सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - आध्यात्मिक प्रगती
----------------------------------------------------------------
आध्यात्मिक प्रगती आणि खालावणारी आर्थिक स्थिती
------------------------------------------------------------------
यस्याम् अनुग्रहमिच्छामि
भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगताना म्हटले आहे 'यस्याम् अनुग्रहमिच्छामि, तस्य वित्त हराम्यहम' अर्थात, ज्याचेवर मी कृपा करतो त्याची संपूर्ण भौतिक माया प्रथम हरण 'करतो', योगी मनोहर 'हरी' शब्दाचे विश्लेषण करताना नेहमी 'हरण करणारा तो हरी' असे सांगत, या हरीची अर्थात, परमेश्वराची ज्या भक्तावर वा साधकावर कृपा होते तेव्हा प्रथम त्या भक्ताची वा साधकाची भौतिक माया हळूहळू संपते. याची अनेक उदाहरणे आहेत. संत तुकाराम गावचे श्रीमंत महाजन होते. पांडुरंगाची कृपा झाल्यावर मात्र भौतिकदृष्ट्या ते पूर्ण भिकारी बनले. आध्यात्मिकदृष्ट्या मात्र तेवढेच श्रीमंत झाले. संत मीराबाई! राजकुमारी, राजराणी होती. कृष्णाचे वेड लागल्यापासून मात्र सर्व मायेतून बाहेर पडून जोगीण झाली. आध्यात्मिक दृष्ट्या मात्र तेवढीच श्रीमंत झाली. अजून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील की ज्यामध्ये खरे संत नेहमी भौतिकदृष्ट्या भिकारीच होते. संत ज्ञानेश्वर तर साक्षात विष्णूचे अवतार होते. मात्र ही चारही भावंडे जन्मापासून भौतिक दारिद्र्यात वाढली. खायला अन्नसुध्दा मिळेनासे झाले होते. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास स्वामी, गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, स्वामी समर्थ अशी कितीतरी खऱ्या संतांची उदाहरणे देता येतील ज्यामध्ये भौतिक श्रीमंतीचा कुठेही लवलेश नव्हता. आजच्या काळातील दिखाऊ संतांचे मात्र याच्या अगदी विरुध्द आहे. आजचे दिखाऊ संत करोडो-करोडोचे मालक असतात. प्रसिध्दीच्या मागे धावणारे असतात. संत तुकारामांनी अशा भोंदू संतांची कडक शब्दांत निर्भत्सना करताना म्हटले आहे 'त्याचे हाणून थोबाड फोडा!' असे भोंदू संत प्रत्येक युगात होतात आणि पुढेही होत असतात. स्वतः ही अज्ञानात राहतात आणि भोळ्या भक्तांनाही अज्ञानात खितपत ठेवतात. अशा भोंदूपासून मानव समाजाला बाचवून ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठीच प्रत्येक वेळी कुणी ना कुणी स्वरा संतमहात्मा पृथ्वीवर अवतरतो आणि समाजाला अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढतो. म्हणूनच गीतेत म्हटले आहे.
'परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम । धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे'
महर्षी वाल्मिकी, वेद व्यास, आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर माउली आणि योगी मनोहर ही शृंखला म्हणजे अशाच योग्यांची शृंखला आहे ज्यांनी वेळोवेळी समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्याचे कार्य केले आहे.
ज्ञानेश्वर माउलींनी योगी मनोहरांना प्रत्येक कठीण जटिल अशा आध्यात्मिक अनुभूती देऊन त्यातून तावून सुलाखून तयार केले होते. मायेतून बाहेर निघण्याची योगी मनोहरांची ही शेवटची परीक्षा होती. यानंतर त्यांचे हातून विशाल आध्यात्मिक कार्य होणार होते. प्रत्येक आध्यात्मिक कार्य कठीण अनुभूती घेऊन शेवटी भौतिक मायेतून बाहेर येणे ही त्याचीच तयारी होती. योगी मनोहरांनी पुढे अनेकदा सांगितले होते की, जसजशी साधकाची आध्यात्मिक प्रगती होत जाते तसतशी त्याची भौतिक माया कमी-कमी होत जाते. साधना करताना साधकाची भौतिक माया जर कमी-कमी होत गेली तर साधकाने समजावे की त्याची आध्यात्मिक प्रगती निश्चितपणे होत आहे. भौतिक मायेची रेषा ओलांडून एका विशाल आध्यात्मिक कार्याकडे भरारी घेण्याची योगी मनोहरांची आता वेळ आली होती.
१९७०चा कालावधी होता. राहाते मोठे घर विकण्याचा निर्णय योगी मनोहरांनी आणि शालिनीताईंनी घेतला. योग्य गिऱ्हाईक मिळाले आणि घर विकले गेले. घर विकून मिळालेली रक्कम खूप मोठी नव्हती. त्यातूनच योगी मनोहरांनी कर्ज फेडले. आपले कुटुंब घेऊन ते या घरातून बाहेर पडले. शालिनीताईंना हे घर सोडताना किती यातना झाल्या असतील याची कल्पना करणेही कठीण आहे. परंतु आपल्या पतीला चांगल्या आणि वाईट परिस्थितीत साथ देण्याचा वसा या पतिव्रतेने घेतल्यामुळे कठीण परिस्थितीतही आपल्या मनाला होणाऱ्या यातना कधी कुणाला दाखविल्या नाही. आयुष्यात त्या कधीच रडल्या नाहीत. परंतु स्त्रीस्वभाव आणि अश्रू यांचे अगदी जवळचे नाते आहे. जड अंतःकरणाने घर सोडताना शालिनीताईंनी पदराने डोळे पुसले होते. योगी मनोहरांच्या परिपक्व नजरेतून शालिनीताईंचे हे दोन दुःखाश्रू सुटले नव्हते. धन्य ती माता, धन्य ती पत्नी, धन्य ती योगिनी !
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा