीही पवनीला काही काळ तपस्या केली होती. या सर्व संतमहात्म्यांच्या येथील वास्तव्यामुळे पवनी हे स्थळ आध्यात्मिक स्पंदनांनी भारलेले स्थळ आहे. आजही पवनी या ठिकाणी गेले असता या आध्यात्मिक स्पंदनांचा अनुभव सर्व आध्यात्मिक साधकांना येऊ शकतो.

----------------------------------------------------

पवनीतील शालिनीताईंचे कष्टिक जीवन

-----------------------------------------------------

पवनीच्या या वास्तव्यात शालिनीताई यांनी मनोहररावांना प्रत्येक परिस्थितीत सावलीसारखी साथ दिली. पवनीच्या या वास्तव्यात शालिनीताईंना अतिशय कष्टमय आयुष्य जगावे लागले. परंतु त्यांनी हे सर्व आनंदाने सहन केले. अगदी त्यांच्या पहिल्या कन्येच्या गरोदरपणापसून त्या कष्टिक आयुष्य जगत होत्या. गरोदर असतानाही वैनगंगेच्या तीरावर जाऊन कळशी - कळशीने पाणी घरी आणणे, नदीवर कपडे धुणे इत्यादी कामे तर त्यांची नित्यनियमित होती. नंतर घरी येऊन स्वयंपाक करणे, मनोहररावांना शाळेत जाण्याआधी जेवण देणे, मुलगी लता हिचे अंघोळ, जेवण इत्यादी सर्व कामे करणे आणि हे सगळे झाल्यावर स्वतः देवाची पूजा करणे व त्यानंतर जेवणे अशी दिनचर्या शालिनीताईंची होती. मनोहररावांनी पवनीला एक बालकमंदिरही सुरू केले होते. हे बालकमंदीर शालिनीताई चालवत असत. येथे त्या गावातील लहान मुलांना मोफत शिक्षण देऊन त्यांना रोज स्वतः बनवलेला खाऊ देत असत. मनोहरराव त्यांना अगदीच जी तुटपुंजी रकम घरखर्चासाठी देत असत, त्यातूनच त्या हे सर्व करत असत. त्यांनी कधीही नवीन पातळासाठी किंवा दागिन्यांसाठी मनोहररावांकडे मागणी केली नाही. जे होते त्यात त्या सुखी, समाधानी होत्या.

एकदा असेच नदीवर कपडे धुण्यासाठी त्या गेल्या होत्या. सोबत कन्या लताही होती, आणि मनोहररावही होते. मनोहरराव उत्तम पोहणारे होते. वैनगंगेच्या पात्रात ते नियमित पोहत असत. आज शालिनीताईंसोबत तेही आले होते व शालिनीताईंना कपडे धुण्यास मदत करत होते. कपडे धूत असता शालिनीताईंचे लक्ष आजूबाजूला गेले आणि त्यांच्या लक्षात आले की कन्या लता कुठे दिसत नाही. त्या घाबरल्या आणि मनोहररावांना त्यांनी आवाज दिला. गंगेकडे दोघांचेही लक्ष गेले आणि त्यांना आढळले की छोटी लता ही गंगेत खाली डोके वर पाय या अवस्थेत वाहून जात आहे. मनोहररावांनी लागलीच पाण्यात उडी मारून कन्येला वाचवले. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते व ती बेशुध्द झाली होती. महत्प्रयासाने तिच्या शरीरात गेलेले पाणी बाहेर काढून मनोहररावांनी तिला वाचवले व शुध्दीवर आणले.

काही दिवसांनी पवनीचे गृहस्थ व मनोहररावांचे मित्र श्री. आबाजी नाईक यांनी मनोहररावांना आपला वाडा राहाण्यासाठी देऊ केला. वाडा मोठा होता व वाड्यात मागल्या बाजूला विहीर होती. वाड्याच्या दुसऱ्या मजल्याची खिडकी उघडली की एक (टीन) पत्रा लागत असे जे उतरते होते. लागूनच खाली विहीर होती. एकदा कसे कोण जाणे, छोटी लता खिडकीतून त्या पत्र्यावर चालत चालत गेली आणि खाली असलेल्या विहिरीकडे डोकावून पाहू लागली. शालिनीताईंना याची कल्पना नव्हती. बाहेरून काही बायकांनी हे बघितले आणि त्या लगेच मागल्या दारातून येऊन शालिनीताईंना मोठमोठ्याने बोलावू लागल्या. तोपर्यंत त्या बायांनी विहिरीवर आपले पदर दोन्ही हातांनी पसरवले जेणेकरून पोरगी विहिरीत पडू नये. शालिनीताईंच्या हे लक्षात आल्यावर त्या धावतच जाऊन माडीवरील पत्र्यावर उतरल्या आणि लताला त्यांनी वाचविले.

असे अनेक कठीण प्रसंग शालिनीताईंवर त्यांच्या पवनीच्या वास्तव्यात आले. ते ंत्यांनी सर्व एकट्यानेच सहन केले.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी