सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - पुस्तक लिखाणास प्रारंभ
--------------------------------------
पुस्तक लिखाणास प्रारंभ
--------------------------------------
या काळात हळूहळू योगी मनोहरांना आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती ओळखू लागल्या होत्या. त्यांची आध्यात्मिक विषयावरील व्याख्याने सर्वत्र होऊ लागली. वृत्तपत्रांमध्ये लेखही येऊ लागले होते. त्यांचेभोवती एक आध्यात्मिक वलय निर्माण होऊन त्यांची ख्याती हळूहळू दूरवर पसरू लागली होती. या वेळेस त्यांचे वय साठीत गेले होते. त्या वेळचे प्रसिद्ध आध्यात्मिक मासिक म्हणजे 'गूढविद्या' हे होते. यामध्ये योगी मनोहरांचे अनेक लेख प्रसिद्ध होत असत. हळूहळू योगी मनोहरांचा आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार बघून सर्व त्यांना 'योगीराज मनोहर हरकरे' असे संबोधू लागले होते. हळूहळू वयस्कर आध्यात्मिकांसोबत तरुण लोकही योगी मनोहरांच्या साहित्याकडे आकर्षित होऊ लागले होते. उदरनिर्वाहासाठी योगी मनोहरांनी पुस्तके छापण्याचे ठरवले आणि याच काळात त्यांनी जे पहिले पुस्तक लिहून प्रकाशित केले ते म्हणजे 'World Ideal Gopal Krishna' हे होते. त्यांनी या इंग्लिश पुस्तकात भगवान गोपालकृष्णाचा वेद व्यासांना जो अर्थ अभिप्रेत होता तो मांडला होता. भगवान गोपालकृष्ण हे केवळ ऐतिहासिक पुरुष नसून योग्याला त्याच्या उच्च अवस्थेत येणाऱ्या आध्यात्मिक अनुभूतींचे रूपकात्मक वर्णन म्हणजे भगवान गोपालकृष्णाचे चरित्र होय, असा खुलासा योगी मनोहरांनी या पुस्तकात केला होता. या पुस्तकाचे मुखपृष्ठचित्रसुद्धा त्यांनी स्वतः काढले होते.
या काळात अनेक तरुण व वयस्कर लोक योगी मनोहरांचे साहित्य वाचून त्यांचेशी जोडले जाऊ लागले. त्यांच्या साहित्यातच एक अशी शक्ती होती की त्यांचेकडे अध्यात्माची आवड असणारे लोक आपणहून आकर्षित होऊ लागले होते. योगी मनोहरांनी याच काळात ठिकठिकाणी योगशिबिरे घेणेही सुरू केले होते. त्यांचेकडे येणारे जे लोक असत ते योगी मनोहरांना गुरू मानत असत. योगी मनोहरांनी मात्र कधीही स्वत:ला 'गुरू' म्हटले नाही आणि कोणाला स्वत:चा 'शिष्य' म्हटले नाही. त्यांचेकडे आध्यात्मिक गोडीने येणाऱ्या;प्रत्येकाला ते योगसाधना शिकवित असत. योगसाधना करणाऱ्या प्रत्येकाला ते 'साधक' म्हणत असत. त्यांना कोणाला शिष्य म्हणणेही आवडत नव्हते आणि स्वतःला गुरु म्हणवून घेणेही आवडत नव्हते. त्यांचेकडे येणाऱ्या प्रत्येकाला ते साधना करणारा साधक बनवत असत.
त्यांचेकडे येणाऱ्यांमध्ये एक तरुण साधक त्यांना 'काकाजी' संबोधत असे. 'काकाजी' हा शब्द योगी मनोहरांना आवडला. इतर सर्व साधकही हळूहळू त्यांना 'काकाजी' असेच संबोधू लागले. कारण योगी मनोहरांकडे येणारी बरीच मंडळी त्यांना 'महाराज' वगैरे म्हणत असत. योगी मनोहरांना कोणी त्यांना असे 'महाराज' वगैरे म्हणणे आवडत नव्हते. ते महाराजगिरीच्या विरोधात होते. ते सर्वांना म्हणत की, "मी तुमच्या वडिलांसारखा आहे. तेव्हा मला महाराज वगैरे म्हणू नका." त्यामुळे सर्व लोक पुढे त्यांना प्रेमाने 'काकाजी' असेच म्हणू लागले. योगी मनोहरांना काकाजी आणि शालिनीताईंना काकू असे सर्व साधक म्हणू लागले. अशा पद्धतीने योगी मनोहर सर्वांचे 'काकाजी' झाले. पुढे पूर्ण आयुष्यभर सर्व साधकांनी त्यांना काकाजीच म्हटले.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा