सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - वैदिक विश्व

 -------------------------------

वैदिक विश्व'चा उगम

-------------------------------

अनेक लोक योगी मनोहरांशी जोडले जात होते. योगी मनोहरांची कार्य करण्याची पद्धत सर्वांना अतिशय आवडू लागली होती. त्यांच्या योगशिबिरांतून अनेकांना अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक लाभ होऊ लागले होते. या संपूर्ण कार्याला एक साजेसे नाव देऊन जगापुढे आणण्याची सर्वांची इच्छा होती. योगी मनोहरांनी या संपूर्ण कार्याला अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने 'वैदिक विश्व' असे नाव देण्याचे ठरविले आणि अशातऱ्हेने 'वैदिक विश्व' या कल्पनेचा उगम झाला. वैदिक विश्व या शब्दाचा आशय योगी मनोहर सांगत असत तो असा. 'विद' म्हणजे ज्ञान प्राप्त करणे आणि 'वैदिक' म्हणजे ज्ञान प्राप्त करून त्यानुसार आचरण करणे. 'विद' आणि 'वेद' म्हणजे ज्ञान. संपूर्ण विश्वाला ज्ञानमय करण्याचे योगी मनोहरांचे ध्येय आणि स्वप्न होते. म्हणूनच या संपूर्ण कार्याला योगी मनोहरांनी वैदिक विश्व असे सार्थ नाव दिले. संपूर्ण विश्वाला वैदिक बनविण्याचे महान ध्येय असणारे कार्य म्हणजे वैदिक विश्व ! वैदिक विश्व या कार्याला योगी मनोहरांनी संस्थेचे स्वरूप मात्र कधीच येऊ दिले नाही. कारण त्यांचे म्हणणे होते की संस्थेचे स्वरूप आल्यावर मूळ कार्य आणि उद्देश बाजूला राहून राजकारण सुरु होते आणि अनेक फाटे फुटतात. म्हणून वैदिक विश्व ला योगी मनोहरांनी कार्याच्या रूपातच सदैव ठेवले.


वैदिक विश्वची योगी मनोहरांनी मांडलेली परिकल्पना वैदिक विश्व परिकल्पना -

वैदिक विश्व परिकल्पना

मानवी जीवनाची रचना शास्त्रीय आधारावर करून संपूर्ण मानवजीवन ज्ञानमय करणे 'याला 'वैदिक जीवन' अर्थात् 'वैदिकता' असे म्हणतात. 'विद' म्हणजे ज्ञान प्राप्त करणे व वैदिक म्हणजे प्राप्त ज्ञानानुसार जीवन यापन करणे. केवळ पुस्तके वाचून, प्रवचने किंवा व्याख्याने ऐकून आणि आचाराशिवाय केवळ विचार ठेवून नव्हे तर सुयोग्य साधना करून व तद्नुसार आचरणामुळे ज्ञान प्राप्त होत असते. 

भौतिक अथवा जड जगताबद्दलच्या ज्ञानाला विज्ञान म्हणतात तर सुयोग्य चिंतन आणि अध्यात्मिक साधनांद्वारे जी अनुभूती प्राप्त होते त्याला ज्ञान म्हणतात. सुखी मानवी जीवनासाठी ज्ञान आणि विज्ञान दोन्ही आवश्यक आहेत..

वैदिक जीवनामध्ये ज्ञान आणि विज्ञान यांचे संतुलन रहावे म्हणून वेळोवेळी धर्म, पंथ, संप्रदायांची स्थापना केली गेली. जुन्या अशात्रीय, म्हणून अनावश्यक संस्कार व श्रद्धा यांना हटवून मानवी जीवन पुन्हा शास्त्रीय व उन्नत व्हावे म्हणून धर्मपंथांचा प्रचार केला गेला. परंतु कालौघात हे नवीन धर्म संप्रदायही जुन्या धर्मसंप्रदायांप्रमाणे अंधश्रद्धा व अशास्त्रीय कल्पनांच्या आहारी गेले. केवळ कर्मकांडात आणि रुढी मध्ये अडकून पडलेल्या जुन्या सम्प्रदायांविरुद्ध नवीन संप्रदाय होते, पूर्वीच्या धर्माविरुद्ध अथवा सत्यांविरुद्ध ते नव्हते. प्रत्येक धर्मसंप्रदायाचा मूळ इतिहास हेच सांगतो. धर्म प्रवर्तकांनी नवीन कांही सांगितले नाही. परंतु शास्त्रीय व सत्य परंपरा सोडून भरकटलेल्या तत्कालीन मानवी जीवनाला पूर्व पदावर आणणे, हा त्यांचे प्रयत्नांमागील उद्देश होता.

याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, प्रत्येक धर्म प्रवर्तकासमोर असे एक शास्त्रीय जीवन होते की जे त्यांना आदर्श व अनुकरणीय वाटत होते. हे प्राचीन आदर्श जीवन कोणते होते?

तर ते वैदिक जीवन होते व आजही आहे. एक काळ असा होता की, संपूर्ण जगत् वैदिक तत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेले होते. वैदिक म्हणजे ज्ञानमय हे आपण बघितलेच आहे. असल्या शास्त्रीय वैदिक जीवनाची ओढ आज विद्वानांना लागून राहिलेली आहे. भौतिक विज्ञानाने जीवन समृद्ध अवश्य होईल, परंतु त्यापासून मानसिक समाधान आणि शांती प्राप्त होणार नाही हे सत्य संपूर्ण जगाने आज मान्य केलेले आहे, नव्हे ते मान्य करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. या वैदिक जीवनाचे सूत्र योगशास्त्र अर्थात् अध्यात्मशास्त्र आहे ज्याचा प्रचार व अवलंब जगातल्या सर्व देशात केला जात आहे. भौतिक आणि वैज्ञानिक सुखोपभोगांनी मानसिक समाधान, शांतता मिळत नाही असे बघून देश-विदेशांतील, तरुण-तरुणी या प्राचीन वैदिक जीवनाची अभिलाषा बाळगून भारताकडे आकर्षित होत आहेत. शास्त्रीय जीवन प्राप्तिचे दृष्टीने हे शुभलक्षण मानता येईल..


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी