सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - साधना
--------------------------------------------
मनोहररावांना आईचा स्वप्नदृष्टान्त
--------------------------------------------
दिवस जात होते. शालिनीताईंच्या पोटातला गर्भ हळूहळू वाढत होता. त्यांना सहावा महिना लागून संपायला आला होता. अशातच एक दिवस एक चमत्कारिक घटना घडली. एक दिवस रात्री झोपेत मनोहररावांच्या मातोश्री, राधाबाई त्यांच्या स्वप्नात आल्या आणि त्यांनी मनोहररावांना सांगितले, “बाळ, मला तुझ्या घरात जन्माला यायची इच्छा आहे". मनोहररावांची या काळात साधनेला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यांना जन्म, पुर्नजन्माबद्दल विशेष कल्पना नव्हती. त्यांचा समज हाच होता की गर्भधारणा झाल्या दिवसापासूनच आईच्या गर्भात जीव असतो. या समजामुळेच मनोहररावांनी आईला स्वप्नातच विचारले की, "आई, आता तर गर्भधारणा होऊन सहा महिने होऊन गेले. आता तू कशी त्या गर्भाद्वारे जन्माला येशील?" आईने त्यावर उत्तर दिले, “ते मी सर्व पाहून घेईल." पण एवढे सांग की, "मी तुझ्याकडे जन्माला आले तर तुला आवडेल का?" मनोहररावांनी उत्तर दिले, "आई, तू जर माझ्याकडे जन्माला आली तर त्याच्यासारखा दुसरा आनंदच नाही. तू अवश्य ये." यावर आईने खूश होऊन 'ठीक आहे' म्हटले आणि मनोहरराव स्वप्नातून जागे झाले. या चमत्कारिक दृष्टान्तावरून त्यांचे लक्षात आले की त्यांची आई त्यांचेकडे जन्माला येणार! त्यांनी सकाळी शालिनीताईंनाही स्वप्नाबद्दल सांगितले. त्यानंतर तीन महिन्यांनीच १९५१ साली शालिनीताईंनी एका सुंदर कन्येला जन्म दिला. सर्व गावात आनंदीआनंद झाला. हरकरे मास्तरांकडे कन्यारत्न जन्माला आल्याबद्दल सर्व गावाला मिठाई वाटण्यात आली. मनोहरराव आणि शालिनीताई यांच्या लक्षात आले की कन्येच्या रूपाने मनोहररावांच्या आई राधाबाई'च जन्माला आल्या होत्या. हीच कन्या म्हणजे शालिनीताई व मनोहररावांचे पहिले अपत्य! हिचे नाव 'लता' ठेवण्यात आले. आईच्या या पुनर्जन्माने मनोहररावांना पुढे त्यांच्या परिपक्व आध्यात्मिक अवस्थेत जन्म, पुर्नजन्माचे गहन रहस्य उलगडले होते. मातृगर्भात जीवात्मा सातव्या महिन्यात प्रवेश करतो हे गूढ रहस्य सिध्दांतरूपाने पुढे मनोहररावांनी (योगी मनोहरांनी) त्यांच्या 'जन्म-मृत्यू रहस्य' या ग्रंथात मांडले होते. लता या कन्येचा चेहरा हुबेहुब आई राधाबाईंसारखाच होता हे विशेष. पुनर्जन्माचे हे साक्षात उदाहरण होते. कन्येच्या आगमनाने मनोहरराव व शालिनीताईंचे दिवस आनंदात जाऊ लागले.
--------------------------------------------
साधना काळातील अद्भुत अनुभव
--------------------------------------------
पिशाच अनुभव
मनोहररावांची वैनगंगेच्या किनारी रोज पहाटेची अध्यात्मसाधना अखंडपणे सुरूच होती. साधना करताना काही दिवसांतच त्यांना एक विचित्र अनुभव आला. रात्री तीन वाजता शिवपिंडीसमोर ते साधनेला बसत. एकदा साधनेला सुरुवात केल्यावर मनोहररावांना किचकिच किचकिच आवाज आला. डोळे उघडून पाहतात ते आजूबाजूला कोणीच नव्हते. पुन्हा ध्यानाला डोळे मिटले तो पुन्हा तोच किचकिच आवाज! पुन्हा डोळे उघडून पाहातात तो एक विचित्र आकृती त्यांचेपासून थोडे अंतरावर अधांतरी असल्यासारखी दिसली. त्या आकृतीला शरीर नव्हते, शरीराचा आकार होता आणि ती आकृती आपले भयानक दात अचकटविचकट स्वरूपात किचकिच आवाज करून दाखवित होती. ती आकृती मात्र मनोहररावांच्या जवळ येत नव्हती. काही वेळाने तशा आणखीन काही आकृत्या एकत्र आल्या आणि मनोहररावांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करू लागल्या.
मनोहररावांच्या तत्काळ लक्षात आले की त्या आकृत्या म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्यक्ष पिशाचे होती. मनोहररावांना मात्र त्यांची भीती वाटली नाही. कारण साधनेची शक्ती त्यांच्यात निर्माण झाली होती आणि तारुण्यात येताना त्यांनी आखाडाही पिसला होता. त्यामुळे आयुष्यात भीती अशी त्यांना कधी वाटली नाही. काळोखात त्या भयानक आकृत्यांच्या हालचालींकडे मनोहररावांनी सुरुवातीला दुर्लक्ष करून ध्यान लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या भयानक आकृत्या साधनेत अजून व्यत्यय आणण्याचा जेव्हा प्रयत्न करू लागल्या तेव्हा मात्र मनोहरराव जागेवरून उठले, धोतर घट्ट कसले आणि त्या आकृत्यांच्या मागे धावले. त्या आकृत्या मात्र मनोहररावांना घाबरून अशा काही पळाल्या की त्यांचे एक पाऊल जमिनीवर तर दुसरे थेट आकाशात पोहोचले. (योगी मनोहरांनी हा अनुभव प्रत्यक्ष जेव्हा सांगितला तेव्हा तो पूर्ण ऐकण्याचा योग आला. योगी मनोहरांनी सांगितले की, "जेव्हा ती पिशाचे साधनेमध्ये जास्तच व्यत्यय आणू लागली तेव्हा मी उठून धोतर कसले आणि 'तुझ्या पितरच्या' असे म्हणून त्यांचे मागे धावलो तेव्हा त्या भयानक आकृत्या अक्षरशः एक पाऊल जमिनीवर तर दुसरे आकाशात अशा परिस्थितीत पळाल्या. पुन्हा मात्र त्या पिशाचांनी मला त्रास दिला नाही.")
आपल्यासारख्या सर्वसामान्यांना हे वर्णन वाचूनच अंगावर काटा येतो. मनोहररावांनी मात्र कुठलीही भीती न बाळगता या भयानक पिशाचांनाच पिटाळून लावले होते. योगी महात्म्यांपासून पिशाचे नेहमी दूर राहातात आणि घाबरतात. योगी महात्म्यांवर पिशाच्यांची कुठलीही मात्रा चालत नाही. योगी मनोहरांनी पिशाचांचा हा अनुभव जसा सांगितला अगदी तसाच मी इथे लिहित आहे. यात काहीही हातचे नाही. 'तुझ्या पितरच्या' ही जुन्या काळातील गावरान भाषेतील शिवी आहे. या शिवीचा अर्थ 'तुझ्या सकट तुझ्या पितरांची ऐशीतैशी' असा होतो. जुन्या काळचे लोक या शिवीचा मारहाणीच्या प्रसंगी उपयोग करत. योगी महात्म्यांच्या साघनेच्या तेजामुळे पिशाचे योगी महात्म्यांना घाबरून दूर पळून जातात. म्हणून जिथे योगी महात्म्यांचे वास्तव्य असते तिथे पिशाचे टिकत नाहीत. मनोहरराव हे तर गेल्या जन्मीचे महान योगी होते. तपस्येचे तेज त्यांच्यामध्ये जन्मापासूनच आले होते. त्यामुळे पिशाचांचा त्यांच्यापुढे टिकाव लागणे अशक्य होते. मनोहररावांनी त्यांच्या पुढच्या आध्यात्मिक प्रवासात अनेक लोकांच्या पिशाचबाधा आपल्या आध्यात्मिक शक्तीने दूर केल्या होत्या. याबद्दल विस्तृत माहिती या चरित्रात पुढे येईलच.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा